प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदी आदेशाचे कठोरतेने पालन करणार ! – नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री

पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल

पणजी, १८ ऑगस्ट (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री किंवा वापर यांवरील बंदी आदेशाचे शासन यंदा कठोरतेने पालन करणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आणि त्याचा दोष नंतर सरकारला दिला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणारे किंवा वापर करणारे यांच्यावर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि संबंधित यंत्रणा दंडात्मक कारवाई करणार आहे. या वेळी बंदी आदेशाची सक्तीने कार्यवाही केली जाणार आहे.’’ (बंदी आदेशाची कार्यवाही न करणार्‍या पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
वीजमंत्रीपदही सांभाळणारे नीलेश काब्राल यांना वीजपुरवठ्याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते पुढे म्हणाले,‘‘श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने वीज खात्याने पथदीपांचे दुरुस्तीकाम हाती घेतले आहे. श्री गणेशचतुर्थीच्या पूर्वी ९८ टक्के पथदीप चालू करण्यात येणार आहेत. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज ‘ट्रान्स्फॉर्मर’ पालटण्याचे कामही चालू आहे.’’