पुणे, ६ ऑगस्ट – बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकर यांनी वैष्णवी ठुबे या राष्ट्रीय महिला जुडो रेसलरला मारहाण केली आहे. हडपसर परिसरातील सिग्नलवर वैष्णवीने कार हळू चालवण्याचा सल्ला दिल्यामुळे टिळेकर यांना राग आला आणि त्यांनी दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केली. या मारहाणीत वैष्णवी ठुबे हिचा हात मोडला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी मनसेकडून कारवाईची मागणी केली आहे. ‘आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, नाहीतर मनसे त्याला फोडेल’, अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिली आहे.
किरकोळ मारहाणीचा गुन्हा नोंद झाल्यामुळे टिळेकर यांना अटकपूर्व जामीन मिळाला असून नंतर या प्रकरणी गंभीर मारहाणीचे कलम वाढवण्यात आले आहे. ‘मी कोण आहे हे तुला ठाऊक नाही. तुला जिवेच मारतो’, अशी धमकी टिळेकर यांनी दिल्याची तक्रार वैष्णवीने दिली होती. तरीही वानवडी पोलिसांनी किरकोळ मारहाणीचा गुन्हा नोंद करून आरोपीला साहाय्य केल्याचा आरोप वैष्णवी हिने केला आहे. मारहाण करणार्या टिळेकर यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम लावण्यात यावे, अशी मागणीही वैष्णवीकडून करण्यात आली आहे.