कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच मुसळधार पावसामुळे प्रतिदिनच आपत्कालीन स्थिती राज्यात ओढावत आहे. लोकहो, संकटांची ही मालिका आता थांबणार नाही. त्यात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंताची आराधना करणे हाच पर्याय आहे !
चिपळूण – मागील २ दिवस झालेल्या अतीवृष्टीमुळे शहरात सर्वत्र पाणी भरले आहे. मुसळधार पावसामुळे येथील बहादूरशेख नाका या भागाजवळील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाचा काही भाग २३ जुलैच्या पहाटे वाहून गेला. पुलाला मोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा पूल बंद झाल्याने या महामार्गावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘धोकादायक पूल’ घोषित करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष !
राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाला यापूर्वीच ‘धोकादायक पूल’ म्हणून घोषित केले होते. या पुलाच्या दुरुस्तीसाठी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्याकडून पाठपुरावाही चालू होता; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार नव्हे का ? यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)