डोंबिवली, ठाणे येथील साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विजय लोटलीकर यांना वर्ष १९९५ पासून परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास लाभला. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली भेट, त्यांच्या सहवासात अनुभवलेली प्रीती आणि मिळालेली शिकवण यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
(भाग १)
१. परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेली प्रथम भेट !
१ अ. ‘प.पू. जोशीबाबांकडे भंडार्याच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉक्टर भेटणार’, या आनंदाने त्यांच्याकडे जाणे, प.पू. जोशीबाबांनी दोन डॉक्टरांशी ओळख करून दिल्यावर भाव जागृत होणे आणि ‘आपल्याला हवेत, ते हे ‘डॉक्टर’ नव्हेत’, हे कळल्यावर हिरमोड होणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर भेटण्यापूर्वी माझी प.पू. जोशीबाबांशी ओळख झाली होती. वर्ष १९९५ मध्ये एकदा प.पू. जोशीबाबांकडे भंडारा होता. तेव्हा त्यांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘आज डॉक्टरही येणार आहेत.’’ तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी संध्याकाळी प.पू. जोशीबाबांकडे गेलो. तेथे एक डॉक्टर आले होते. प.पू. जोशीबाबांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली, ‘‘लोटलीकर, ‘हे डॉक्टर !’’ तेव्हा माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांत पाणी आले आणि अश्रूंच्या धारा चालू झाल्या. मी त्या डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवले आणि भावमुद्रेने त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यावर प.पू. जोशीबाबा म्हणाले, ‘‘लोटलीकर, हे माझे ‘हॉस्पिटल’चे ‘डॉक्टर’ आहेत. यांनी मला बरे केले.’’ तेव्हा मी एकदम शांत झालो आणि मनात म्हणालो, ‘आपल्याला हवेत, ते हे ‘डॉक्टर’ नव्हेत.’ याविषयी मी प.पू. जोशीबाबांना सांगू शकलो नाही.
थोड्या वेळाने तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे मोठे भाऊ (सनातनचे सद्गुरु (कै.) वसंत आठवले) आले. प.पू. जोशीबाबांनी पुन्हा माझी ओळख करून दिली, ‘‘हे ‘डॉक्टर’ आठवले !’’ आता मात्र मी पुष्कळ आनंदी झालो आणि भावपूर्णतेने त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. त्या वेळी भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले; पण ‘परम पूज्य बोलत का नाहीत ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेवढ्यात प.पू. जोशीबाबा म्हणाले, ‘‘लोटलीकर, हे आपल्या डॉक्टरांचे भाऊ आहेत.’’ ‘आता मी काय करू ?’, असे म्हणत मी मनात तडफडत राहिलो. मी वरवर शांत राहून थोडा वेळ तेथेच थांबलो आणि नंतर घरी आलो. काही वेळानंतर तेथे परात्पर गुरु डॉक्टर आले; मात्र मी घरी गेल्यामुळे त्या दिवशी माझी त्यांच्याशी भेट झाली नाही.
१ आ. देवाने परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीचे केलेले आश्चर्यकारक नियोजन ! : ‘परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाली नाही’, या विचारांत माझे काही दिवस गेले. त्या वेळी ‘ईश्वराला भेटण्याचे आपले भाग्यच नाही’, असे मला वाटले. काही दिवसांनी डोंबिवली येथे एका सभेचे नियोजन झाले. सत्संगात सर्वानुमते असे ठरले की, परात्पर गुरुदेव डोंबिवलीच्या सभेला येतील, तेव्हा त्यांची लोटलीकर यांच्याकडे व्यवस्था करूया. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. माझे भावाश्रू थांबतच नव्हते. नंतर सभेच्या वेळी त्यांची प्रथमच भेट झाली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.
देवा, तू किती दयाळू आहेस. माझी प.पू. जोशीबाबांकडे परात्पर गुरुदेवांशी भेट झाली नाही. तेव्हा मी अक्षरशः तडफडलो होतो; पण नंतर ते घरीच आले. देवाचे नियोजन काही वेगळे असते. ते लक्षात येत नाही.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत केलेला आनंददायी प्रवास आणि त्यांनी केलेले साधनेचे संस्कार !
२ अ. एखाद्याची छोटीशी वस्तू घेतली, तरी ती परत देणे आणि देतांना सोबत खाऊही देणे : वर्ष १९९६ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर मुंबईहून गोव्याला जात असतांना लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील साधकाने गाडीत वापरण्यासाठी त्यांना एक वस्तू दिली. त्यांनी गोव्यात त्यांच्या खोलीत गेल्यावर ती वस्तू त्या साधकाला परत करण्यासाठी कागदात गुंडाळली आणि त्यावर साधकाच्या नावाची पट्टी लावून ‘ती समोर दिसेल’, अशी ठेवली. आम्ही जेव्हा गोव्यातून परत निघालो, तेव्हा त्यांनी आमच्या समवेत ती वस्तू आणि खाऊही दिला. या कृतीमुळे ज्या साधकाची वस्तू होती, त्याला किती आनंद झाला असेल ! साक्षात् परात्पर गुरु डॉक्टरांनी आपली वस्तू वापरली. यातून आम्हाला शिकायला मिळाले की, एखाद्याची घेतलेली लहानातील लहान वस्तू नुसतीच परत करायची नाही, तर त्यासोबत खाऊही द्यायचा. परात्पर गुरु आपल्या लहान लहान कृतीतून नेहमीच सर्वांना शिकवत असतात.
२ आ. कोणताही पदार्थ समवेतच्या साधकांना आधी देणे : परात्पर गुरु डॉक्टरांसमवेत मी पंधरा दिवस ‘मुंबई ते कर्नाटक’ असा प्रवास केला होता. वाटेत जेथे जेथे सत्संग होत असे, तेथे परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला पुढे बसण्यास सांगायचे. त्यांना कुणी काही खायला दिले, तर ते सांगायचे, ‘यांना अगोदर द्या.’ यातून त्यांचा ‘प्रीती’ हा गुण शिकण्यास मिळाला. हा संपूर्ण प्रवास करतांना कोणताही ताण आला नाही, तर प्रत्येक क्षणी कृतज्ञता वाटत होती.
२ इ. ठिकठिकाणी उत्कंठतेने वाट पहाणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रेमळ वागण्याने आनंदून जाणारे साधक ! : दौर्यानिमित्त आम्ही जेथे जेथे जात होतो, तेथे त्यांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी, वयोवृद्ध, तसेच अनेक साधक यायचे. गुरुदेवांची भेट होणार; म्हणून ते वाट पहात रहायचे. परात्पर गुरुदेव त्यांना नावानिशी ओळखायचे. त्यामुळे साधकांच्या आनंदाला पारावार रहायचा नाही. ते घरातील सर्व सदस्यांची चौकशी करून त्यांना खाऊही द्यायचे. त्यामुळे प्रत्येक जण जणू आनंदाच्या डोहात डुंबायचा. केवळ देवच एवढ्या सर्वांवर प्रीती करू शकतो.
२ ई. ‘साधकांचा वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जाऊ नये’, याची काळजी घेणे : आम्ही गोव्यात एके ठिकाणी गेलो असतांना परात्पर गुरु डॉक्टर येणार; म्हणून त्यांच्यासाठी पायघड्या घालून त्यावर फुले घातली होती. परात्पर गुरूंनी ते सर्व काढायला लावले. ‘साधिकांनी त्यांच्या भावाप्रमाणे कृती केली; परंतु इतर साधकही या कृतीचे अनुकरण करतील आणि साधकांचा वेळ अशा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जाईल’, असे त्यांनी समजावून सांगितले.
२ उ. प्रवासाचे उत्तम नियोजन करणे आणि साधकांची सर्वतोपरी काळजी घेणे
२ उ १. प्रवासाचे परिपूर्ण नियोजन करणे : प्रवासाला निघण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉक्टर सर्व गोष्टींचे नियोजन करायचे. ‘किती किलोमीटर प्रवास करायचा ? ‘पेट्रोल’ कुठे भरायचे ?’, हे सर्व ठरवूनच आमचा प्रवास चालू व्हायचा. ‘कोणत्या गावी साधक आजारी असतील, तर त्यांच्या घरी किती वेळ थांबायचे ? आजारी व्यक्तीला काय खाऊ द्यायचा ?’, हे सगळे ते आधीच ठरवून ठेवत. गुरुदेव भेटणार; म्हणून त्या आजारी साधकांचा अर्धा आजार आधीच पळून जायचा.
२ उ २. नवीन ठिकाणी एकमेकांच्या ओळखी करून देणे : या सर्व प्रवासात ‘परात्पर गुरुदेवांनी आमची ओळख कुणाला करून दिली नाही’, असे झालेच नाही. जेथे जाऊ, तेथे पहिल्यांदा ते आमची ओळख करून द्यायचे. यातून ‘प्रत्येक साधकाची कशी काळजी घ्यायची ?’, हे शिकायला मिळाले.
२ उ ३. चालक साधकाची स्वतः जातीने काळजी घेणे : संपूर्ण प्रवासात परात्पर गुरुदेव चालक साधकाची पुष्कळ काळजी घ्यायचे. गाडी चालवतांना त्याला डुलकी येऊ नये, तो थकू नये, तसेच त्याला योग्य वेळी जेवण आणि विश्रांती मिळावी, यासाठी या सर्व गोष्टींकडे परात्पर गुरुदेव स्वतः लक्ष देत.
२ ऊ. साधकांच्या प्रश्नांना सर्वज्ञतेने उत्तरे देणारे परात्पर गुरु डॉक्टर ! : दौर्यामध्ये अनेक साधक परात्पर गुरुदेवांना निरनिराळे प्रश्न विचारत आणि ते त्यांची लगेच उत्तरे देत. त्यावरून त्यांची सर्वज्ञता आणि सर्वव्यापकत्व लक्षात आले. एका साधकाने त्यांना विचारले, ‘‘मला प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर नाटक लिहिण्यासाठी काही सूत्रे सुचतात; पण थोड्या वेळाने मी ती विसरून जातो. रात्री मला झोपेत सूत्रे सुचतात आणि सकाळ झाली की, मी ती विसरून जातो.’’ तेव्हा परात्पर गुरुदेवांनी उत्तर दिले, ‘‘देव एकदाच सुचवतो. त्या वेळी लगेच ते लिहून ठेवले पाहिजे. तुम्हाला आणखीही सुचेल. सुचले की, लगेच लिहा.’’ त्या साधकाने याप्रमाणे कृती केल्यावर बाबांवरील नाटक पूर्ण झाले.
३. प्रवासात साधकाच्या चपला हरवल्याचे कळल्यावर स्वतःच्या चपला घालून जाण्यास सांगणारे प्रेमस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर !
पंधरा दिवसांचा दौरा संपवून येतांना परतीच्या प्रवासात माझी चप्पल कुठेतरी पडली. ‘ती कुठे पडली ?’, ते मला कळलेच नाही. त्यामुळे चपलांशिवायच मी मुंबई येथील सेवाकेंद्रात आलो. दुसर्या दिवशी सकाळी मी डोंबिवलीला घरी जाण्यास निघालो. तेव्हा गुरुदेवांनी माझ्या पायांकडे पाहून विचारले, ‘‘हे काय ? तुमच्या चपला कुठे गेल्या ?’’ मी म्हणालो, ‘‘काल चप्पल कुठे हरवली ?’, ते मला कळले नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही चपलांशिवाय जाऊ नका. या घ्या माझ्या पायातील चपला घाला.’’ तेव्हा माझा भाव दाटून आला, ‘देवा, तुझे प्रेमच निराळे आहे.’ मी त्यांच्या चपला घेतल्या नाहीत. मी प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) चरित्रात वाचले होते की, ते गुरूंची चप्पल घेऊन टांग्याच्या मागून धावत. एकदा धावत असतांना त्यांच्या पायात काटा रुतला. ते तसेच धावत राहिले आणि त्यांचा पाय शेणात पडून तो काटा पायातून निघून गेला.’ अशा रितीने देवाने त्यांची (प.पू. बाबांची) काळजी घेतली. परात्पर गुरुदेव पुन्हा मला म्हणाले, ‘‘माझी नाही, तर सत्यवानच्या (आताचे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या) चपला घालून जा.’’ अशी ही गुरूंची प्रीतीच निराळी आहे. प्रत्येक प्रसंगात ते प्रेमाने शिकवतात आणि आनंद देतात.
(क्रमशः)
– श्री. विजय लोटलीकर, डोंबिवली, ठाणे. (७.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग २ पहाण्यासाठी येथे क्लीक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/502158.html