पसार झालेल्या नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना अटक !

८ लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण

अशा लाचखोरांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून आतापर्यंत लुबाडलेली सर्व संपत्ती वसूल करून घ्यायला हवी ! – संपादक 

नाशिक – नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे. ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर त्या पसार होत्या. आता या कारवाईनंतर त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून निलंबनाचा प्रस्ताव राज्यशासनाला दिला जाणार आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले पुढील कारवाईसाठी नाशिकमध्ये गेले आहेत. त्यांच्यासह अटक केलेले आरोपी पंकज दशपुते आणि ज्ञानेश्वर येवले या दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.