सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – केरळ येथील एका अधिकोषातील ३ कोटी रुपयांचे सोने चोरी केल्याच्या प्रकरणी नाशिक येथील मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या सातारा येथील ३ सहकार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ६ ऑगस्टच्या रात्री केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. संशयितांना केरळ येथे नेण्यात आले आहे. केरळ येथील एका अधिकोषातील ३ कोटी रुपयांचे सोने चोरीला गेले होते. या प्रकरणी केरळ पोलिसांचा तपास चालू होता. या गुन्ह्यातील नाशिक येथील संशयित सूत्रधार नीक जोशी हा सातारा परिसरात असल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली. केरळ पोलिसांनी ६ ऑगस्ट या दिवशी सातारा येथे येऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली आणि गुन्ह्याची माहिती दिली. बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे ४ पोलीस केरळ पोलिसांच्या सहाय्यासाठी दिले. या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपास केल्यानंतर नीक जोशी हा सहकार्यांसह बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये असल्याचे अढळून आले. पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकून नीक जोशीसह ४ जणांना कह्यात घेतले आहे. जोशी यांच्यासह सातारा येथील युवकांचा गुन्ह्यात सहभाग आहे किंवा नाही, हे अजून कळू शकलेले नाही.