परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक पाटील

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील कै. अशोक हिरालाल पाटील (वय ५९ वर्षे) गेल्या १७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. ‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून होणारी आंदोलने, गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांत कै. पाटीलकाका समाजातील लोकांकडून तन, मन आणि धन अर्पण करून घेत असत.
५.४.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांचे धुळे येथे निधन झाले. त्यांचे कुटुंबीय, सनातनचे साधक आणि समाजातील मान्यवर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.  (भाग १)

श्रीमती कुसुम पाटील (पत्नी)

श्रीमती कुसुम पाटील

१. साधिकेसह तिचे यजमान आणि मुलगा कोरोनामुळे रुग्णाईत झाल्याने त्यांनी रुग्णालयात भरती होणे, साधिका अन् तिचा मुलगा यांना बरे वाटणे; मात्र यजमानांचा त्रास वाढणे

‘१०.३.२०२१ या दिवशी मी, माझे यजमान आणि मुलगा, असे तिघे जण रुग्णाईत झालो. आम्ही कोरोना चाचणी केल्यावर आम्हा तिघांनाही कोरोना झाल्याचे निदान झाले. १५.३.२०२१ या दिवशी आम्ही धुळे येथे रुग्णालयात भरती झालो. देवाच्या कृपेने मला आणि मुलाला बरे वाटू लागले. आम्हाला रुग्णालयातून घरी सोडले; पण यजमानांचा त्रास वाढला होता. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्यांच्या सर्व तपासण्या केल्यावर ‘त्यांना प्राणवायू अल्प पडत आहे. त्यांना ४० सहस्र रुपयांचे एक इंजेक्शन देण्याची आवश्यकता आहे. इंजेक्शन दिल्यावर ते बरे होतील’, असे सांगितले.

२. नामजप करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हात यजमानांच्या डोक्यावर असून त्यामुळे यजमानांच्या देहात चैतन्य पसरत आहे आणि हनुमंत त्यांचे रक्षण करत आहे’, असे साधिकेला जाणवणे

‘यजमानांची प्रकृती ठीक व्हावी’, यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. तेव्हा मला परम पूज्यांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. नामजप करतांना मला सतत प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. ‘यजमानांनी परम पूज्यांचे चरण घट्ट धरून ठेवले आहेत. त्यांचा हात यजमानांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे यजमानांच्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरत आहे आणि हनुमंत यजमानांचे वाईट शक्तींपासून रक्षण करत आहे’, असे मला जाणवत होते.

३. अतीदक्षता विभागातील वातावरण त्रासदायक असूनही ‘यजमानांच्या पलंगाभोवती संरक्षककवच आहे’, असे जाणवणे आणि तेथील कर्मचार्‍यांनी यजमानांची सेवा आनंदाने करणे

यजमान अतीदक्षता विभागात होते. तेथील वातावरण फार त्रासदायक असूनही ‘यजमानांच्या पलंगाभोवती संरक्षककवच आहे’, असे मला जाणवत होते. तेथील कर्मचारी यजमानांची सेवा आनंदाने करत होते. कर्मचार्‍यांनी मला सांगितले, ‘‘काकांची शुश्रूषा करतांना त्यांच्याकडे बघून आनंद जाणवतो. ‘ते ज्ञानी पुरुष आहेत’, असे आम्हाला वाटते.’’ हे ऐकून मला प.पू. गुरुदेवांप्रती फार कृतज्ञता वाटत होती.

४. यजमानांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. यजमानांच्या निधनानंतर त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवत होते.

आ. अंत्यसंस्काराचा विधी चालू असतांना मला तिथे भगवान दत्तात्रेय आणि श्री दुर्गामाता यांचे अस्तित्व जाणवले.’ (जुलै २०२१)

श्री. परेश पाटील (मोठा मुलगा)

१. वडिलांनी मुलांवर साधनेचे संस्कार करणे

‘बाबांनी आमच्यावर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार केले. लहानपणी ते आमच्याकडून सप्तशती पाठ म्हणून घेत आणि मला नित्यनेमाने मारुति मंदिरात ‘हनुमान चालिसा’ पठण करायला घेऊन जात असत. आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर ते आमच्याकडून नामजप करवून घेत असत. ‘आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण घट्ट धरून ठेवावेत’, अशी त्यांची इच्छा होती.

२. इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती

नात्यातील आणि समाजातील कोणत्याही व्यक्तीला ते अडचणीच्या वेळी साहाय्य करायचे. ‘बाबांचे संपूर्ण जीवन केवळ परोपकार करण्यासाठीच होते’, असे सगळे जण म्हणतात.

३. वडिलांनी मनात कुठलीही भीती न बाळगता प्रत्येक शुक्रवारी न चुकता रात्री जंगलातील मारुति मंदिरात जाणे आणि शनिवारी सकाळी मारुतीची पूजा करणे

बाबांची हनुमानावर फार श्रद्धा होती. ते जळगावला ‘पेपर मिल’मध्ये कामाला जात होते. तेथून ते प्रत्येक शुक्रवारी न चुकता रात्रीचा प्रवास करून ५० कि.मी. दूर असलेल्या ‘रेल मारुति मंदिरा’त (हे मारुति मंदिराचे नाव आहे.) रात्री १२ वाजता पोचायचे आणि उत्तररात्री ३ वाजता उठून अंघोळ करून मारुतीची पूजा करायचे. तो परिसर जंगलात होता, तरीही देवावर श्रद्धा ठेवून मनात कुठलीही भीती न बाळगता ते हनुमंताची पूजा करायचे.

४. वडिलांच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे

४ अ. वडील अत्यवस्थ असल्यामुळे मन अस्थिर होणे, तेव्हा सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी वडिलांना ‘ॐ’ आणि घरातल्या सर्वांना ‘हरि ॐ तत्सत् ।’ हा नामजप करायला सांगणे अन् त्यानंतर मन स्थिर होणे : शेवटच्या ४ दिवसांत बाबांची प्रकृती फार खालावली होती. तेव्हा आमच्याकडून भावपूर्ण प्रार्थना होत होत्या; पण आमचे मन अस्थिर झाले होते. तेव्हा सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा लघुसंदेश आला, ‘घरातील सर्वांनी ‘हरि ॐ तत्सत् ।’ हा नामजप करावा आणि बाबांनी ‘ॐ’ हा जप करावा.’ हा निरोप मी बाबांना कानात सांगितला. तेव्हा ते पूर्ण शुद्धीत नव्हते, तरी त्यांनी मान हालवून होकार दिला आणि लगेच ‘ॐ’ हा जप चालू केला. त्यानंतर माझे आणि आईचे मन स्थिर झाले. ‘आपण बाबांना साक्षात् प.पू. गुरुदेवांच्या चरणी सोपवले आहे. तेच त्यांना सांभाळतील’, असा विचार मनात येऊन आमचा भाव दाटून आला.

४ आ. शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ त्यांच्या छातीवर ठेवला होता. ‘ते सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे आम्हाला जाणवत होते.’ (जुलै २०२१)

श्री. भगतसिंह पाटील (लहान बंधू)

आबांसाठी नामजप करतांना सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊलीने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांचे मन शांत केल्याचे जाणवणे, आबांनी प.पू. गुरुमाऊलीच्या हातात एक ज्योत देऊन ‘मी तुमच्या समवेत येतो’, असे सांगणे आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी आबांचे निधन होणे : ‘आबांना (अशोक पाटील यांना) अतीदक्षता विभागामध्ये भरती केले होते. मी त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या कानाजवळ त्यांच्यासाठी दिलेला जप करत होतो. तेव्हा मला तेथे पांढराशुभ्र प्रकाश जाणवला. सूक्ष्मातून प.पू. गुरुमाऊली काकांच्या पलंगाजवळ उभी असलेली दिसली. तिने आबांच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांचे मन शांत केले. आबांनी अकस्मात् प.पू. गुरुमाऊलीच्या हातात एक ज्योत दिली आणि सांगितले, ‘गुरुमाऊली, मी तुमच्या समवेत येतो.’ त्यानंतर दुसर्‍या दिवशी आबांचे निधन झाले.’ (जुलै २०२१)

श्री. प्रशांत पाटील (जावई)

१. कै. अशोक पाटील यांनी दीनदुबळ्यांची सेवा मनापासून करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे

‘परोपकार आणि धर्मकार्य यांची जाज्वल्य मूर्ती, म्हणजे कै. आबा (अशोक हिरालाल पाटील) ! ते नित्यनेमाने समाजातील दीनदुबळ्यांची सेवा मनापासून करत. कुणीही याचक असले, तरी आबा त्यांचे अश्रू पुसत आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पूर्ण सहकार्य करत असत.

२. धर्मकार्य हेच आबांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यासाठी ते तन-मन-धन अर्पण करून सेवा करत असत.

३. ते व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा तळमळीने करत असत. ते इतरांनाही त्यासाठी नेहमी प्रोत्साहन देऊन त्याविषयी मार्गदर्शन आणि सहकार्य करत असत.

४. भृगु ज्योतिष विशारद यांनी आबांच्या निधनाविषयी भाकीत करून ‘श्रीविष्णु त्यांना त्यांच्या लोकी घेऊन जातील’, असे सांगणे

भाग्यनगर येथील भृगु ज्योतिष विशारद आणि कुंडली तज्ञ यांनी त्यांच्या निधनाविषयी भाकीत आधीच केले होते. ते म्हणाले होते, ‘‘आबांच्या कुंडलीनुसार त्यांना शनीची महादशा आणि राहूची अंतर्दशा अन् प्रत्यंतर दशा चालू आहे. याच योगात भगवान श्रीविष्णु त्यांना त्यांच्या लोकी घेऊन जातील. कुंडलीत द्वादश भावात गुरु ग्रह आणि वृषभ राशीतला चंद्र त्यांना सहज मोक्षापर्यंत नेतील.’’ हे ऐकून ‘प.पू. गुरुदेवच त्यांना मोक्ष प्रदान करतील; कारण गुरुदेवच विष्णुस्वरूप आहेत’, असे आम्हाला वाटले.

५. रुग्णालयात असतांना ते देवाची पुष्कळ आळवणी करत होते. त्यांचा मनःपूर्वक नामजप होत होता. ते पुष्कळ स्थिर होते.’

(जुलै २०२१)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/499976.html

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक