सांगली, १ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राला नैतिक बळ मिळवून देणार्या उदात्त, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक अशा आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी अशा पायी वार्या करणारे संपूर्ण महाराष्ट्रात लक्षावधी वारकरी आहेत. वारकरी आणि धारकरी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे निघणार्या देहू, आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीत खंड पडू नये, अशा मागणीचे निवेदन ३० जून या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले. या वेळी विविध वारकरी संप्रदायातील प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाही वारी निघणार म्हणून वारकरी उत्सुक होते. महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता संसर्गाचे प्रमाण अत्यंत अल्प झाले आहे. इतर सर्व राजकीय कार्यक्रम जोरात चालू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम पाळून वारकरी वारीत सहभागी होण्याचे मान्य करत होते. असे असतांना चर्चेचे निमित्त करून वारकर्यांच्या भोळेपणाचा लाभ घेत त्यांच्या मागण्या अमान्य केल्या गेल्या. केवळ १०० जणांना घेऊनच सदरच्या पालख्या निघाव्यात, असे खोटे आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे नक्की केले. हा वारकर्यांचा विश्वासघातच आहे. याविरोधात ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आवाज उठवून प्रशासनाचा विरोध झुगारून समस्त वारकर्यांसह पायी वारी काढण्याचे आवाहन केले आहे.
तरी वर्षानुवर्षे निघणार्या आळंदी ते पंढरपूर या आषाढीवारीत खंड पडून नये यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी वारकरी, फडकरी, भजनी मंडळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातील, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, सर्वश्री अविनाश सावंत, हणमतंराव पवार, मिलिंद तानवडे, नितीन काळे, अंकुश जाधव यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या सगळ्यांना आपला देश कोरोनामुक्त व्हावा, असे वाटते आणि ते होणार आहे. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारीला अनुमती देण्यात यावी, अशी मागणी या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केली. |