पहा Videos : तालिबान्यांच्या भीतीमुळे लक्षावधी लोक देश सोडून जाण्याच्या सिद्धतेत !

अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य !

  • काबुल विमानतळावर झालेल्या गोळीबारात ५ हून अधिक जण ठार  

  • अफगाणिस्तानमध्ये भारतीय नागरिक अडकले !

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून तेथील स्थिती बिघडत चालली आहे. लक्षावधी लोक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सहस्रो लोकांनी काबुल विमानतळावर धाव घेतली असून ते तेथील विमानांमध्ये बलपूर्वक घुसत आहेत. या वेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोळीबार करण्यात आला. यात ५ हून अधिक जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले आहेत; मात्र काही जणांच्या मते येथे चेंगराचेंगरी होऊन त्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच हिजाब (मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) न घातलेल्या अनेक महिलांना विमानतळाजवळ गोळ्या घालण्यात आल्या; मात्र तालिबानने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. सध्या हे विमानतळ अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणात आहे. आता अमेरिका तिचे ६ सहस्र सैनिक काबुलमध्ये उतरवण्याच्या सिद्धतेत आहे. तालिबानने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आय.इ.ए.) म्हणून घोषित केले आहे.

सौजन्य : Guardian News

सौजन्य : Guardian News

सौजन्य : WION

सौजन्य : Reuters

लोकांना अधिक रक्तपात पहावा लागू नये; म्हणून मी अफगाणिस्तानातून पळून गेलो ! – राष्ट्रपती अशरफ घनी

राष्ट्रपती अशरफ घनी

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला असून ते सध्या ओमान येथील अमेरिकेच्या वायूदलाच्या तळावर वास्तव्य करत आहे. तेथून ते लवकरच  अमेरिकेत जातील, असे सांगितले जात आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सामाजिक माध्यमांतून एका पोस्ट लिहित देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. घनी यांनी लिहिले की, माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला. लोकांना अधिक रक्तपात पहावा लागू नये; म्हणून मी अफगाणिस्तानातून पळून गेलो. मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो, तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला सिद्ध झाले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबुल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते.

घनी यांनी देश विकला ! – संरक्षणमंत्र्यांचा आरोप

अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले असतांनाच दुसरीकडे अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री जनरल बिस्मिल्ला महंमदी यांनी ट्वीट करून थेट नाव न घेता राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप केला आहे. ‘घनी यांनी आमचे हात पाठीमागे बांधून ठेवले आणि मातृभूमी विकली. त्या श्रीमंत व्यक्तीचा (राष्ट्राध्यक्ष घनी) आणि त्याच्या गटाचा धिक्कार असो’, असे ट्वीट महंमदी यांनी केले आहे.

तालिबानने इस्लामिक स्टेट आणि ‘अल् कायदा’ यांच्या ५ सहस्र आतंकवाद्यांना कारागृहातून सोडून दिले

तालिबानने काबुलच्या कारागृहातील ५ सहस्रांहून अधिक बंदीवानांची मुक्तता केली आहे. यामध्ये इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक बंदीवान हे अल् कायदा आणि तालिबानी यांचे आतंकवादी होते.

अफगाणिस्तानची हवाई सीमा बंद झाल्याने भारताच्या नागरिकांना आणण्यास अडथळा

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतियांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने विमाने पाठवण्याची सिद्धता चालू केली असतांनाच अफगाणिस्तानची हवाई सीमाच बंद आल्याने तिथे विमाने उतरवली जाऊ शकत नाहीत. (परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर अफगाणिस्तानमधील भारतीय नागरिकांना आणण्याचा निर्णय घेणार्‍या सरकारी यंत्रणा ! मागील १ मास अफगाणिस्तानमधील स्थिती बिकट होत असतांना त्याच वेळी तेथील भारतियांना आणण्याचा निर्णय का घेण्यात आला नाही ? – संपादक) त्यामुळे काबुलला जाणारी विमाने रहित करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाचे विमान रात्री ८.३० ऐवजी १२.३० वाजता काबुलसाठी उड्डाण करणार होते.

तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतियांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही’, अशी हमी तालिबानने दिली आहे. (यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)

अमेरिकेत जो बायडन यांच्या विरोधात संताप

व्हाईट हाऊसच्या बाहेर शेकडो अफगाणी नागरिकांची निदर्शने

अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेव्हा एखाद्या देशात प्रवेश करते आणि स्वतःला हवे तेव्हा तेथून काढता पाय घेत तेथील लोकांना वार्‍यावर सोडते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेणार असल्याचे घोषित केल्यामुळे आज तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले. यामुळे लक्षावधी अफगाणी पलायन करण्यास बाध्य झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेतील शेकडो अफगाणी नागरिकांनी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांचे निवासस्थान व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. ‘अमेरिकेने कोणत्याही नियोजनाविना सैन्य माघारी घेतल्याने तालिबानने सत्ता हाती घेतली’, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. जो बायडन यांनी अफगाणी नागरिकांचा विश्‍वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला.

सौजन्य : WION

(म्हणे) ‘अफगाणिस्तानची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाक आणि चीन यांच्याकडून तालिबानचे करण्यात आलेले समर्थन भारतासाठी धोकादायक आहे, हे लक्षात घ्या !

पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद – गुलामगिरीच्या जोखडातून अफगाणिस्तानची सुटका झाली आहे. जेव्हा आपण दुसर्‍यांची संस्कृती आत्मसात करतो, तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरी त्यागणे सोपे नाही. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे, ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखे आहे, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर केले.

तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणार ! – चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि तालिबानशी मैत्रीपूर्ण अन् सहकार्यपूर्ण संबंध विकसित करू इच्छितो.