गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर चीनच्या सैन्याला अजून चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे ! – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत

नवी देहली – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणार्‍या गलवान खोर्‍यात आणि अन्य ठिकाणी झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्याला अजून सिद्धतेची अन् चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे जाणवले आहे, असे विधान भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी केले आहे. ते ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भारत आणि चीन यांच्यात अद्यापही तणावाची स्थिती कायम आहे.

जनरल रावत म्हणाले की, चिनी सैनिक हिमालयाच्या टेकड्यांवर लढाईसाठी सक्षम नाहीत आणि ते दीर्घ कालावधीसाठी सामनाही करू शकत नाहीत. भारताला लागून असलेल्या सीमेवर चिनी सैनिकांच्या तैनातीमध्ये पालट करण्यात आला आहे. चिनी सैनिक छोटी लढाई लढू शकतात. त्यांच्याकडे या भागात लढाईचा अनुभव नाही. भारत चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. भारतीय सैन्य सदैव सज्ज आहे. भारतीय सैनिकांनी उत्तम सिद्धता केली आहे. डोंगराळ भागांमध्ये भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या तुलनेत उत्तमच आहे. सैन्यासाठी पश्‍चिम आणि उत्तर आघाडी आवश्यक आहे. उत्तर आघाडीवर सध्या काही प्रमाणात हालचाली वाढल्या आहेत, अशी माहितीही रावत यांनी दिली.