परीक्षा दिलेल्या ३०० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ते अनुपस्थित असल्याचा शेरा !

  • नागपूर विद्यापिठातील परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार ! – संपादक 
  • एक परीक्षाही सुरळीतपणे पार पाडू न शकणारे विद्यापीठ प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक 

नागपूर – येथील ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठा’ची परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ते अनुपस्थित असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याविषयी कला शाखेच्या (‘बीए’च्या) अभ्यासक्रमाच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारी विद्यापिठाच्या परीक्षा विभागाकडे प्रविष्ट झाल्या आहेत.

परीक्षेच्या काळातील कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘यंदा विद्यापिठांच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने आयोजित केल्या जातील’, असे सांगितले होते. त्यानुसार ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठा’ने २ मासांपूर्वी कला शाखेची प्रथम वर्षाची ‘ऑनलाईन’ परीक्षा घेतली होती. त्यानंतर २ ऑगस्ट या दिवशी परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत वरील प्रकार झाल्याचे आढळून आले.