५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. कान्हा संदीप कुलकर्णी !

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मोशी, पुणे येथील चि. कान्हा संदीप कुलकर्णी (वय २ वर्ष) !

चि. कान्हा संदीप कुलकर्णी याचा ज्येष्ठ अमावास्येला (१०.७.२०२१) दुसरा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याची आई सौ. सई संदीप कुलकर्णी यांनी गर्भधारणा आणि कान्हाचा जन्म याविषयी लिहून दिलेली सूत्रे येथे देत आहोत.

चि. कान्हा संदीप कुलकर्णी

१. गर्भधारणा होण्यापूर्वी स्वप्नाच्या माध्यमातून देवाने बाळ होणार असल्याची पूर्वसूचना देणे

‘आम्ही दुसर्‍या अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करतांना सनातन संस्था निर्मित ‘सोळा संस्कार’ या ग्रंथात दिलेले मंत्र म्हणत होतो आणि नामजप करत होतो. एकदा मला स्वप्न पडले. स्वप्नात मी देवद आश्रमात होते. मला गुलाबजाम खावेसे वाटत होते आणि त्या वेळी आश्रमात भावसोहळा होता; म्हणून महाप्रसादामध्ये गुलाबजाम केले होते. ते पाहून माझा भाव जागृत झाला. तेथे पाटीवर लिहिले होते, ‘प्रत्येकी दोन गुलाबजाम घेणे’; पण मला अधिक गुलाबजाम खावेसे वाटत होते. अधिक गुलाबजाम घेण्याची मला लाज वाटत होती. तेव्हा तेथील साधक मला म्हणाले, ‘काही विशेष गोड बातमी आहे का ?’ अशा प्रकारे वरील स्वप्नाच्या माध्यमातून देवाने माझी इच्छा पूर्ण करून मला बाळ होणार असल्याची पूर्वसूचना दिली.

२. गर्भधारणा झाल्यानंतर

२ अ. चौथ्या मासात रामनाथी आश्रमात झालेल्या कमलपिठावर दीपस्थापना करण्याच्या सोहळ्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहातांना गर्भातील बाळाने हालचाल केल्याने आनंद होणे : मी रामनाथी आश्रमात झालेल्या कमलपिठावर दीपस्थापना करण्याच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहात होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची विश्वरूपे आणि लीला पहात होते. तेव्हा गर्भातील बाळाने ५ मिनिटे हालचाल केल्याने मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ‘जन्माला येणारे बाळ परमानंदरूपी चैतन्याचा आस्वाद घेत आहे’, असे मला जाणवले. साधारण सातव्या मासांनंतर गर्भाची हालचाल जाणवते; पण मला चौथ्या मासातच बाळाची हालचाल जाणवली.

सौ. सई कुलकर्णी

२ आ. ‘आश्रमात जाण्याची तीव्र इच्छा असणे; परंतु यजमानांची अनुमती नसणे आणि अचानक पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी भ्रमणभाष करून देवद आश्रमात बोलावल्यावर परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : मला देवद आश्रमात जाऊन प.पू. भक्तराज यांच्या वाहनाभोवती प्रदक्षिणा घालण्याची पुष्कळ इच्छा झाली होती. ‘मी आश्रमातील महाप्रसाद ग्रहण केला, तर गर्भातील बाळावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतील आणि तिथे मला सेवेची संधीही मिळेल’, असे मला वाटत होते; पण मला देवद आश्रमात पाठवण्याची यजमानांची सिद्धता नव्हती. मी परात्पर गुरुदेवांना पुष्कळ प्रार्थना केल्या आणि ‘देवद आश्रमात जायचेच’, असे ठरवले. त्या वेळी यजमानांनी मला माहेरी सातारा येथे विश्रांतीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मी सातार्‍याला असतांना अचानक पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी मी, माझी आई आणि माझी मोठी मुलगी तिघींना तातडीने देवद आश्रमात बोलावले. ‘याविषयी यजमानांना कसे विचारायचे ?’, हे मला समजत नव्हते. मी गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली आणि यजमानांना विचारले. तेव्हा त्यांनी ८ दिवसांसाठी आश्रमात जाण्याची अनुमती दिली. त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

२ इ. देवद आश्रमात गेल्यावर वडिलांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे आणि त्या सत्संगात गर्भातील बाळ पुष्कळ आनंदाने हालचाल करून पू. (सौ.) अश्विनीताईंना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे जाणवणे : वर्ष २०१९ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही (मी, माझी आई आणि मुलगी) देवद आश्रमात होतो. त्या दिवशी आम्हाला एका सत्संगाला बोलावले आणि तेथे माझ्या बाबांची (श्री. राजेंद्र सांभारे यांची) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा गर्भातील बाळ पुष्कळ आनंदाने हालचाल करत होते. मी आईला म्हणाले, ‘‘मला बसता येत नाही, इतकी बाळ हालचाल करत आहे.’ तेव्हा ‘त्याला पू. (सौ.) अश्विनीताईंना (पू. (सौ.) अश्विनी पवार यांना) भेटायचे असून सत्संगातील आनंदही घ्यायचा आहे’, असे मला जाणवले.

२ ई. आश्रमातील आध्यात्मिक वातावरणात रहायला मिळणे : मला आश्रमात आणखी काही दिवस थांबायचे होते आणि गुरुकृपेने यजमानांनीही मला त्यासाठी अनुमती दिल्याने मला पुष्कळ आनंद झाला. आश्रमात मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायचे. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीभोवती प्रदक्षिणा घालायचे आणि ध्यानमंदिरात बसून नामजप करायचे. मी आश्रमात सेवाही करायचे. तेव्हा आश्रमातील साधक माझ्याकडे पाहून ‘ताई, तुमचे हे बाळसुद्धा दैवी बालक असणार आहे. त्याला आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे’, असे म्हणायचे.

२ उ. स्वप्नाच्या माध्यमातून प्रसुती वेळेपूर्वी होणार असल्याचे सुचवून गुरुमाऊलींनी मनाची सिद्धता करून घेणे : माझी प्रसुती वेळेपूर्वी लवकर होणार आहे’, असे मला सारखे स्वप्न पडत होते. ‘माझे बाळ पुष्कळ लहान असणार आहे’, हे मी माझे यजमान, आई आणि बाबा यांना सांगितले. तेव्हा सगळ्यांनी मला वेड्यात काढले होते. सगळे म्हणाले, ‘‘तू पुष्कळ विचार करतेस; म्हणून तुला अशी स्वप्ने पडतात’’; परंतु प्रत्यक्षात गुरुमाऊलींनी माझ्या मनाची या गोष्टीची आधीपासून सिद्धता करून घेतली होती आणि मला पूर्वसूचना दिली होती.

२ ऊ. गर्भारपणात मला त्रिमुखी दत्ताचे आणि विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन झाले होते.

३. जन्म

३ अ. आठवा मास संपताच रात्री अचानक रक्तदाब पुष्कळ वाढल्याने यजमानांसह रुग्णालयात जात असतांना वाटेतच चारचाकी वाहनात चक्कर (फीट) येणे, त्या वेळी पुष्कळ पाऊस पडत असणे आणि या कठीण परिस्थितीत केवळ गुरुमाऊलींनीच मृत्यूच्या संकटातून अलगदपणे बाहेर काढणे आणि शस्त्रकर्म होऊन प्रसुती होणे : गुरुदेवांच्या कृपेने आठ मास पूर्ण झाले आणि त्याच रात्री अचानक माझा रक्तदाब पुष्कळ वाढला. त्यामुळे यजमान मला उत्तर रात्री ३ वाजता रुग्णालयामध्ये घेऊन जात होते. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला चारचाकी वाहनातच चक्कर आली. त्या वेळी पुष्कळ पाऊसही पडत होता. माझ्या यजमानांना ‘काय करावे ?’, ते सुचत नव्हते. यजमानांनी शरणागतभावाने गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, मी काही करू शकत नाही. तुम्हीच सईची काळजी घ्या. ती तुमची भक्ती करते. तुम्हीच तिला वाचवा.’ त्यांनी मला आधुनिक वैद्यांकडे नेल्यावर माझी स्थिती गंभीर झाल्याने मला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. तेथे शस्त्रकर्म होऊन सकाळी मला मुलगा झाला. ‘साक्षात् श्रीकृष्णजन्माच्या वेळी जशी कठीण परिस्थिती होती, अगदी तशीच परिस्थिती त्या वेळी होती’, याची मला नंतर जाणीव झाली. गुरुमाऊलींनीच मला मृत्यूच्या संकटातून अलगदपणे बाहेर काढले. त्या वेळी परात्पर गुरुदेवांचा आम्हा कुटुंबियांवर वरदहस्त असल्याची मी अनुभूती घेतली.’ – सौ. सई संदीप कुलकर्णी, मोशी, पुणे. (१२.५.२०२०)

३ आ. सौ. सई कुलकर्णी यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : ‘मुलीच्या संदर्भात वरील प्रसंग घडण्यापूर्वी काही दिवस आधी ती मला म्हणाली, ‘‘बाबा, तुम्ही असतांना मला मुळीच कसली काळजी नाही. मला कोणी साहाय्याला नसले, तरी ‘तुम्ही गुरुदेवांच्या साहाय्याने माझे सर्व काही व्यवस्थित आणि चांगले करणार आहात’, याची मला निश्चिती आहे.’ तेव्हा मला माझ्या मुलीची परात्पर गुरूंवरील श्रद्धा लक्षात आली.’ – श्री. राजेंद्र नारायण सांभारे (चि. कान्हाचे आजोबा (आईचे वडील)), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४. जन्मानंतर

४ अ. बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असूनही गुरुकृपेमुळे त्याही स्थितीत त्याचे रक्षण होणे : ‘बाळ अपुर्‍या मासांचे (महिन्यांचे) असून त्याला श्वास घेतांना त्रास होत असे; म्हणून मला त्याची पुष्कळ काळजी वाटत असे. मी गुरुदेवांना प्रार्थना सतत प्रार्थना करायचे, ‘हे गुरुमाऊली, या बाळाला मी तुमच्या चरणांपाशी समर्पित करत आहे. तुम्हीच त्याचा सांभाळ करा.’ गुरुकृपेमुळे अशाही परिस्थितीत तो मोठा झाला. गुरूंनी अलगदपणे त्याला मोठे केले.’ – सौ. सई संदीप कुलकर्णी (आई)

४ आ. बाळाला दूध देतांना आध्यात्मिक उपाय केल्यामुळे बाळाची प्रकृती लवकर चांगली होणे : ‘बाळाचे जन्मतः वजन २.१ किलो होते. आम्ही एक मासानंतर आधुनिक वैद्यांना दाखवायला गेलो. त्या वेळी त्यांनी बाळाचे वजन आणि वाढ चांगली असल्याचे सांगितले. तेव्हा सौ. सई मला म्हणाली, ‘‘बाबा, बाळाला बाटलीतून दूध देतांना तुम्ही करत असलेल्या आध्यात्मिक उपायांमुळेच बाळाच्या वजनात फरक पडून त्याची वाढ चांगली झाली.’’

४ इ. एक मासाचे असतांनाही आकलन शक्ती चांगली असणे : बाळ एक मासाचे असतांना शेक देतांना त्याला अधिक गरम जाणवल्यास, ते हाताने पंजा वर करून थांबण्यास सांगत असे.

४ ई. सात्त्विकतेची आवड : एकदा आम्ही भावसत्संग ऐकत होतो. त्या वेळी बाळ तो लक्ष देऊन ऐकत होते. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि उदबत्ती यांनी आध्यात्मिक उपाय करतांना ते हसते. आम्ही नामजप करतांना ते आमच्याकडे बघत नामजप ऐकते. माझे नाम आतून होत असतांना ते हुंकार देऊन प्रतिसाद देते. बाळाला घेतले की, माझा नामजप आपोआप चालू होतो आणि अंतर्मनापासून होतो.

४ उ. बाळ दूध पितांना आणि झोपतांना नेहमी त्याच्या हातांची मुद्रा केलेली असते.

४ ऊ. बर्‍याच वेळा मला त्याच्या अंगावर दैवी कण आढळतात. – श्री. राजेंद्र सांबारे (आजोबा)

४ ए. बाळाचे नाव संतांना विचारून ठेवणे : ‘संतांना विचारून बाळाचे नाव निवडूया’, अशी माझ्या बाबांची (श्री. राजेंद्र सांभारे) इच्छा असल्याने त्यांनी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना तसे विचारले. त्यांनी बाळासाठी सुचवलेल्या नावांतून आम्ही उभयतांनी ‘कान्हा’ हे नाव ठेवले. नामकरणविधी झाल्यानंतर आम्ही ते सद्गुरु (कु.) स्वातीताईंना कळवले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘कान्हा नाव ठेवले का ! छान. आता तुला सगळीकडे श्रीकृष्ण दिसेल आणि श्रीकृष्णाला हाक मारली जाईल.’’ त्या वेळी माझी भावजागृती झाली.

४ ऐ. दळवळण बंदीच्या काळात गुरूंनी सातारा येथे माहेरी सुरक्षित जागी आणल्याचे जाणवून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : गुरुकृपेने मी गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी मुलांना घेऊन सातारा येथे माझ्या माहेरी आले. त्यानंतर दळणवळण बंदी जाहीर झाली. देवाने काळजी घेऊन बाळ आणि आम्हाला सुरक्षित जागी आणले. याच काळात माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही चालू झाले. माझे बाबाही मला व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यासाठी साहाय्य करत होते.’ – सौ. सई संदीप कुलकर्णी (आई)

४ ओ. कान्हाला जवळ घेतल्यावर थकवा जाऊन ताजेतवाने वाटणे : ‘मी कार्यालयामधून दमून घरी येतो. आवरून कान्हाला जवळ घेऊन बसल्यावर माझा थकवा जाऊन मी ताजातवाना होतो.’ – श्री. संदीप श्रीकांत कुलकर्णी (चि. कान्हाचे बाबा)

४ औ. ‘कान्हाच्या छायाचित्रांमधून आध्यात्मिक उपाय होऊन चांगले वाटणे : ‘मला थकवा असेल अथवा एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल, तर त्या वेळी मी भ्रमणभाषवर कान्हाची हसतमुख छायाचित्रे पहाते. ‘त्या छायाचित्रांमधून माझ्यावर आध्यात्मिक उपाय होऊन मला चांगले वाटते’, असे मी नेहमी अनुभवते. त्याच्याशी भ्रमणभाषवर बोलले, तर तो लगेचच माझा स्वर ओळखून मला चांगला प्रतिसाद देतो.’ – सौ. रीमा गणेश देशपांडे, चिंचवड, पुणे. (चि. कान्हाची मावशी)

‘हे गुरुमाऊली, तुम्ही मला भरभरून दिले आहे; पण मीच अल्प पडत आहे. तुम्ही कु. साची (मोठी मुलगी) आणि चि. कान्हा यांच्या जन्माचा उद्धार करा. तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या. आम्हा सर्वांना तुमच्याजवळ येण्यासाठी पात्र बनवा’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’ – सौ. सई संदीप कुलकर्णी (चि. कान्हाची आई), मोशी, पुणे. (१२.५.२०२०)