आपल्या निर्मळ आणि आनंददायी हास्यातून, तसेच निरपेक्ष प्रीती अन् अनमोल शिकवण यांतून साधकांना अविरत घडवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विजय लोटलीकर यांना वर्ष १९९५ पासून परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास लाभला. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांच्या सहवासात अनुभवलेली प्रीती आणि मिळालेली शिकवण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत. ११ ऑगस्ट २०२१ या दिवशी आपण श्री. लोटलीकर यांची परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली प्रथम भेट, परात्पर गुरूंनी साधकांवर केलेले साधनेचे संस्कार आदी सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले

(भाग २)

भाग १ पहाण्यासाठी येथे क्लीक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/501873.html


४. साधकांनी काही रक्कम घालून परात्पर गुरु डॉक्टरांना अर्पण स्वरूपात दिलेला बटवा त्यांनी कार्याकरता परत करणे आणि त्यानंतर धर्मकार्यासाठी काहीही उणे न पडणे

एकदा परात्पर गुरु डॉक्टर मार्गदर्शन आणि सत्संग सोहळा यांसाठी डोंबिवली येथील बोडस सभागृहात येणार होते. त्या आनंदात आम्ही सर्व साधकांनी सभागृह छान सजवले. परात्पर गुरु डॉक्टरांना काहीतरी अर्पण द्यावे; म्हणून आम्ही एक बटवा शिवला आणि त्यात काही रक्कम घातली. त्यांचे मार्गदर्शन झाले. परात्पर गुरु डॉक्टर जाण्यापूर्वी आम्ही त्यांना अर्पण स्वरूपात बटवा दिला. ते म्हणाले, ‘‘याचे काय करायचे ? हे तुम्हीच ठेवा आणि याचा वापर कार्यासाठी करा.’’ त्यांनी असे म्हटल्यावर आम्ही शांत झालो. तो बटवा ठेवला आणि ती रक्कम आम्ही कार्याकरता वापरली. आजही तो बटवा आमच्याकडे आहे आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून आम्हाला काही न्यून पडले नाही. जणू ईश्वराच्या संकल्पामुळे हे झाले. गुरुदेवांनी आशीर्वादरूपी अनेक वस्तू आम्हाला दिल्या. त्या वस्तू आजही आम्ही जपून ठेवल्या आहेत. त्या वस्तूंकडे नुसते बघितले, तरी आनंद मिळतो. गुरूंनी दिलेल्या वस्तूंमागे त्यांचा संकल्प असतो आणि त्यांची प्रीतीही असते.

श्री. विजय लोटलीकर

५. मुंबई येथील सेवाकेंद्रात अनुभवलेले आनंदमय क्षण

५ अ. आगगाडीतील गर्दीत तुटलेले सदर्‍याचे बटण सुई-दोर्‍याने शिवून नंतर घरी जाण्याची परात्पर गुरु डॉक्टरांनी करून दिलेली जाणीव ! : वर्ष १९९७-९८ मध्ये माझे सेवेनिमित्त मुंबई येथील सेवाकेंद्रात जाणे व्हायचे. तिकडे जायचे म्हणजे आनंदीआनंदच असे. एके दिवशी सेवाकेंद्रात जातांना आगगाडीमध्ये फारच गर्दी होती आणि त्या गर्दीत माझ्या सदर्‍याचे बटण तुटले. सेवाकेंद्रात गेल्यानंतर परात्पर गुरुदेवांनी ते बघितले. संध्याकाळी मी घरी येण्यासाठी निघालो. तेव्हा त्यांनी मला आठवण केली, ‘‘शर्टाचे बटण तुटले आहे, ते आधी लावा. सत्यवानकडून (आताचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून) सुई-दोरा घ्या आणि मगच जा.’’ यातून त्यांनी शिकवले की, साधकांनी गबाळ्यासारखे न रहाता व्यवस्थित रहावे. त्यांनी मला सांगितले नसते, तर मी तसाच गेलो असतो. ईश्वराला ‘नीटनेटकेपणा’ हा गुण अती प्रिय आहे.

५ आ. ‘परात्पर गुरुदेवांची वाणी सतत ऐकत रहावी आणि कामावर जाऊ नये’, असे वाटणे : मी परात्पर गुरुदेवांना भेटण्यासाठी सेवाकेंद्रात सकाळी जायचो. त्या वेळी ते स्वतः मला चहा आणि खाऊ आणून द्यायचे. ते गोड खाऊ समवेत तिखट खाऊसुद्धा देत. चहा झाल्यावर बोलता बोलता ते मला बरीच सूत्रे शिकवत. ‘त्यांची वाणी ऐकत रहावी आणि कामावर जाऊच नये’, असे मला वाटायचे. ते सर्व साधकांची चौकशी करायचे आणि ‘काय काय घडले ?’, ते सांगायचे. ते मला मधेच आठवण करून द्यायचे, ‘‘तुम्हाला कामावर जायचे आहे ना ?’’ तेव्हा ‘हो’ म्हणून मी नाईलाजाने निघायचो. देव सतत आनंद देत असतो; पण आपण तो आनंद लुटण्यास अल्प पडतो.

५ इ. साधकांनी केलेल्या छोट्या छोट्या कृतींचे कौतुक करणे : मुंबई येथील सेवाकेंद्रात जातांना मी कधी कधी परात्पर गुरु डॉक्टरांसाठी खाऊ म्हणून चिवडा घेऊन जात असे. टोमॅटो घालून ते तो चिवडा खात. एके दिवशी त्यांनी ‘‘चिवडा कुणी केला ?’’, असे मला विचारले. मी सांगितले, ‘‘सौ. लोटलीकर (पत्नी सौ. संगीता लोटलीकर) यांनी केला.’’ ते म्हणाले, ‘‘चिवडा खूप छान झाला आहे’, म्हणून त्यांना सांगा.’’ सौ. लोटलीकर यांना जेव्हा परात्पर गुरूंनी केलेले हे कौतुक सांगितले, तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरुदेव साधकांच्या छोट्या छोट्या चांगल्या कृतींचेही कौतुक करतात. आईला आपल्या लहान मुलाच्या बोबड्या बोलांचेसुद्धा जसे कौतुक वाटते, तसेच हे आहे.

५ ई. पूर्णवेळ साधना करू लागलेल्या साधकाला महाप्रसादासाठी बोलावून आनंद व्यक्त करणे : एक साधक पूर्णवेळ साधना करू लागला. तो पहिलाच पूर्णवेळ साधक होता. त्या वेळी परात्पर गुरूंना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी त्याला सेवाकेंद्रात महाप्रसादासाठी बोलावले. त्या साधकाच्या आनंदालाही पारावार राहिला नाही.

५ उ. सेवाकेंद्रात रहाणार्‍या साधकांना ‘आपण घरापासून दूर रहात आहोत’, याची जाणीव होऊ नये, यासाठी त्याला सर्वतोपरी आनंद देणे : सेवाकेंद्रात कोणाचा वाढदिवस किंवा कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल, तर सर्व जण तो आनंदाने साजरा करत. त्यामुळे साधकांना आनंद होऊन ते आणखी जोमाने साधना करत. परात्पर गुरुदेव त्यांची सर्व काळजी घेऊन त्यांच्या घरच्यांनाही साधनेसाठी उद्युक्त करत. त्या साधकाला ‘आपण घरापासून दूर रहात आहोत’, अशी जाणीवही ते होऊ देत नसत.

५ ऊ. सेवाकेंद्रात सेवेसाठी येणार्‍या साधिकेला विरोध करणार्‍या भावाला प्रेमाने आपलेसे करणे आणि कालांतराने तो साधना करू लागणे : एक साधिका सेवेसाठी सेवाकेंद्रात यायची; पण तिच्या घरी हे ठाऊक नव्हते. एकदा भावाने तिला याविषयी विचारले आणि ‘ती सेवेसाठी सेवाकेंद्रात जाते’, हे कळल्यावर त्याला पुष्कळ राग आला. भाऊ म्हणाला, ‘‘मी तुझ्यासमवेत येतो. तू कुठे सेवा करतेस ? ते डॉक्टर कोण आहेत ? हे एकदा बघतोच. तो भांडण करण्याच्या दृष्टीने मुंबई येथील सेवाकेंद्रात आला. साधिकेने परात्पर गुरुदेवांना तिचा भाऊ आल्याचे सांगितले. त्यांना सेवा पूर्ण करून त्याला भेटायला जाण्यास थोडा वेळ लागला. तेव्हा प्रथम त्यांनी साधिकेच्या भावाला चहा आणि खाऊ देण्यास सांगितले. थोड्या वेळात ते आले आणि म्हणाले, ‘‘क्षमा करा, माझी सेवा पूर्ण करून आलो. तुम्हाला थोडे थांबावे लागले ना !’’ त्यांनी भावाची प्रेमाने चौकशी केली. ‘साधिकेचा भाऊ ‘कॅसेट’ (ध्वनीफिती) विक्रीचा व्यवसाय करतो’, हे कळल्यावर ‘या व्यवसायात काय अडचणी आहेत ?’, हे विचारले आणि ‘आम्हाला कधी साहाय्य लागले, तर तुम्ही कराल ना ?’, असेही विचारले. नंतर भाऊ ‘आपण येथे भांडण्यासाठी आलो होतो’, हेच विसरून गेला. अशा रितीने त्याचा राग पूर्ण गेला आणि नंतर तो साधना करू लागला. परात्पर गुरुदेव म्हणजे प्रीतीचा सागर आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या समोर आली की, ती त्यांच्या प्रीतीच्या सागरात न्हाऊनच निघते. सेवाकेंद्रात साधक आले की, त्यांना शांततेची अनुभूती यायची. प्रत्येक साधक त्यांच्या प्रीतीने मोहरून जायचा.

५ ए. साधकांना सुहास्य वदनाने निरोप देऊन आनंद देणारे परात्पर गुरु डॉक्टर ! : साधक घरी निघतांना परात्पर गुरुदेव उद्वाहक यंत्रापर्यंत (‘लिफ्ट’पर्यंत) सोडायला यायचे. एवढेच नव्हे, तर ते इतके सुहास्य वदनाने आणि हात हालवून ‘अच्छा’ करायचे की, त्यांचे ते रूप डोळ्यांत साठवून ठेवावे’, असे वाटायचे आणि सर्वांना पुष्कळ आनंद व्हायचा.

६. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे’, अशा आशयाचे चित्र घरात लावण्यास सांगून त्यामागचा उद्देश सांगणे

सनातन संस्थेने ‘कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे’, अशा आशयाचे एक चित्र प्रसिद्ध केले होते. त्या वेळी बर्‍याच जणांच्या मनाची धारणा होती की, अशा प्रकारचे चित्र घरात लावल्यावर घरातील कलह वाढेल. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी ते चित्र घरात लावण्यास सांगितले. हे चित्र लावण्यामागचा ‘भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, ते ज्ञान जर आपल्या घरात आले, तर घरात चैतन्यच येणार आहे’, असा उद्देशही त्यांनी सांगितला. त्यानंतर साधकांनी ते चित्र आपल्या घरात लावले. यातून ‘देवाचे ज्ञान आणि आपले अज्ञान किती असते’, हे लक्षात आले.

७. परात्पर गुरु डॉक्टरांनी मांजराची गोष्ट सांगून त्यातून ‘मनुष्याला ईश्वर साहाय्य करत असल्याची जाणीव नसल्याने तो किती अहंभावाने वागत असतो’, हे लक्षात आणून देणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका साधकाला सांगितलेला आणि त्या साधकाकडून मला कळलेला प्रसंग असा होता, ‘एक मांजर गच्चीत अडकले होते. ते खोलीत येण्याकरता दाराजवळ येऊन पायांनी ओरबाडत होते. परात्पर गुरुदेवांनी ते पाहिले आणि दार थोडेसे बाहेर लोटले, तरीही मांजर आत येऊ शकले नाही. त्यांनी दार आणखी थोडे बाहेर ढकलले, तरीसुद्धा मांजर आत येण्यास असमर्थ होते. ते धडपड करत राहिले; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी दार आणखी उघडले. जसे दार उघडले, तसे ते मांजर आनंदाने पळत आत आले. त्याला वाटले की, त्याने स्वतःच दार उघडले. या वेळी परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘केवढा अहं आहे ना ! आपण आपल्या जीवनातही असेच वागतो. आपल्याला वाटते की, मी प्रयत्न केले; म्हणून मला एखादी गोष्ट मिळाली. खरेतर ईश्वरच आपल्याला साहाय्य करत असतो; पण अहंभावामुळे ते लक्षात येत नाही.’’

८. परात्पर गुरु डॉक्टरांचे धरणीमातेलाही आनंद देणारे हळूवार चालणे आणि चालता चालता साधकांची प्रेमाने चौकशी करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे

परात्पर गुरु डॉक्टर अगदी सावकाश चालतात. त्यामुळे धरणीमातेला किती बरं वाटत असेल ! चालतांना त्यांना कोणी साधक दिसल्यास ते लगेच त्यांची चौकशी करतात. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या चालण्याच्या पद्धतीकडे पाहून माझी विचारपूस केली, ‘‘तुमचे पाय आणि गुडघे दुखतात का ? सांभाळून चाला.’’ तेव्हा मला जाणीव झाली, ‘गुरुदेव चालता चालताही प्रेमभाव वाटतात आणि आपण साधक मात्र अहंमुळे आपल्याच विचारांत अडकलेले असतो. कोणी साधक आपल्या आसपास असला, तरी आपल्याला त्याची जाणीवही नसते.’

‘हे ईश्वरा, मला परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यातून हे सर्व लिहिण्याची बुद्धी तू मला दिलीस, त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (समाप्त)

– श्री. विजय लोटलीकर, डोंबिवली, ठाणे. (७.७.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक