अकोला येथे अपुर्‍या हानीभरपाईमुळे पूरग्रस्तांनी सानुग्रह निधीचे धनादेश प्रशासनाला परत केले !

सर्वाधिक हानी होऊनही अल्प रकमेचे धनादेश देण्यापेक्षा आवश्यक तितका निधी देणे आवश्यक आहे, ही साधी गोष्ट प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? – संपादक 

अकोला – येथे महापुरामुळे पूरग्रस्तांची लाखो रुपयांची हानी झालेली असतांनाही प्रशासनाकडून अल्प रकमेचे धनादेश देऊन अपुरे साहाय्य करण्यात आले आहे. त्यामुळे यावलखेड आणि अंबिकानगर येथील संतप्त पूरग्रस्तांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना ५ ऑगस्ट या दिवशी ते धनादेश परत केले. ‘सानुग्रह निधीच्या दिलेल्या रकमेत कुठलीच व्यवस्था उभी होऊ शकत नसल्याने पूरग्रस्तांनी धनादेश परत केले आहेत’, असे यावलखेड येथील ग्रामस्थ अमोल पाटील यांनी सांगितले; मात्र संजय खडसे यांनी हे धनादेश नाकारले. या वेळी ५० हून अधिक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

जिल्ह्यात २१ आणि २२ जुलै या दिवशी अतीवृष्टीत १० सहस्र नागरिकांच्या घरांची हानी झाली, तसेच ६० सहस्र हेक्टरवरील शेतीचीही हानी झाली. ‘या सर्वांचे पंचनामे करून त्यांना तातडीने साहाय्य करावे’, असा आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. शिवसेनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ५ सहस्र रुपयांच्या सानुग्रह निधीचे धनादेश पूरग्रस्तांना दिले होते.