गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणार्‍या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३ जुलै २०२१ या दिवशी) सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे मुलुंड (मुंबई) येथील भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी यांनी केले असून त्यांना त्यांची कन्या सौ. उल्का बगवाडकर यांनी साहाय्य केले आहे. या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/493073.html
प.पू. भक्तराज महाराज

गुरुचरणी ठेवी ध्यास ।

१ मार्च १९५६

गुरुचरणी ठेवी ध्यास ।
तोची पुरवी तुझी आस ।। धृ. ।।

भावार्थ : गुरु म्हणजे ‘परब्रह्म’. ज्ञान गुरूंकडूनच मिळते. मायेच्या खर्‍या स्वरूपाचे आकलन गुरूंमुळेच होते. तेव्हा गुरुसेवा आणि गुरूंचे सतत चिंतन करून ‘गुरुचरणांचा ध्यास’ लागला की, गुरुकृपा होऊन ‘आपल्या ज्या पारमार्थिक इच्छा-आकांक्षा असतात’, त्या पूर्ण होतात.

बाळ रडिता धरी कास ।
माता अंकी घेई त्यास ।। १ ।।

भावार्थ : बाळाने रडत मातेचा कासोटा (काष्ठा. हा नऊवारी साडीला असतो.) धरला की, आईचे हृदय द्रवते आणि ती चटकन हातातील सर्व कामे थांबवून बाळाला मांडीवर घेते.

बाळ बोबडे जरी बोले ।
बोल जननीसी ते कळे ।। २ ।।

भावार्थ : बाळाचे बोबडे बोल केवळ मातेलाच कळतात; कारण मातेला बाळाच्या अंतरंगाची पूर्ण कल्पना असते. बाळाचा प्रत्येक शब्दन् शब्द कळत नसला, तरी ‘बाळ का रडते ? त्याला काय हवे ?’, हे तिला चटकन कळते. जणूकाही बाळाच्या अन् तिच्या हृदयांचे ठोके एकमेकांत मिसळून गेलेले असतात.

दुःखी-कष्टी संबोधिता ।
हरि धावे हो तत्त्वता ।। ३ ।।

भावार्थ : भक्तावर संकट आलेले असो, त्याला दुःख झालेले असो किंवा दुःखामुळे त्याचे मन कष्टी झालेले असो, त्या भक्ताने हाक न मारतासुद्धा हरि, म्हणजे गुरु त्याच्या साहाय्याला धावतात. भक्ताला दुःखी पाहून गुरूंनाही कळवळा येतो; कारण ते भक्ताशी एकरूप झालेले असतात.

तेल-वात ही एकरूप ।
जळता दिसे जी समूप ।। ४ ।। (टीप १)

भावार्थ : समईत वात पेटलेली असतांना ‘वात जळते कि तेल जळते ?’, हे लक्षातच येत नाही. तसेच भक्त आणि गुरु यांचे नाते असते. एकाला दुःख झाले की, दुसर्‍याला लगेच कळवळा येतो, इतके गुरु आणि भक्त एकरूप किंवा समरस झालेले असतात. गुरु सर्वच भक्तांकडे समदृष्टीने पहात असतात.

टीप १ – तेल आणि वात हे जरी दोन निराळे असले, तरी जळतांना ते एकरूप झालेले असतात.

एका उणे एक न जळी (टीप २) ।
देव राहे भक्तांस्थळी ।। ५ ।।

भावार्थ : एका भक्ताच्या साहाय्याला गुरु गेले, म्हणजे दुसर्‍या भक्ताकडे ते धावणार नाहीत, असे कधीच होत नाही. जलाशयातून पाण्याचा एक थेंब बाजूला केला, तर तिथे खड्डा पडत नाही, परत तेथील पाण्याची पातळी सारखी होते. तसेच गुरु आणि भक्त यांचे नाते असते. देव (गुरु) हा भक्तांच्या ठिकाणी (हृदयी) निरंतरच रहातो.

टीप २ – एकाविना दुसरा जळू शकत नाही. (अर्थ ‘टीप १’च्या संदर्भात)

नामे त्यांच्या दुःखे हारी ।
धावी संकटी कैवारी ।। ६ ।।

भावार्थ : भक्ताकडून गुरूंनी दिलेले नाम (नामस्मरण) सतत, म्हणजे सदा सर्वकाळ चालू असेल, तर तो भक्तांचा कैवारी (गुरु) संकटकाळी भक्ताला वाचवण्यासाठी धावून आल्याविना कधीच रहात नाही.

गुरुचरणी ध्यास दिनाचा ।
लोभ जडो परमार्थाचा ।। ७ ।।

भावार्थ : दिनाचा (प.पू. बाबांचा) एकमेव आधार गुरुच आहेत आणि दिनाला गुरुस्मरणाविना काहीच सुचत नाही. तेव्हा हे गुरुदेवा, ‘दिनाला (शिष्याला)  परमार्थाचा (साधना करण्याचा) अखंड लोभ राहू दे’, ही एकच तुला प्रार्थना आहे.’

(प.पू. भक्तराज महाराज निर्देशित भावार्थांचे लेखन कै. चंद्रकांत (दादा) दळवी)