गुंतवणूकदारांची अनुमाने ५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
पुणे, १३ ऑगस्ट – एकूण १८ गुंतवणूकदारांची अनुमाने ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी येथील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी शुभांगी काटे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. मराठे ज्वेलर्समध्ये जानेवारी २०१७ ते २०२१ या कालावधीत फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रणव मराठे यांच्यासह कुटुंबातील एकूण चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, त्यामध्ये मयत मिलिंद मराठे यांचाही समावेश आहे.
‘मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल’, असे आमीष दाखवत प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे प्रणव यांनी स्वतःच्या लाभासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले असून त्या आधारे प्रणव मराठे यांना अटक करण्यात आली आहे. मिलिंद मराठे यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी आर्थिक ताणतणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले होते.