सदनिकेच्‍या क्षेत्रफळानुसारच देखभाल शुल्‍क आकारण्‍याचे सहकार विभागाचे आदेश !

सहकार विभागाच्‍या आदेशाचे पालन न केल्‍यास त्‍यांना शिक्षा होणार का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – सहकारी गृहनिर्माण संस्‍थेमधील सदनिकांच्‍या क्षेत्रफळानुसारच सोसायटीने देखभाल शुल्‍क (मेंटेनन्‍स चार्जेस) आकारावे, असा आदेश सहकारी संस्‍था पुणे शहर एकचे उपनिबंधक दिग्‍विजय राठोड यांनी दिला आहे. याविषयी अरण्‍येश्‍वर संतनगर परिसरातील ट्रेझर पार्क सोसायटीमधील काही सभासदांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.

महाराष्‍ट्र वेश्‍म मालकी अधिनियम १९७० कलम १० अन्‍वये नोंदणीकृत गृहनिर्माण संस्‍थांनी सदनिकाधारकांकडून क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्‍काची आकारणी करावी, अशी तरतूद आहे; मात्र अनेक गृहनिर्माण संस्‍थांमधून समान शुल्‍क आकारणी केली जाते. त्‍यामुळे लहान क्षेत्रफळाच्‍या सदनिकाधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

‘कायद्यातील तरतुदींचे सहकारी गृहनिर्माण संस्‍थांनी पालन करणे आवश्‍यक आहे. हा आदेश सहकार विभागाने संबंधित गृहनिर्माण संस्‍थेपुरता काढला असला, तरी राज्‍यातील प्रत्‍येक सहकारी गृहनिर्माण संस्‍थेला कायद्यातील तरतुदी तसेच हा आदेशाही लागू होऊ शकतो’, असे पुणे जिल्‍हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्‍यक्ष सुहास पटवर्धन यांनी म्‍हटले आहे.