फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारे इतर कैद्यांच्या आरोग्याकडे लक्ष कधी देणार ? – हिंदु विधीज्ञ परिषद

मुंबई – फादर स्टॅन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि अवैध कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. काही मोठ्या नेतेमंडळींनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिली आहेत. मुळात फादर स्टॅन स्वामी यांना व्यवस्थित वैद्यकीय उपचार मिळत होते. त्याचसमवेत त्यांना चर्चप्रणीत खासगी रुग्णालयात ठेवण्याची विशेष मुभाही उच्च न्यायालयाने दिली होती. यानंतरही त्यांच्या निधनानंतर राजकारण होत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर यातून कारागृहातील अन्य कैद्यांच्या आरोग्याचे सूत्र ऐरणीवर येते. फादर स्टेन स्वामी यांच्याप्रमाणे अन्य किती कैद्यांच्या प्रश्‍नाकडे हे तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी आणि नेतेमंडळी किती लक्ष देतात ? आर्थर रोड कारागृहामधील नालासोपारा खटल्यातील आरोपी सुधन्वा गोंधळेकर आणि गणेश मिस्किन यांना उपचार मिळावेत, यासाठी अर्ज करूनही त्यांच्याकडे लक्ष का दिले जात नाही ? अशा प्रकरणांमध्ये तथाकथित पुरोगामी आणि निधर्मीवादी मंडळी गप्प का बसतात ? या कैद्यांनाही फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे उपचार घेण्याची मुभा मिळायला हवी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,

१. आर्थर रोड कारागृहामधील नालासोपारा खटल्यातील आरोपी सुधन्वा गोंधळेकर यांच्या दोन्ही बाजूंच्या दाढा किडलेल्या असून त्यांना उपचारही मिळत नाहीत. त्यांना जेवताही येत नाही, अशी त्यांची गंभीर स्थिती गेले २ मास आहे. दुसरीकडे आणखी एक आरोपी गणेश मिस्किन यांना ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा त्रास होत आहे. त्यांनाही पूर्ण उपचार मिळत नाहीत. न्यायालयात अर्ज करूनही आतापर्यंत त्यांना उपचार मिळालेले नाहीत. फादर स्टेन यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करणारे अशा कैद्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येणार आहेत का ? कि हे केवळ एका मृत्यूवरून होणारे राजकारण आहे ? प्रत्यक्षात ही यंत्रणा कधी जागी होऊन समान न्याय करणार आहे ?

२. कैद्यांना व्यवस्थित उपचार मिळाले पाहिजेत आणि त्यांचे खटले लवकर निकाली निघाले पाहिजेत. गेली ६ वर्षे दाभोलकर हत्या प्रकरणात कारागृहात असणारे निरपराधी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचेही दुःख फादर स्टेन स्वामी यांच्या दुःखाहून अल्प नाही. याचीही नोंद घ्यावी, अशी आमची भावना आहे.