साधकांवर अपार प्रीती करणार्‍या आणि साधकांकडून भावजागृतीचे प्रयोग करवून घेऊन त्या माध्यमातून साधकांना भावविश्वात नेणार्‍या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव !

ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) (२४  जून  २०२१)  या दिवशी सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुंबई येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ आठवले : पू. जाधवकाकूंनी १५ वर्षांपूर्वीच घरदार सोडून विविध जिल्ह्यांमध्ये फिरून प्रसाराची सेवा केली. त्यांच्यामध्ये उपजतच भाव आणि प्रेमभाव आहे. त्यांच्या तळमळीमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब पूर्ण वेळ साधना करत आहे. मी दौर्‍यावर असतांना जेव्हा अकलूजला जात असे, तेव्हा त्यांच्या घरी रहात असे.

कु. मधुरा भोसले : मी वर्ष २००९ मध्ये पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या समवेत ३ मास राहून त्यांच्याकडून प्रसाराची सेवा शिकत होते. त्या साधकांचा सत्संग घेतांना सर्वांना सूक्ष्मातून रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत घेऊन जात असत आणि सर्वांना तुमच्याशी सूक्ष्मातून बोलण्यास सांगत असत. अशा प्रकारे त्या भावप्रयोग करवून घ्यायच्या. त्यामुळे अनेकांची भावजागृती होत असे आणि त्यांचे मन हलके होत असे.

परात्पर गुरु डॉ आठवले : पू. जाधवकाकूंनी प्रसारात अनेक वर्षांपूर्वी भावजागृतीचे बीजारोपण केले होते आणि आता भावसत्संगरूपी भावाचा वटवृक्ष बहरून आलेला आहे. साधकांना भावप्रयोग शिकवण्याचे श्रेय पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांना जाते.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१८)

१. सौ. जान्हवी चंद्रकांत भदिर्के, वडाळा

१ अ. सेवा भावाच्या स्तरावर करायला शिकवून प्रत्येक वेळी नवीन भावप्रयोग सांगून सर्वांनाच भावविश्वात नेणे : ‘पू. (सौ.) संगीता जाधवकाकू मुंबईत येण्यापूर्वी माझ्याकडून सेवा करतांना पुष्कळ वेळा पाट्याटाकूपणा होत होता. पू. जाधवकाकू मुंबईत आल्यावर गुरुमाऊलींनी त्यांच्या माध्यमातून आमच्या जीवनाचे सार्थक करण्याची संधी दिली. पू. जाधवकाकूंनी आमच्या मनावर ‘भाव’ म्हणजे काय, प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर कशी करायची ? भावाचे महत्त्व’, यांविषयीची सूत्रे बिंबवली. त्याआधी ‘भाव तेथे देव’ हे मला केवळ ऐकून ठाऊक होते. माझ्याकडून हे सूत्र प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न झाला नव्हता. पू. काकू सत्संगाच्या आरंभी सर्वप्रथम भावप्रयोग घ्यायच्या. त्या आम्हाला प्रत्येक वेळी नवीन भावप्रयोग सांगून भावविश्वात न्यायच्या. आम्ही हे आतापर्यंत कधीही अनुभवले नव्हते.

१ आ. पू. (सौ.) जाधवकाकूंनी ‘गुरुमाऊली आणि सद्गुरु’ यांचे जीवनातील महत्त्व लक्षात आणून देणे : पू. जाधवकाकू आम्हाला ‘गुरुमाऊली कोण आहेत, त्यांचे आपल्या जीवनात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे’, याची जाणीव करून देऊन आम्हाला ध्येयाची आठवण करून देतात. ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या आम्हाला प्रसारसेवक म्हणून लाभूनही त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यात आम्ही न्यून पडतो’, याची जाणीव पू. जाधवकाकू आम्हाला सतत करून देतात. त्या आम्हाला सद्गुरूंचे माहात्म्य सांगून भगवंताला आवडेल, अशी कृती करण्यास सतत आध्यात्मिक ऊर्जा पुरवतात. गुरुदेव आणि सद्गुरु (कु.)अनुराधा वाडेकर यांना आज मी माझ्या अल्पमतीने जे काही अनुभवू शकते, ते केवळ आणि केवळ पू. जाधवकाकू यांच्या कृपेमुळेच !

‘हे भगवंता, पू. जाधवकाकूंच्या सत्संगाचा लाभ करून घेण्यात मी पुष्कळच अल्प पडले आहे. ‘हे भगवंता, तुला अपेक्षित असे प्रयत्न तूच माझ्याकडून चिकाटीने आणि तळमळीने करवून घे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने अन् आर्ततेने प्रार्थना आहे.’

२. श्री. प्रकाश सागवेकर, मुंबई

२ अ. साधकांना सतत भावावस्थेत ठेवणार्‍या पू. (सौ.) जाधवकाकू ! : ‘पू. जाधवकाकू ‘प्रत्येक सेवा करतांना भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी सतत मार्गदर्शन करतात. त्या आमच्याकडून प्रत्येक सेवेचे भावाला जोडून सविस्तर नियोजन लिहून घेतात. त्यामुळे सेवा करत असतांना त्या त्या वेळचा भाव आठवला जाऊन आम्ही साधक भावावस्थेत रहातो.

२ आ. साधकांवर प्रेम करून त्यांना तत्परतेने साहाय्य करणे : एकदा माझा दुचाकी घसरून अपघात झाला होता. त्या वेळी पू. जाधवकाकूंनी भ्रमणभाष करून माझी विचारपूस केली. त्यांनी ‘काही लागल्यास निःसंकोचपणे कळवा’, असे सांगून मला नामजपादी उपाय सांगितले. त्यामुळे माझे हाताचे शस्त्रकर्म कुठलाही त्रास न होता निर्विघ्नपणे पार पडले.

मला पक्षाघाताचा झटका आला असतांना पू. जाधवकाकूंनी सौ. कार्येकरताईंकडून रुग्णालयात माझ्या जवळ थांबण्यासाठी साधकांचे नियोजन करून घेतले. ‘जानेवारी २०१८ पासून पू.  जाधवकाकू संत झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते. गुरुमाऊली, आपणच माझ्याकडून हे लिहून घेतले. त्याविषयी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

३. श्रीमती मंगल लोंढे, ऐरोली, नवी मुंबई

३ अ. सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत पू. (सौ.) जाधवकाकूंचा सहभाग असणे : ‘पू. (सौ.) जाधवकाकू मुंबईला येण्यापूर्वी सोलापूरच्या जिल्हासेवक होत्या. त्या वेळी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा असतांना मी त्या ठिकाणी १० दिवस सेवेला गेले होते. त्या वेळी पू. जाधवकाकू प्रत्येक सेवेत सहभागी असायच्या. त्यांच्यातील नियोजन कौशल्य, सकारात्मकता, तत्परता, प्रेमभाव आणि प.पू. गुरुदेवांप्रती असलेला भाव पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटायचे.

३ आ. ‘पू. (सौ.) जाधवकाकूंचा सत्संगातील प्रत्येक शब्द, म्हणजे गुरुवाणीच आहे’, असे वाटणे : ‘पू. (सौ.) जाधवकाकू मुंबईत आल्यापासून त्यांचा सत्संगातील प्रत्येक शब्द, म्हणजे गुरुवाणीच आहे’, असेच मला वाटायचे. त्या साधकांना आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देतात. ‘साधकांनी घडावे, पुढच्या टप्प्याला जावे, सद्गुरु (कु.) अनुताई यांच्या अस्तित्वाचा लाभ करून घ्यावा’, अशी त्यांची सतत तळमळ असते. त्यांच्यात असलेल्या दैवी गुणांचे आम्हाला वर्णनही करता येत नाही. आईच्या मायेने सर्वांना मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) जाधवकाकूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

४. सौ. मंगला देवेंद्र म्हात्रे, वरळी, मुंबई

४ अ. पू. (सौ.) जाधवकाकू यांचा मंजूळ आवाज आणि मधुर हास्य यांची आठवण झाल्यावर नकारात्मकता नष्ट होऊन साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळणे : ‘पू. (सौ.) जाधवकाकूंनी नेसलेली सात्त्विक साडी सुसंस्कार आणि शालीनता यांचे प्रतीक आहे. ‘पू. जाधवकाकूंचे डोळे सर्वच साधकांना सामावून घेत आहेत’, असे मला वाटते. पू. जाधवकाकूंच्या कपाळावरील लाल कुंकू पाहून देवीतत्त्वाची जाणीव होते. त्यांचा मंजूळ आवाज आणि मधुर हास्य आठवले, तरी नकारात्मकता नष्ट होऊन साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा मिळते. सद्गुरु (कु.)अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) जाधवकाकू नेहमीच एकत्र असतात, एकत्रच जेवतात. हे पाहून एका अभंगाच्या दोन ओळी आठवतात.

सद्गुरुसारिखा असता पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ।।

आपणासारिखे करिती तत्काळ ।
नाही काळ वेळ मग त्यासी ।।

स्वत: आनंदी राहून सर्व साधकांना आनंद देणार्‍या पू. (सौ.) जाधवकाकूंना आम्हा सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’

५. सौ. विद्यागौरी गुजर, नेरूळ, नवी मुंबई

५ अ. ‘प्रत्येक कृती नियोजनासहित केल्याने ती सेवा देवाला आवडते’, हे साधकांच्या मनावर बिंबवणे : ‘पू. (सौ.) जाधवकाकूंनी आम्हा साधकांवर प्रत्येक कृती नियोजनपूर्वक करण्याचा संस्कार केला. ‘नियोजनासहित कृती केल्याने ती देवाला आवडेल आणि ती सेवा ईश्वरचरणी रुजू होईल’, हे त्यांनी साधकांच्या मनावर बिंबवले.

५ आ. प्रत्येक कृती करतांना देवाचे साहाय्य घेण्यास शिकवणे : पू. (सौ.) जाधवकाकू साधकांवर निरपेक्ष प्रेम करतात. त्यांनी आमच्यातील संत आणि गुरु यांच्याप्रतीच्या श्रद्धेत वृद्धी केली. ‘संत किती निरपेक्षपणे वागतात ? ते भाव कसा ठेवतात ? देवाचे अस्तित्व कसे ओळखायचे ? प्रत्येक कृती देवाचे साहाय्य घेऊनच केली पाहिजे’, हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवले.

५ इ. साधकांच्या साधनेचा विचार करून त्यांच्यात भक्ती निर्माण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि नियमित १० देवदूतांचे साहाय्य घेऊन सेवा करण्यास सांगणे : पू. (सौ.) जाधवकाकूंनी त्यागाचे महत्त्व सांगून आम्हाला ‘त्याग करणे किती महत्त्वाचे आहे ?’, हे लक्षात आणून दिले. ‘साधकांना प्रत्येक वेळी चांगले कसे देऊ’, असा त्यांचा विचार असतो. साधक सेवेसाठी देत असलेल्या वेळेत ‘त्याची सेवा-साधना कशी होईल ?’, हा त्यांचा विचार असतो. त्या साधकांना नियमितपणे १० देवदूतांचे (ध्येय, नियोजन करणे, भाव, पालटण्याची तीव्र तळमळ, प्रार्थना, सतर्कता, अनुसंधान, खंत निर्माण करणारा देवदूत, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव या देवदूतांचे) साहाय्य घेऊन सेवा करायला सांगतात. त्यांना ‘साधकांनी गुरुदेवांच्या चरणांजवळ जावे’, हा ध्यास आहे. ‘देवाला आपण मन द्यायला पाहिजे’, असे त्या सांगतात. ‘आपल्यात भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. आपण भक्त होण्यासाठी सतत अनुसंधानात रहायला हवे. आपण दिवसभरात किती वेळा गुरुदेवांना शरण जातो. ईश्वर जे चैतन्य देतो, ते घेण्यासाठी सतत सिद्ध असायला पाहिजे. देवाला सतत शरण कसे जायचे ? सतत अनुसंधानात कसे रहायचे ? आणि ते चैतन्य ग्रहण कसे करायचे ?’, हे त्यांनी आम्हाला शिकवले. त्यामुळे आम्हा साधकांकडून तसे प्रयत्न होऊ लागले.

५ ई. सेवाकेंद्रात येण्याचे आणि प्रायश्चित्त घेण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे : मी प्रत्येक आठवड्याला सेवाकेंद्रात जाते. ‘सेवाकेंद्रातील चैतन्य आणि पावित्र्य कसे वाढेल ?’, या दृष्टीनेही साधना म्हणून सेवाकेंद्राप्रती भाव कसा असावा ?’, याविषयीचे सूत्रे त्यांनी लक्षात आणून दिली. ‘प्रायश्चित्त घेतल्याने आपण जलद गतीने देवाच्या जवळ जाऊ’, याची जाणीव पू. (सौ.) जाधवकाकूंनी करून दिली.

५ उ. आईप्रमाणे माया करून साधकांना घडवणे : आईला मुलाला घडवण्याची जशी तळमळ असते, तशी सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांना साधकांना घडवण्याची तळमळ आहे. त्या आम्हाला आईच्या मायेने घडवत आहेत. त्यांच्या नुसत्या आठवणीनेही मनात भाव निर्माण होतो आणि देवाप्रती कृतज्ञता वाटते.

हे श्रीकृष्णा, प.पू. गुरुदेवा, तुमच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत. गुरुदेवा, या आपत्काळातही तुम्ही आम्हाला तुमच्या, तसेच सद्गुरु आणि संत यांच्या छत्रछायेखाली ठेवले आहे. त्याविषयी मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

६. श्रीमती आरती गडदे, दादर, मुंबई

६ अ. आध्यात्मिक त्रास असूनही सतत हसतमुख आणि आनंदी असणे : ‘पू. जाधवकाकूंचे मार्गदर्शन आम्हा विज्ञापने आणणार्‍या सेवकांना मिळते. पू. काकूंना आध्यात्मिक त्रास होत असतांनाही त्या आमचा सत्संग घ्यायच्या. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही त्रास जाणवत नाही. त्या सदा हसतमुख आणि आनंदी असतात.

६ आ. पू. जाधवकाकूंच्या बोलण्यातून सद्गुरु (कु.) अनुताईंविषयी अपार श्रद्धा, प्रेमभाव आणि आत्मीयता जाणवते.

६ इ. ‘पू. (सौ.) जाधवकाकू प्रत्येक कृती करतांना किंवा आमच्याशी बोलतांना त्यांचे गुरुदेवांशी अनुसंधान असते’, असे जाणवणे : पू. (सौ.) जाधवकाकूंकडे बघतांना मला शांत वाटते आणि आनंद होतो. ‘त्या माझ्याकडे पहात असतांना त्या माझ्या मनातील प्रत्येक विचार वाचत आहेत’, असे मला जाणवते. प्रत्येक कृती करतांना किंवा आमच्याशी बोलतांनाही त्यांचे गुरुदेवांशी अनुसंधान असल्याचे जाणवते.’

७. कु. वत्सला श्रीधर रेवंडकर, मुंबई

७ अ. प्रथम भेटीतच जवळीक साधणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी कु. सुगुणा गुज्जेटी यांनी माझी पू. (सौ.) जाधवकाकूंशी ओळख करून दिली. पू. जाधवकाकू गोड हसून बोलत होत्या. त्यांना पहातांना मनात आले, ‘या काकू ? ही तर माझी मैत्रीण. किती आपुलकी आणि किती प्रेमाने बोलतात !’

७ आ. सत्संगात कार्य आणि साधना यांचा समन्वय कसा साधायचा, ते शिकवणे : सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू विज्ञापने आणणार्‍या साधकांचा सत्संग घेतात. तेव्हा ‘विज्ञापनदात्यांना भावाच्या स्तरावर कसे जोडायचे ?’, यावर त्यांचा भर असतो. ‘आमच्याकडून विज्ञापनाची सेवा कार्य म्हणून होण्याऐवजी साधना म्हणून कशी होईल ?’, याकडे त्या लक्ष देतात.

७ इ. आध्यात्मिक आई : आई ज्याप्रमाणे मुलांना वळण लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याप्रमाणे पू. जाधवकाकूंचे बोलणे साधकांना आध्यात्मिक वळण लावण्यासाठी असते.

७ ई. नेमकेपणा : एखादी साधिका पुष्कळ सूत्रे सांगत असल्यास ‘पू. काकू नेमकेपणाने कसे सांगायला पाहिजे ?’, ते शिकवतात.

७ उ. उत्तम समन्वयक : सद्गुरु (कु.) अनुताई जे मार्गदर्शन करतात, ते पू. (सौ.) जाधवकाकू साधकांच्या मनावर बिंबवतात. तेव्हा साधक ‘आम्हाला समजले नाही’, असे कधी म्हणत नाहीत.

७ ऊ. चुकीची जाणीव करून देऊन साधनेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे : त्या ‘स्वभावदोष सत्संगात चुकीच्या मागे अहं कसा लपलेला आहे ?’, हे नेमकेपणाने दाखवतात. त्या सत्संगात कठोर बोलल्या, तरी नंतर प्रेमाने ‘साधनेत पुढे जाण्यासाठी काय करायचे ?’, याविषयी सांगतात.

७ ए. अनासक्त आई : पू.  जाधवकाकूंची दोन्ही मुले पूर्ण वेळ साधक आहेत. सामान्यपणे एका स्त्रीला तिच्या मुलांविषयी बोलायला आवडते; मात्र पू. जाधवकाकू स्वतःच्या मुलांविषयी कधीच बोलत नाहीत.

७ ऐ. परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा : ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् श्रीमन्नारायण आहेत आणि असे महान गुरु लाभले’, यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे’, हे त्या प्रत्येक साधकाच्या मनावर बिंबवतात.’

८. श्री. प्रवीण पाटील, मध्य मुंबई

८ अ. सोप्या भाषेत मार्गदर्शन करणे : ‘पू. जाधवकाकूंनी आम्हाला प्रसारातील बारकावे मार्गदर्शनातून आणि शिबिरातून शिकवले. दत्तजयंती, महाशिवरात्र यानिमित्त आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये त्यांची निरनिराळी सूत्रे असायची. ‘गुरुमाऊलीची अमृतवाणीच त्यांच्या मुखातून बाहेर पडते’, असे मला वाटते. त्या बोलतांना ‘गुरुकृपेचा ओघ आणि प्रवाह कसा असतो ?’, ते आम्हाला कळायचे. ‘कृतज्ञताभाव कसा असावा ? कसा वाढवावा ?’, त्याविषयी पू. जाधवकाकूंनी इतक्या सोप्या शब्दांत सूत्रे सांगितली की, ते सहज जमायला लागले. ‘प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव कसा असावा ?’, याविषयी सूत्रे सांगताना त्यांच्या आवाजात कृतज्ञताभाव दाटून यायचा. त्यामुळे ‘आम्हा सर्व साधकांमध्ये कृतज्ञताभाव काही अंशी उतरला’, असे वाटते.

८ आ. साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणे : साधकांची सेवा होत नसल्याचे लक्षात आल्यास लगेच पू. जाधवकाकू आणि सद्गुरु (कु.) अनुताई साधकांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांना ‘आमच्या साधनेची काळजी आहे’, असे लक्षात आले. पू. जाधवकाकू आणि सद्गुरु (कु.) अनुताई जिल्ह्यातील बहुतेक सर्व साधकांना ओळखतात.

गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु (कु.) अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळाले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ‘या घनघोर आपत्काळात त्यांच्या अस्तित्वाचा लाभ आम्हा सर्व साधकांना आमच्या प्रगतीसाठी करून घेता येऊ दे’, हीच श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना !’ (२९.६.२०१८)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक