पूर परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

बारामती – राज्यातील पूर परिस्थिती बिकट असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण येथील पाणी अल्प होण्यासह इतर साहाय्य करण्याचे नियोजन करत असून अडचणीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हालवण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. तसेच सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका सरकारमधील सर्वांनी घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीमध्ये आढावा बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासमवेतच जनजीवनही पूर्ववत् करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. तांदूळ, डाळी आणि रॉकेल यांचा पुरवठा करण्यासमवेतच १ लाख लोकांचे स्थलांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.