ऑक्सिजनची प्रतिदिवसाची आवश्यकता ७०० मेट्रिक टनपर्यंत होईल, त्या वेळी महाराष्ट्रात कडक दळणवळण बंदी लागू होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

  • राज्यातील दळणवळण बंदीचे नियम शिथील !

  • रेस्टॉरंट-मॉल उघडण्याला मान्यता; पण धार्मिक स्थळे बंदच रहाणार !

मुंबई – कोरोनाची तिसरी लाट आल्यास केंद्रशासनाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दीडपट म्हणजे प्रतिदिन ३ सहस्र ८०० इतकी प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणे आवश्यक आहे. भविष्याचा विचार करता ज्या वेळी राज्याला प्रतिदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, तेव्हा राज्यात कडक दळणवळण बंदी लागू करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ११ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयांची माहिती देतांना ते बोलत होते. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाविषयीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला; मात्र पुढील निर्णय येईपर्यंत धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. हे सर्व नियम १५ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.

या वेळी राजेश टोपे म्हणाले,

१. सध्या राज्यशासनाची प्रतिदिन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता १ सहस्र ३०० मेट्रिक टन इतकी आहे. खासगी प्रकल्प आणि ‘पीएसी’ यांतून ऑक्सिजन निर्मितीची क्षमता १ सहस्र ७०० पर्यंत पोचत आहे. राज्याची प्रतिदिन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता २ सहस्र मेट्रिक टनपर्यंत पोचू शकते.

२. लोकल रेल्वेतून प्रवासासाठी २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अशांना मासिक आणि त्रैमासिक पास देण्यात येत आहेत. नियमबाह्य प्रवास करणार्‍यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

३. उपाहारगृह आणि रेस्टॉरंट यांना ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे.

४. खुल्या कार्यक्रमात विवाहासाठी २००, तर कार्यालयात विवाहासाठी क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० यांपेक्षा अधिक उपस्थितीला अनुमती नसेल.

५. शासकीय, निमशासकीय, बँक येथे कर्मचार्‍यांनी कोरोनावरील दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार आहे. खासगी कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले असल्यास ती पूर्ण क्षमतेने २४ घंटे चालू ठेवता येतील.

६. सर्व प्रकारची दुकाने, मॉल रात्री १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती असेल. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे यांना अद्याप अनुमती नाही.

७. अंतर्गत खेळांमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी कोरोनावरील २ डोस घेतले असल्यास त्यांना मान्यता असेल.

८. उपाहारगृहात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने खाण्यास प्रारंभ करेपर्यंत, तर खाद्यपदार्थ देणार्‍यांनी कायम मास्क लावणे बंधनकारक असेल.

शाळा आणि महाविद्यालये यांविषयीचा निर्णय ‘टास्क फोर्स’ घेणार !

शाळा आणि महाविद्यालये चालू करण्याविषयी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि ‘टास्क फोर्स’ यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शाळा आणि महाविद्यालये उघडण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत यांविषयी निर्णय होईल, असे या वेळी राजेश टोपे यांनी सांगितले.