प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करू नका आणि प्रदूषण रोखा ! – केदार नाईक, गणेश मूर्तीकार, नागेशी, बांदोडा

फोंडा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन न करता केवळ शाडूमातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींचेच पूजन करावे. यामुळे पाण्याचे प्रदूषण होणार नाही. गणेशोत्सव साजरा करतांना निसर्गाची हानी करू नये, असे आवाहन नागेशी, बांदोडा येथील श्री गणेशमूर्तीकार केदार नाईक यांनी केले आहे. केदार नाईक आणि त्यांचे कुटुंबीय यांची बांदोडा येथे शाडूमातीपासून श्री गणेशमूर्ती बनवण्याची पारंपरिक शाळा आहे.

केदार नाईक पुढे म्हणाले, ‘‘आज शहरात अनेक लोक वजनाला हलकी आणि आकाराने लहान असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पूजनासाठी आणणे पसंत करतात, हे खेदजनक आहे. शाडूपासून बनवलेली मूर्ती विसर्जनानंतर लगेच पाण्यात विरघळतेे; मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अनेक मास पाण्यात तशीच रहाते.  प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवण्यासाठी वापरलेल्या कृत्रिम रंगांमुळे पाण्याचे प्रदूषण होते. शाडूमातीपासून मूर्ती बनवणार्‍यांना शासनाने अधिकाधिक आर्थिक साहाय्य केल्यास परराज्यांतून आयात होणार्‍या श्री गणेशमूर्तींना आळा बसू शकेल. गोवा शासन श्री गणेशमूर्तीकारांना काही अंशी अनुदान देते; मात्र हे अनुदान वेळेत मिळाल्यास त्याला महत्त्व आहे. हे अनुदान गणेशोत्सवाच्या किमान २ मासांपूर्वी मिळाल्यास मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी या निधीचा वापर होऊ शकतो.’’

केदार नाईक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आगामी गणेशोत्सवासाठी जून मासापासून शाडूमातीच्या श्री गणेशमूर्ती बनवण्यास प्रारंभ केला आहे.