ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ईदला गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण करण्यास इस्लाम धर्मात सांगितले आहे का ? असा प्रश्न ना सरकार, ना प्रशासन, ना तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांना विचारत आहेत !

डॉ. प्रमोद सावंत गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार !

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – ईदच्या निमित्ताने २१ ते २३ जुलै या कालावधीत ‘कुर्बानी’ देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुसलमानांना दिले आहे. भाजपचे नेते तथा ‘गोवा हज समिती’चे अध्यक्ष शेख जिना आणि मुसलमान नेते यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

या भेटीनंतर शेख जिना म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २१ ते २३ जुलै या कालावधीत कोणत्याही अडथळ्याविना ‘कुर्बानी’ होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश पशूसंवर्धन खात्याचे संचालक आणि गोवा पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी यांना दिले आहेत. गोव्यातील मुसलमानांना ‘कुर्बानी’साठी शेजारील राज्यांतून गोवंश आणावा लागणार आहे. गोवंश आणण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ देण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पशूसंवर्धन खात्याच्या संचालकांना दिला आहे.

‘कुर्बानी’साठी कर्नाटकमधून गोवंशियांची वाहतूक सुरळीत करता यावी, यासाठी कर्नाटकमधील संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. राज्यांच्या सीमांवर गोवंशियांची ‘कुर्बानी’ देऊन गोमांस गोव्यात आणण्यास अनुमती देण्यात येणार आहे, तसेच गोव्यात हत्येसाठी आणलेल्या जिवंत गोवंश ‘कुर्बानी’साठी गोवा मांस प्रकल्पात नेला जाणार आहे.’’ (ही कृती गोमातेचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘गोवा’ या राज्याला लज्जास्पद ! – संपादक)