गोतस्कराने गोवंशियांची देखभाल आणि संगोपन करण्यासाठी गोशाळेला खर्च द्यावा !

गोवंश तस्करीच्या प्रकरणी सावंतवाडी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत केला जाणारा गोवंशियांच्या तस्करीचा प्रयत्न गोरक्षकांकडून हाणून पाडला जात आहे. अशा प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने गोवंशियांची वाहतूक करणारी वाहने आणि त्यांचे मालक यांच्या विरोधात कारवाई केली जाते. अशाच एका प्रकरणात न्यायालयाने ‘गोवंशियांच्या तस्करीच्या प्रकरणातील आरोपीने गोशाळेला देखभाल आणि संगोपन खर्च द्यावा’, असा निकाल दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचा निकाल देण्याची ही पहिलीच घटना असून यांमुळे गोरक्षकांच्या प्रयत्नाला यश आले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे भविष्यात गोवंशियांच्या तस्करीला प्रतिबंध लागण्याची शक्यता आहे.

कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील मनोज मंगेश सावंत यांचे वाहन गोवंशियांची वाहतूक करतांना पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यात कह्यात घेतले होते. हे वाहन तात्पुरते वापरण्यास मिळावे, यासाठी सावंत यांनी न्यायालयात अर्ज केला होता. याला ‘ध्यान फाऊंडेशन झांबोलिम गोशाळा’ या संस्थेने विरोध दर्शवला होता. ध्यान फाऊंडेशनचे अधिवक्ता राजू गुप्ता आणि मानद पशूकल्याण अधिकारी सचिन झुंजारराव यांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तीवाद केला होता.

यावर निकाल देतांना न्यायालयाने म्हटले आहे की …

१. अर्जदाराने २ लाख रुपयांचे क्षतीपूर्ती बंधपत्र सादर करावे. गुन्ह्यात कह्यात घेतलेल्या ३ बैलांच्या देखभालीसाठी आणि उपचारांसाठी २० जानेवारी ते २१ मार्चपर्यंतच्या कालावधीत झालेला ३६ सहस्र रुपये खर्च गोशाळेला द्यावा.

२. भविष्यात न्यायालयाच्या आदेशानुसार प्राण्यांच्या देखभालीचा खर्च देण्याचे दायित्व अर्जदाराचे राहील, तसेच अर्जदाराने वाहनाचा गैरवापर करू नये आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ते न्यायालयात सादर करावे.