परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे कै. अशोक हिरालाल पाटील

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे चोपडा (जिल्हा जळगाव) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील (वय ५९ वर्षे) !

‘कै. अशोक पाटील यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. या लेखामुळे कै. अशोक पाटील यांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना लक्षात येतील. ईश्वराची कृपा आणि कै. अशोक पाटील यांनी तळमळीने केलेल्या साधनेमुळे ते मृत्यूनंतरही प्रगतीच्या वाटेने पुढे जात आहेत !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले     

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील कै. अशोक हिरालाल पाटील (वय ५९ वर्षे) गेल्या १७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. ‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून होणारी आंदोलने, गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांत कै. पाटीलकाका समाजातील लोकांकडून तन, मन आणि धन अर्पण करून घेत असत.

५.४.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांचे धुळे येथे निधन झाले. २.८.२०२१  या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांची पत्नी श्रीमती कुसुम पाटील आणि कुटुंबीय यांना जाणवलेली कै. पाटील यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया. 

(भाग २)

कै. अशोक पाटील

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/499772.html

सौ. जागृती पाटील (मधली मुलगी)

सौ. जागृती पाटील

१. ‘देवच आपल्याला कठीण प्रसंगात साहाय्य करतो’, असे वडिलांनी मुलांना सांगणे

‘कठीण प्रसंगात देवच आपल्याला कसे साहाय्य करत आहे आणि त्यातून आपल्याला कसे बाहेर काढत आहे ?’, हे त्या त्या प्रसंगात बाबा सांगत. त्यामुळे लहानपणापासूनच आमच्या मनात देवाविषयी भाव निर्माण झाला आणि प्रत्येक कठीण प्रसंगात देवाला आळवण्याची आम्हाला सवय लागली.

२. प्रत्येक कठीण प्रसंगात ‘जे काही घडत आहे, ते ईश्वरेच्छेने घडत आहे’, असा दृष्टीकोन ठेवून बाबा सकारात्मक अन् स्थिर रहात असत.

३. वडील रुग्णाईत असतांना जाणवलेले सूत्र

‘बाबांचे प्रारब्ध संपवण्यासाठी गुरुदेवच त्यांना शक्ती पुरवत आहेत’, असे मला जाणवले.’ (जुलै २०२१)

सौ. जयश्री चौधरी (धाकटी मुलगी) 

सौ. जयश्री चौधरी

१. वडिलांचा जन्म संतांच्या आशीर्वादाने होणे

‘माझी आजी कै. पानकाबाई पाटील यांना लग्नानंतर ५ वर्षे मूल झाले नव्हते. त्यांच्या वर्डी (तालुका चोपडा, जिल्हा जळगाव) या गावात महान संत बनवारी बाबा आले होते. त्यांनी आजींना आशीर्वाद दिला, ‘‘तुझ्या पोटी फार भाग्यवान पुत्र जन्माला येईल. तो पुष्कळ आध्यात्मिक कार्य करील.’’ त्यानंतर माझ्या बाबांचा जन्म झाला.

२. वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करणे : बाबांचे लग्न झाले, तेव्हा त्यांची परिस्थिती फार हलाखीची होती. लग्नानंतर त्यांनी चोपडा येथे चहाचे दुकान चालू केले आणि हळूहळू व्यवसाय वाढवला. नंतर त्यांनी त्यांच्या सर्व परिवाराला चोपडा येथे आणून त्यांचा सांभाळ केला. बाबांनी आमच्या बर्‍याच नातेवाइकांना आधार देऊन त्यांना साहाय्य केले आहे.

२ आ. प्रेमभाव

२ आ १. घरी आलेल्यांचे प्रेमाने आदरातिथ्य करणे : बाबा घरी आलेल्या पाहुण्यांशी किंवा साधकांशी फार आपुलकीने वागत. ते त्यांचा यथोचित पाहुणचार करत. संत किंवा साधक घरी आल्यावर बर्‍याच वेळा बाबा स्वतःच त्यांच्यासाठी स्वयंपाक करत.

२ आ २. स्वतःच्या दुकानातील कर्मचार्‍यांवर कुटुंबियांप्रमाणे प्रेम करणे : बाबांनी त्यांच्या दुकानात काम करणार्‍यांना नोकर कधीच समजले नाही. ‘ते आपल्या परिवारातीलच सदस्य आहेत’, असा बाबांचा भाव असे. बाबा बर्‍याच वेळा सकाळी घरी बनवलेला गरम अल्पाहार दुकानातील कर्मचार्‍यांसाठी घेऊन जायचे. ते कर्मचार्‍यांच्या परिवाराचीही काळजी घ्यायचे. कठीण प्रसंगात बाबा त्यांना साहाय्य करायचे.

२ इ. मुलांवर चांगले संस्कार करणे : बाबा परेशदादाला (मोठ्या मुलाला) नेहमी कपाळावर टिळा लावायला आणि सात्त्विक कपडे घालायला सांगत असत अन् आम्हा दोघी बहिणींनाही सात्त्विक पद्धतीने शिवलेले कपडे घालायला, कुंकू लावायला आणि धर्माचरण करायला सांगत असत.

२ ई. मायेची आसक्ती नसणे : बाबांना पैशांची आसक्ती कधीच नव्हती. ते नेहमी म्हणायचे, ‘‘आपल्या प्रारब्धात असेल, तेवढे देव आपल्याला देईलच. आपल्याकडे जो पैसा आहे, तो भगवंताचाच आहे. त्यामुळे त्याची आसक्ती करण्यापेक्षा शक्य होईल, तेवढा पैसा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करावा.’’

२ उ. मुलीला सकारात्मक दृष्टीकोन देणे : मला बाबांचा फार आधार वाटायचा. माझ्या विवाहानंतर मला सासरच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला फार कठीण जात होते. मला आई-बाबांची आठवण येऊन फार रडू यायचे. बाबांना भ्रमणभाष केल्यावर ते नेहमी मला म्हणायचे, ‘‘विवाह म्हणजे आपले फार मोठे प्रारब्ध असते. आपण सकारात्मक आणि शांत राहून अन् सगळ्यांचे स्वभाव समजून घेऊन त्याप्रमाणे वागायला आरंभ केला की, काहीच कठीण जाणार नाही.’’

२ ऊ. मुलीला साधना करण्यास प्रेरणा देणे : बाबा मला सतत ‘आपले गुरुदेव किती महान आहेत ! ते आपली प्रत्येक क्षणी काळजी घेतात !’, असे सांगायचे. बाबांशी बोलल्यावर मला इतर सर्व गोष्टींचा विसर पडून साधना करण्याची प्रेरणा मिळायची. माझ्या लग्नानंतर बाबांचा भ्रमणभाष यायचा. तेव्हा त्यांनी कधीच मला मायेतील गोष्टी विचारल्या नाहीत. ते मला नेहमी विचारायचे, ‘‘तुझी साधना, नामजप आणि उपाय होत आहेत का ? तू सकारात्मक आहेस का ?’’ आणि ‘प्रतिदिन आईला आढावा देत जा’, असे मला सांगायचे.

२ ए. ‘दुकानातील कर्मचार्‍यांची साधना व्हावी’, अशी तळमळ असणे : ‘दुकानातील कर्मचार्‍यांची साधना व्हावी’, यासाठी बाबा दुकानातही सतत नामजप चालू ठेवत. त्यांनी दुकानात नामजपासाठी एक स्वतंत्र खोली सिद्ध केली आहे. ‘ज्या कर्मचार्‍याचे दुकानातील काम संपले असेल, त्याने तिथे बसून नामजप करायचा’, असे बाबांनी त्यांना सांगितले होते.

२ ऐ. मुलांकडून व्यावहारिक अपेक्षा नसणे आणि ‘त्यांनी साधना करावी’, असे वाटणे : बाबांनी आम्हा भावंडांकडून कधीच ‘आम्ही पुष्कळ मोठे शिक्षण घ्यावे. मोठी नोकरी करावी’, अशी अपेक्षा केली नाही. ते नेहमी म्हणत, ‘‘तुम्ही शिक्षण घेतले नाही, नोकरी केली नाही, तरी चालेल; पण साधना सोडू नका. साधना अखंड चालू ठेवा.’’

२ ओ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणे आणि उपक्रमांच्या वेळी व्यवसाय सोडून सेवेला प्राधान्य देणे : बर्‍याच वेळा अधिवेशन, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, गुरुपौर्णिमा, सत्संग किंवा इतर काही उपक्रम असल्यास बाबा ‘डेअरी’ व्यवसाय सोडून सेवेसाठी वेळ द्यायचे. ते भावपूर्ण सेवा करत असत. सेवेत असतांना बाबांना कधीच दुकान किंवा व्यवसाय याची चिंता वाटली नाही. ते म्हणायचे, ‘‘आपण गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सेवेत आहोत, तर गुरुदेव सांभाळून घेतील.’’

२ औ. मंदिरांच्या जीर्णाेद्धाराचे कार्य करणे

२ औ १. वर्डी (तालुका चोपडा, जिल्हा जळगाव) येथील श्रीराम मंदिराचा जीर्णाेद्धार : बाबांच्या वर्डी या गावी श्रीराम, सीता आणि मारुति यांच्या मूर्ती १२ वर्षे एका पत्र्याच्या शेडमध्ये होत्या. त्याची बाबांना फार खंत वाटायची. त्यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना एकत्र आणून मंदिराचा जीर्णाेद्धार केला. त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मूर्तींची स्थापना करून भंडारा केला. त्यांनी तेथे नुसते मंदिर उभे केले नाही, तर ‘तेथे नियमितपणे पूजा-अर्चा व्हावी’, याासाठी पुरोहितांची व्यवस्था केली आणि आर्थिक साहाय्यही केले.

२ औ २. चोपडा येथील नवग्रह मंदिराचा जीर्णाेद्धार : चोपडा येथे २५० वर्षे प्राचीन नवग्रह मंदिर आहे. मंदिराची जागा भव्य असूनही देवतांच्या मूर्ती पडिक जागेत होत्या. ते बघितल्यावर बाबांना फार खंत वाटली. बाबांनी स्वखर्चाने मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कार्याला आरंभ केला. तेव्हा देवाच्या कृपेने इतरांनीही त्यांना या कार्यात साहाय्य केले.

(जुलै २०२१)

(क्रमशः)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक