राहुरी (जिल्हा नगर) – बैलगाडा शर्यतीला अनुमती मिळावी यासाठी राहुरी बाजार समिती समोर अनेक शेतकर्यांनी बैलांसह रस्त्यावर उतरून नगर-मनमाड महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला.
तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतीचा कायदा केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी राज्य सरकारने वर्ष २०१७ मध्ये कायदा केला, मात्र मागील ३ वर्षांत यावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी पाठपुरावा करावा, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार धुमाळ यांनी याविषयीचे निवेदन स्वीकारले.