एकाच भजनपंक्तीच्या माध्यमातून शिष्य आणि गुरु यांनी स्वतःच्या देहाची व्यर्थता सांगण्याचे उदाहरण !

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) प्रतिदिन उठल्याबरोबर सद्गुरूंकडे धावत जायचे. जातांना वाटेतील फूलवाल्याकडून ते एक पैशाचे (त्या वेळचे नाणे) गुलाबाचे फूल विकत घ्यायचे आणि ते सद्गुरूंना अर्पण करायचे. सद्गुरूंनी ते फूल स्वीकारले की, प.पू. बाबांना अतिशय आनंद व्हायचा. एकदा प.पू. बाबांच्या मनात गुरुभेटीची आर्तता निर्माण झाल्यावर त्यांना ‘श्री येई आता येई प्रभु साईनाथा ।’ हे भजन स्फुरले. त्या भजनात पुढील पंक्ती होत्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले

मांस-रुधिर-हाडे समुची देह हा नटला ।
कोण कमी हो या थाटाला ।
तव रूप डोळा पहाता संशय फिटला ।
देहातूनी जीव हा विटला ।
या आत्म्याला कोण रक्षी रे देवा ।
नामाचा मेवा द्यावा ।

भजन पूर्ण लिहून झाल्यावर प.पू. बाबांनी त्याच भावस्थितीत सद्गुरूंच्या समोर उभे राहून हे भजन श्री गुरूंना म्हणून दाखवले आणि मग ते नेहमीप्रमाणे त्यांची पूजा करू लागले. तेव्हा रागावून श्री गुरु म्हणाले, ‘‘तू लिखता है और तू ही बिगाडता है ।’’ येथे गुरूंना स्वतःच्या देहाविषयी शिष्याला सांगायचे आहे, ‘माझ्या देहाची पूजा काय करतोस ?’

वरील प्रसंगात गुरु रागावल्यावर आरंभी प.पू. बाबांना कळेना, ‘आपली चूक काय झाली ?’ श्री गुरूंना नमस्कार करून ते बाजूला उभे राहिले आणि त्यांनी विचार केला की, भजन परत वाचावे. तेव्हा ‘मांस-रुधिर-हाडे समुची देह हा नटला । … देहातूनी जीव हा विटला ।’ या ओळींतून त्यांना बोध झाला, ‘मीच भजनपंक्तीत म्हटले आहे की, हाडा-मांसाचा देह हा नश्वर आहे. या देहाचा आता मला वीट आला आहे. गुरुही शिकवत आहेत की, माझ्या देहात अडकू नकोस, सगुणाच्या पूजेत अडकू नकोस.’ तेव्हापासून प.पू. बाबांची सगुणातील पूजा बंद झाली !

– डॉ. जयंत बाळाजी आठवले (प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य)