या मुलाने केलेल्या कथित ईशनिंदेवरून धर्मांधांनी केले होते श्री गणपति मंदिरावर आक्रमण !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये एका मदरशाच्या पुस्तकालयामध्ये लघवी केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ८ वर्षांच्या हिंदु मुलाला ईशनिंदा कायद्याद्वारे फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ईशनिंदेच्या आरोपाखाली पाकच्या न्यायालयात विविध व्यक्तींवर खटले चालू असून या प्रकरणातील आरोपी असणारा सदर हिंदु मुलगा देशातील सर्वांत लहान वयाचा आरोपी ठरला आहे. सध्या हा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या मुलाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. या मुलाला न्यायालयाने जामीन संमत केल्यावरून धर्मांधांच्या जमावाने पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील श्री गणपति मंदिरावर आक्रमण केले होते. या आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. हे आक्रमण झाल्यापासून तेथील हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यांना घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे.
Pakistan charges 8 year old Hindu child with blasphemy, could face death penalty, family goes into hiding fearing backlashhttps://t.co/qjsrh2Jrgv
— OpIndia.com (@OpIndia_com) August 9, 2021
अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी काही केले जाईल, असे वाटत नाही ! – पीडित मुलाच्या कुटुंबातील सदस्य
मुलाच्या कुटुंबातील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’च्या प्रतिनिधिला सांगितले की, मुलाला ईशनिंदा म्हणजे काय हेही ठाऊक नाही. या प्रकरणात मुलाला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्याला अजूनही समजत नाही की, त्याचा गुन्हा काय आहे आणि त्याला एका आठवड्यापासून कारागृहात का ठेवले आहे ? आम्ही आमचे दुकान आणि काम सोडले आहे संपूर्ण समाज घाबरला आहे. आम्हाला आता त्या भागात परत जायचे नाही. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी काही केले जाईल किंवा गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जाईल, असे आम्हाला वाटत नाही.
ईशनिंदा कायद्याचा अपवापर ! – जगभरातील कायदेतज्ञांकडून टीका
जगभरातील कायदेतज्ञांचे म्हणणे आहे की, मुलावर लावण्यात आलेले ईशनिंदेचे आरोप खोटे आहेत; कारण या वयाच्या कोणत्याही व्यक्तीवर यापूर्वी ईशनिंदेचा आरोप लावण्यात आलेला नाही. मुसलमानबहुल देशात अल्पसंख्यांकांच्या विरोधात या काद्याचा अपवापर केला जात आहे. त्यामुळे मानवाधिकार संघटना दीर्घ काळापासून पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यावर टीका करत आहेत. न्यायालयाने दोषी आढळलेल्या काही लोकांना फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी आजपर्यंत कुणालाही फाशी देण्यात आलेली नाही.