पुणे येथे गुंडांकडून सातत्याने वाहनांची जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड !

गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याची घटना !

आतातरी पोलिसांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करून नागरिकांना भयमुक्त करावे, ही अपेक्षा ! – संपादक

कोथरूड (पुणे), ८ ऑगस्ट – येथील म्हातोबादरा येथील रिक्शा आणि दुचाकी ७ ऑगस्टच्या पहाटे जाळण्यात आली. म्हातोबादरा येथे गुंडांकडून सातत्याने वाहनांची जाळपोळ, दगडफेक, तोडफोड असे प्रकार चालू असतात. ‘या दहशतीला आम्ही कंटाळलो असून गुंडांच्या दहशतीत आम्ही जगायचे कसे ?’, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी सिद्धार्थ मराठे आणि त्यांचा भाऊ यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. रिक्शाचालक रवींद्र कडू यांनी तक्रार दिली आहे.

रवींद्र कडू म्हणाले की, मध्यरात्री अडीच वाजता रिक्शा जाळण्यात आली. पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला असता, तर अधिक हानी झाली असती. ज्याने गाडी जाळली, त्याच्यावर या पूर्वीही गाड्या जाळण्यात आल्याचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (केवळ गुन्हे नोंद करून न थांबता गुन्हेगारांना वेळीच कठोर शिक्षा केल्यास त्यांच्याकडून पुन्हा गुन्हे घडणार नाहीत, हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे. – संपादक)