माझे दूरभाष ध्वनीमुद्रित करून मला ‘अमजद खान’ नाव ठेवले ! – नाना पटोले यांचा सभागृहात गंभीर आरोप !
मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – विधानसभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी दूरभाष ध्वनीमुद्रित केल्याविषयी गंभीर आरोप केले. ‘वर्ष २०१६-१७ मध्ये माझा दूरभाष ध्वनीमुद्रित करण्यात आला. माझे नाव ‘अमजद खान’, असे ठेवण्यात आले होते. माझ्यासमवेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय साहाय्यक, तसेच खासदार संजय काकडे यांचाहे दूरभाष ध्वनीमुद्रित करण्यात आले आहेत’, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘मागील काळात करण्यात आलेल्या खासदारांच्या दूरभाष ध्वनीमुद्रित (फोन टॅपिंग) प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सभागृहाला त्याची पुढील अधिवेशनात माहिती देण्यात येईल’, असे घोषित केले.
नाना पटोले म्हणाले की, अनेक लोकप्रतिनिधींचे दूरभाष ध्वनीमुद्रित केले आहेत. मी खासदार होतो. त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काही कारण नव्हते. सत्ताधारी खासदारांचे दूरभाष ध्वनीमुद्रित केले जातात. कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही. माझे नाव ‘अमजद खान’ असे मुसलमानाचे नाव का ठेवले ? सरळ माझेच नाव टाकायला हवे होते. या पद्धतीने हिंदु-मुसलमान यांच्यात वाद निर्माण करून धर्माच्या नावाने राजकारण करून राज्य पेटवायचा हा उद्देश होता का ?
…. तर ‘देशमुख, भुजबळ करून टाकू’ अशी धमकी दिली जाते !
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात आमदार भास्कर जाधव यांना ‘एक सदस्य सांगत होते, ‘तुम्ही बोललात, तर तुमचाही अनिल देशमुख करून टाकू’, अशी धमकी देतात. बाहेर सांगतात ‘भुजबळ करून टाकू.’ अशी धमकी या सभागृहात कशी दिली जाते ?
कलादिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली. ज्या संघटनेची व्यक्ती यात पकडली गेली, त्या संघटनेचा अध्यक्ष भाजपचा आमदार आहे. त्यांचे नाव समोर आले पाहिजे, असे नाना पटोले यांनी या वेळी सांगितले.