किरकिटवाडी – सिंहगड, डोणजे आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील ‘सानवी रिसॉर्ट’मध्ये चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली. यामध्ये हॉटेल मालकासह ६ पुरुष आणि ४ महिला यांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस शिपाई यांच्या पथकाने ही कारवाई केली. ‘डान्स पार्टी’मध्ये सहभागी असलेला आणि ‘पार्टी’च्या मुख्य सूत्रधारांपैकी एक डॉ. निखिल भाकरे पोलीस आल्याचे समजताच अंधाराचा अपलाभ घेऊन पळून गेले. डॉ. भाकरे यांचे आंबेगाव कात्रज परिसरात मोठे रुग्णालय आहे; मात्र असे असतांनाही या डॉक्टर वर गुन्हा नोंद केला नाही. त्यामुळे पोलिसांकडून डॉक्टरला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.