महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलज्योतिषविरोधी प्रबोधन मोहिमेच्या कार्यक्रमात ज्योतिषशास्त्रावर टीका !
- विज्ञानाच्या मर्यादा लक्षात न घेता केवळ प्रसिद्धीसाठी फलज्योतिषाला थोतांड म्हणणारे अंनिसवाले अंधश्रद्धाळूच ! – संपादक
- लाखो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी सिद्ध केलेले हिंदु पंचांग आणि कालगणना यांमुळे आज सारे विश्व अचंबित होत असतांना त्यावरच आधारित ज्योतिषशास्त्राला विरोध करणार्या अंनिसची बौद्धिक कीव करावी तेवढी थोडीच ! – संपादक
पुणे – विज्ञानात कारण आणि परिणाम काय होतात, हे सिद्ध करता येते. कुतूहल, प्रयोग, प्रचीती, तर्क, निरीक्षण आणि अनुमान या टप्प्यांवर विज्ञान सिद्ध होते; पण ज्योतिषशास्त्राला हे लागू होत नाही, असे दिशाभूल करणारे वक्तव्य खगोल अभ्यासक आणि प्रा. प्रकाश पारखे यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्हा यांच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा फलज्योतिषाला विरोध का ?’, या विषयावर नुकतीच राज्यस्तरीय ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
खगोल अभ्यासक प्रकाश पारखे यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. ‘चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम पाण्यावर होतो; म्हणून आपल्या शरिरातील पाण्यावरही त्याचा परिणाम होत असणार’, असे अतार्किक ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते. (‘मानवावर चंद्राचाच काय अन्य ग्रहांचाही परिणाम होतो, हे विज्ञानानेही मान्य केले आहे’, हे पारखे यांना कसे ठाऊक नाही ? – संपादक)
२. ज्योतिषांचे दावेही अतीरंजित असतात. त्याला कोणताही पुरावा नसतो. (काही आधुनिक वैद्यही भोंदू असतात, याचा अर्थ सर्व आधुनिक वैद्य तसे असतात, असे नाही, तसेच हे आहे. – संपादक) त्याला विरोध केला असता ‘तुम्ही धर्म, परंपरा आणि संस्कृती यांच्या विरोधात आहात’, अशी सगळीकडे आवई उठवली जाते. (फसवणूक करणार्यांची बाजू कुणीही घेत नाही आणि त्यांच्यासाठी कायदेही आहेत; परंतु अंनिससारख्या संघटना कोणताही पुरावा नसतांना धर्मशास्त्र खोटे ठरवायला निघतात, तेव्हा त्यांना विरोध करणे, हे धर्मप्रेमी त्यांचे कर्तव्य मानतात ! – संपादक)
३. विज्ञानात भावनिक आवाहनांना कोणतेही स्थान नसते; मात्र ज्योतिष भावनिक आवाहन आणि भावनिक गुंतागुंत निर्माण करते; मग याला शास्त्र कसे म्हणणार ? (गणित आणि खगोलशास्त्र यांवर आधारित ज्योतिषशास्त्राला भावनिक म्हणणार्यांची बौद्धिक दिवाळखोरी यातून दिसून येते. – संपादक)
४. ‘इग्नू’ने (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) ‘भारतीय प्राच्यविद्या’ या अंतर्गत कालज्ञान, ग्रहज्ञान, सूर्य-चंद्र ग्रहणापासून ते अंतराळात होणार्या घटनांचा मानवी जीवनावर काय व्यावहारिक परिणाम होतो, यांचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रम सिद्ध केला आहे; पण ज्योतिष अभ्यासक्रमात ग्रहज्ञान, कालज्ञान आणि सूर्य-चंद्र ग्रहण असेल तर ठीक; पण ‘अंतराळातील पालटांचा मानवी जीवनावर परिणाम होतो’, याला आमचा आक्षेप आहे, तसेच त्याचा जो अभ्यासक्रम आहे, त्याला विरोध आहे. (अंनिसच्या आक्षेपाला आणि विरोधाला कोण विचारतो ? – संपादक)
५. नवग्रहातील सूर्य, चंद्र, राहु, केतु हे ग्रह नाहीत आणि या व्यतिरिक्त जे आहेत, ते वार आहेत. (सूर्यमालेत काही ग्रहांचे अस्तित्व आहे आणि त्यावरून वारांची नावे ठरवण्यात आली आहेत ! – संपादक) ज्या काळात ज्योतिष आणि कुंडली यांचा विकास झाला, तेव्हा सूर्यकेंद्री सिद्धांत नव्हता. (अंनिसचा जावईशोध ! – संपादक) सर्व ज्ञान हे पृथ्वीभोवती केंद्रित आहे, असे मानून सर्व दिले होते. (‘पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते’, हे ऋषिमुनींना सहस्रो वर्षांपूर्वीपासून ठाऊक होते. पाश्चात्त्य ख्रिस्त्यांप्रमाणे त्यांनी तिला सपाट म्हटले नाही ! – संपादक)
६. ज्योतिषी गोड बोलल्याने आपल्याला छान वाटते आणि हेच त्यांचे ‘मार्केटिंग’ असते. समोरील मनुष्याला जे अपेक्षित असते ते बोलल्याने व्यक्ती फसतात. (काही अधिवक्तेही तसे करतात म्हणून सरसकट वकिलीचा सगळा अभ्यास खोटा नसतो, तसेच एखादा ज्योतिषी गोड बोलत असेल; म्हणून तो फसवतो, हे म्हणणे ज्योतिषाविषयीचा अंनिसचा द्वेष दर्शवतो ! – संपादक)
७. सूर्य सिद्धांत आणि वेदांग ज्योतिष या ग्रहात कुठेही ज्योतिष नाही. नक्षत्र आणि तिथी यावरून यज्ञाची वेळ ठरवण्यासाठी वेदांग ज्योतिषाचा उपयोग केला जातो. (मग हे शास्त्रच नव्हे का ? कोणतीही आधुनिक उपकरणे नसतांना सहस्रो वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी हे लिहून ठेवले आहे, हे ज्यांना समजत नाही, त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे ! – संपादक)
८. ज्योतिषी वक्री झालेल्या मंगळाचा बाऊ करून भीती घालतात. मनुष्याने काळजी घेतली, तर त्याची मनस्थिती, कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण आणि तब्येत चांगली राहील, हे सांगायला भविष्याची काय आवश्यकता आहे ? (हवामान खात्याने अतीवृष्टी होणार असे सांगणे म्हणजे लोकांना भीती घालणे नव्हे, तसेच ज्योतिषाने एखाद्याला मंगळाचा त्रास आहे, हे सांगणे म्हणजे भीती घालणे नव्हे, हे अंनिसला कळू नये, हे अंनिसचे घोर अज्ञान नव्हे का ? – संपादक)
९. जागतिक पातळीवर ज्योतिषशास्त्र नाकारले गेले आहे. (अंनिसचे घोर अज्ञान ! – संपादक) ज्योतिषशास्त्र हे जर विज्ञान आहे, तर विज्ञानाने सांगितलेल्या कसोटीवर, आखून दिलेल्या तत्त्वांवर, सिद्ध न करता त्याला विज्ञान म्हणणे, हे हास्यास्पद आहे. (अंनिसनेच जरा स्वतःच्या वैज्ञानिक आणि अंधश्रद्धेच्या कसोट्या पडताळून पहाव्यात आणि समाजाची दिशाभूल करणे टाळावे ! अंनिसच्या कार्यक्रमाला उणावत जाणारी लोकांची उपस्थिती आणि अधिकाधिक लोकांनी देवाची भक्ती करणे यातून अंनिसच्याच तथाकथित तत्त्वज्ञानाचा पराभव होत आहे. अंनिसने आता त्यांचे दुकान बंद करून सन्मार्गाला लागणेच हितावह आहे. – संपादक)