सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेले अनमोल ज्ञानमोती !

१. अयोग्य विचार करून केलेली कृती सुख-दुःखाला कारणीभूत होते, तर सेवाकेंद्रातील कार्यपद्धतीनुसार केलेली कृती सुख-दुःखाच्या पलीकडील आनंदाची अनुभूती देणारी असते !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१ अ. साधकांची कृती : एके दिवशी देहली सेवाकेंद्रात साधकांनी तेलामध्ये केलेल्या शिर्‍याची चव चांगली लागत नाही; म्हणून तुपाचा शिरा बनवण्याचा विचार केला. त्यासाठी ३ – ४ साधकांनी त्यांच्याकडे असणारे वैयक्तिक तूप दिले आणि तुपातील शिरा बनवला.

१ आ. सद्गुरु पिंगळेकाकांनी दिलेला दृष्टीकोन : साक्षात् परात्पर गुरुदेवांचे (सगुण) रूप असलेल्या सद्गुरु पिंगळेकाकांनी साधकांकडून होत असलेली अयोग्य विचारप्रक्रिया प्रेमाने लक्षात आणून दिली. ते म्हणाले, ‘‘आपण स्वतःकडील तूप देऊन त्याचा शिरा बनवला, तर तो आपल्याला सुख-दुःखात ठेवणारा होईल. सेवाकेंद्रात सांगितलेल्या पद्धतीने शिरा बनवला, तर तो सुख-दुःखाच्या पलीकडील आनंदाची अनुभूती देईल आणि वैकुुंठातील प्रसादाची चव देईल. आपण ती अनुभूती केव्हा घेणार ?’’

कु. पूनम चौधरी
कु. पूनम चौधरी

२. ‘पाप करणार्‍या गुन्हेगाराची वकिली करणे’, हा अधर्म असणे, साधकांनीही स्वभावदोषांची वकिली करून अधर्म न करता गुणांची वकिली करून धर्माचरण करावे !

सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘अधिवक्त्याने गुणांची वकिली करायला पाहिजे. गुन्हेगाराने पाप केले आहे आणि आपण त्याची वकिली करत असू, तर तो अधर्म आहे. तसेच साधकांनी स्वभावदोषांची वकिली केली, म्हणजेच स्पष्टीकरण दिले, तर तोसुद्धा अधर्मच होईल. त्यामुळे साधकांनी गुणांची वकिली करुन धर्माचरण करायला पाहिजे.’’

३. कृतज्ञता

‘परात्पर गुरुदेव, आपल्याला अपेक्षित असे करण्यासाठी आम्ही सर्व साधक अल्प पडलो. आपल्याच कृपेने सद्गुरु पिंगळेकाकांनी मार्गदर्शन करून आम्हाला योग्य मार्ग दाखवला. आपल्या दिव्य पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र. (९.१.२०२१)


सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे साधकाला आलेली अनुभूती

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या पायाला बिंदूदाबन करण्याची सेवा करतांना हाताला विद्युत् झटका बसल्याप्रमाणे जाणवनूही त्यातून त्रास न होता वेगळेच अनुभवता येणे आणि नंतर मनातील विचार न्यून होणे : ‘९.१०.२०१९ या दिवशी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या पायाला बिंदूदाबन करण्याची सेवा करत होतो. त्या वेळी माझ्या डाव्या हाताला विद्युतवाहक तारेला हात लागल्यावर जसा झटका (शॉक) बसतो, त्याप्रमाणे झटका बसला आणि माझा हात सद्गुरु पिंगळेकाकांच्या पायापासून दूरवर फेकला गेला. त्या वेळी कोणत्याही प्रकारची विद्युतवाहक तार जवळ नव्हती किंवा ज्याचा स्पर्श होऊन धक्का लागू शकतो, असे अन्य काहीही जवळ नव्हते. मला असा अनुभव प्रथमच आला. मला धक्का बसूनही त्याचा त्रास न होता वेगळाच अनुभव आला. मला झटका बसल्यानंतर माझ्या मनातील विचार न्यून झाले. मी सद्गुरु पिंगळेकाकांना याविषयी सांगितले.

२. दुसर्‍या दिवशी भावसत्संगात ‘सेवा करतांना चैतन्यामुळे झटका बसला’, असे एका साधिकेने सांगितल्यावर ‘देवाने तुमच्या अनुभूतीचे उत्तर दिले’, असे सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगणे : दुसर्‍याच दिवशी रात्री सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यावर बिंदूदाबन करत असतांना आम्ही भावसत्संगात सांगत असलेली सूत्रे ऐकत होतो. त्या वेळी एका साधिकेने सांगितले, ‘‘सेवा करतांना मला झटका बसला. मला झटका बसल्याने माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण नष्ट झाले. संतांमधील चैतन्यामुळे मला झटका बसला.’’ त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘या ताईंना झटका बसला. काल तुम्हालाही झटका बसला होता. देवानेच तुम्हाला तुमच्या अनुभूतीचे उत्तर दिले.’’

३. कृतज्ञता : सद्गुरु पिंगळेकाकांनी असे सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘सनातन संस्थेच्या संतांच्या देहातून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि चैतन्य हे पुष्कळ अधिक प्रमाणात आहे.’ देवाने मला त्याचा अनुभव घेण्याची संधी दिली. त्याविषयी मला कृतज्ञता वाटली. ‘देव आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कोणत्याही माध्यमातून देत असतो. केवळ आपण ते ग्रहण करायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.’

– एक साधक, देहली (११.१०.२०१९)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक