नागपूर – भाजपच्या नेत्या आणि खासदार मनेका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका ‘वेटरनरी’ आधुनिक वैद्याला कुत्र्याच्या उपचारावरून दूरभाष करून शिवीगाळ केल्याची ‘ऑडिओ क्लिप’ प्रसारित झाली आहे. येथील ‘वेटरनरी’ आधुनिक वैद्यांनी २३ जून या दिवशी ‘महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापिठा’च्या प्रवेशद्वारासमोर या घटनेचा निषेध करून काळा दिवस पाळला. आधुनिक वैद्यांनी फलक हातात घेऊन मनेका गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि त्यांनी ‘पदवीधर पशुवैद्यकीय यांची क्षमा मागावी’, अशी मागणी केली. ‘मनेका गांधी यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी ‘इंडियन वेटरनरी असोसिएशन’ने पत्राद्वारे लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार केली आहे.