रेखा जरे हत्याप्रकरणी जरे आणि बोठे कुटुंबातील व्यक्तींकडून परस्परांविरुद्ध धमकावल्याच्या तक्रारी !

नगर, ३० जुलै – रेखा जरे यांचा मुलगा रुणाल आणि मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या पत्नी अधिवक्त्या सविता बोठे यांनी परस्परांविरुद्ध धमकावल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे केल्या आहेत. पारनेर पोलीस ठाण्यात २७ जुलै या दिवशी ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिवक्त्या बोठे यांनी जरे, त्यांचा अंगरक्षक, अधिवक्ता आणि पारनेरचे पोलीस अधिकारी यांच्याविरुद्धही तक्रार केली आहे. आरोपी बाळ बोठे सध्या पारनेरला न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे.
रुणाल जरे यांनी म्हटले आहे की, २७ जुलै या दिवशी आपण कामानिमित्त पारनेर पोलीस ठाण्यात गेलो असता तेथे बोठे यांच्या पत्नीने अंगरक्षकाला आणि आपल्याला धमकावल्यामुळे आपल्या जिवाला धोका आहे.

अधिवक्त्या सविता बोठे यांनी म्हटले आहे की, आम्हाला न्यायालयाच्या कामासाठी सतत बाहेर पडावे लागते. या पार्श्वभूमीवर मला आणि मुलाला जरे तसेच त्यांचे अंगरक्षक, अधिवक्ता पटेकर यांच्यापासून धोका आहे. जरे यांनीच आपल्याविरुद्ध खोटी तक्रार केल्याचे समजल्यावर मी वस्तूस्थिती सांगण्यासाठी ही तक्रार करत असून या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.