रोजगार निर्माण करण्याची क्षमता नारळाच्या झाडामध्ये आहे ! – श्रीनिवास बिटलींगु

‘क्वायर बोर्डा’चे रत्नागिरीतील सदस्य बिपीन शिवलकर व माहिती देतांना श्रीनिवास बिटलींगु   

रत्नागिरी – नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळ म्हणजे लक्ष्मीचेच एक रूप असून नारळाच्या झाडामध्ये विविध उद्योग निर्माण करून रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाच्या ‘क्वायर बोर्डा’च्या (क्वायर म्हणजे नारळाच्या काथ्या. क्वायर बोर्ड म्हणजे नारळाच्या काथ्याशी निगडित उद्योग मंडळ) उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास बिटलींगु यांनी दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा समावेश असलेले ‘क्वायर बोर्डा’चे प्रादेशिक कार्यालय ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग येथे असून रत्नागिरी जिल्ह्यात नारळाच्या काथ्याशी निगडित उद्योगाविषयी माहिती, उपलब्धता आणि संधीची माहिती घेण्यासाठी श्रीनिवास बिटलींगु रत्नागिरीत आले होते. त्यांच्या समवेत ‘क्वायर बोर्डा’चे रत्नागिरीतील सदस्य बिपीन शिवलकर हेही उपस्थित होते.

श्रीनिवास बिटलींगु पुढे म्हणाले की,

१. रत्नागिरीतील महिला, तरुण किंवा समूह यांना उद्यमशील बनवून रोजगार निर्मितीसाठी ‘क्वायर बोर्ड’ कार्यक्रम आखत आहे.

२. ‘नारळाच्या काथ्याची उपयुक्तता काय ? त्यातून उद्योग कसा आणि कोणता निर्माण होईल ?’ याची माहिती देण्यात येईल.

३. २ सप्टेंबरपासून रत्नागिरी,  दापोली, गुहागर आणि लांजा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

४. नारळाच्या काथ्याचा वापर करून केवळ दोरखंड, पायपुसणे किंवा ‘हॅन्डक्राफ्ट’च्या वस्तूच नव्हे, तर यापासून बनवण्यात येणारे ‘कोकोपीट’ उपयुक्त आहे. त्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असल्याने शेतीसाठी उपयोग होतो. इमारत बांधणे, नर्सरी यांसाठी याचा वापर केला जातो. अत्यंत अल्प पैशात ते सिद्ध करून नफा कमावता येतो.

५. नारळाच्या झाडात आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे.