कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी हानीभरपाईची रक्कम निश्चित करा !

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांसाठी हानी भरपाईची रक्कम निश्चित करा, असा आदेश सर्वाच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केंद्रशासनाला दिला. ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्रशासन घेईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली; मात्र भरपाईची रक्कम निश्चित करण्याचा आदेश दिला.

न्यायालयाने कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भात ३ सूत्रे केंद्रशासनाच्या लक्षात आणून दिली. न्यायालयाने म्हटले की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर दिल्या जाणार्‍या मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी मार्गदर्शिका घोषित करावी. वित्त आयोगाला ज्या शिफारसी पाठवण्यात आल्या आहेत, त्या आधारे केंद्राने लवकरात लवकर अशा व्यक्तींचे कुटुंबीय किंवा वारस यांच्यासाठी विमा योजना चालू करावी. यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या साहाय्याने किमान निकष लक्षात घेऊन कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसाठी ६ आठवड्यांच्या आत मार्गदर्शिका घोषित करावी.