सनातनच्या १०८ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सरिता पाळंदे यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पुणे येथील सातारा रस्ता केंद्रातील साधिका सौ. सरिता अरुण पाळंदे यांचे ३१.५.२०२१ या दिवशी  निधन झाले. त्यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवशी (१२.६.२०२१ या दिवशी) त्यांना संत म्हणून घोषित केले. त्यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. (सौ.) सरिता पाळंदे

१. सौ. प्रतिभा फलफले

१ अ. निरागसता आणि निर्मळता

सौ. पाळंदेकाकूंचे मन निर्मळ आणि लहान मुलांप्रमाणे निरागस होते. त्यांच्याशी बोलतांना त्या निरागसपणे बोलायच्या. त्यांच्यामध्ये कुटुंबीय आणि साधक या सर्वांविषयी सारखाच प्रेमभाव होता.

१ आ. शिकण्याची वृत्ती

पाळंदेकाकूंचे वय अधिक असूनही त्यांनी नातवाइकांकडून ‘अँड्रॉईड’ भ्रमणभाष हाताळणे शिकून घेतले होते.

१ इ. आजारपणातही आनंदी असणार्‍या सौ. पाळंदेकाकू !

काकू सतत आनंदी असत. त्यांची शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही त्यांच्या बोलण्यातून ‘त्या आजारी आहेत’, असे जाणवायचे नाही. त्यांना होत असलेले त्रास सांगतांना त्या आनंदाने आणि सहजतेने सांगत.

मागील काही मासांपूर्वी त्यांचे पोटाचे शस्त्रकर्म झाले होते. त्या ३ आठवडे रुग्णालयामध्ये होत्या. एवढे मोठे आजारपण असूनही काकूंनी ‘त्यांचे शस्त्रकर्म झाले’, हे सहजतेने आणि आनंदाने सांगितले.

१ ई. ‘साधना करणे’, हेच ध्येय असणार्‍या पू. (सौ.) पाळंदेकाकू !

काकूंचे जीवन साधनामय होते. घरात होणार्‍या कौटुंबिक आणि धार्मिक कार्यक्रमात काकू नातेवाइकांनो ग्रंथ अन् उत्पादने भेट देत असत. काकू अखंड गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून सतत नामजप करायच्या. ‘साधना करणे’, हेच काकूंचे ध्येय होते’, असे मला जाणवायचे. मी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नामजपादी उपायांच्या संदर्भात आलेली सूचना सांगायला भ्रमणभाष करायचे. तेव्हा त्यांनी ती सूचना वाचून तसे प्रयत्न करायला आरंभही केलेला असायचा.

१ उ. अपार कृतज्ञताभाव

१. काकूंना प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञता वाटायची. ‘नातवाने मला भ्रमणभाष घेऊन दिला आहे आणि हाताळायला शिकवले. त्यामुळे मला ऑनलाईन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचता येते. तसेच ऑनलाईन सत्संगही पहाता येतो’, हे सांगतांना त्यांचा पुष्कळ कृतज्ञातभाव असायचा.

२. त्यांच्या सूनबाईंनी त्यांची आजारपणात कशी काळजी घेतली, तसेच सूनबाई सर्वकाही प्रेमाने करतात, याविषयीही त्यांना कृतज्ञता वाटायची.

३. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक भाग पाहून ‘त्यातून गुरुदेवांची कृपा कशी आहे’, हे त्या अतिशय कृतज्ञतेने सांगायच्या.

१ ऊ. श्रद्धा

प्रत्येक प्रसंग त्या देवावर सोपवून निश्चिंत रहात असत. ‘या आजारपणात देव एकेक करून माझे प्रारब्ध संपवत आहे’, असे त्या सांगायच्या. ‘मी सर्व देवावर सोपवले आहे’, हे त्या श्रद्धेने आणि निश्चिंतपणे सांगायच्या. आजारपणात काकूंनी शेवटपर्यंत संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय श्रद्धेने केले. काकूंचे देहावसान झाले, त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता काकूंनी मला भ्रमणभाष केला होता. तेव्हा काकूंनी ‘माझे पोट दुखत आहे आणि वेदनाशामक इंजेक्शन घेऊनही थांबत नाही’, असे सांगितले. तेव्हा काकू पुष्कळ स्थिर होत्या. त्यांच्या बोलण्यातून ‘त्यांना वेदना होत आहेत’, असे जाणवले नाही.

१ ए. ‘काकू लवकरच संतपदाला पोचतील’, असे जाणवणे

काकूंचे देहावसान होण्याच्या ५ दिवस आधी माझे काकूंशी अनौपचारिक बोलणे झाले. तेव्हा त्यांचे बोलणे ‘ऐकतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या बोलण्यातून पुष्कळ आनंद जाणवत होता. काकूंशी बोलतांना माझे मनही आनंदी झाले होते. बोलून झाल्यावरही मनाची आनंदावस्था १५ – २० मिनिटे टिकून होती. त्या वेळी ‘काकू लवकरच संतपदी विराजमान होतील’, असा माझ्या विचार मनात येऊन गेला.

(‘त्या लवकरच संतपदाला गाठतील’, असे वाटते.’ – सौ. नीता पाटील आणि श्री. गजानन साठे)

२. श्री. रवींद्र आणि सौ. राजश्री गोंधळेकर

२ अ. दायित्व घेऊन सेवा करणे

काही वर्षांपूर्वी प्रत्येक सोमवारी अरण्येश्वर मंदिर, सहकारनगर येथे सायंकाळी ग्रंथप्रदर्शन सेवा असायची. तेव्हा काकू आदल्या दिवशीच सर्व साहित्य आणि ग्रंथांच्या पिशव्या यांची सिद्धता करून ठेवायच्या. त्यांची साहित्य आणि ग्रंथांची सूची सिद्ध असायची. त्यामुळे हिशोब चोख असायचा.

२ आ. वेळेचे पालन आणि इतरांचा विचार

ग्रंथप्रदर्शन लावायची वेळ संध्याकाळी ५ वाजता असायची, परंतु काकू घरातून दुपारी ४.३० वाजता निघायच्या आणि रिक्शा करून वाटेत १ – २ साधकांना घेऊन मंदिरात वेळेत पोचायच्या.

२ इ. योग्य शब्द वापर करण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे

ग्रंथप्रदर्शनानंतर साहित्य आवरतांना मी त्यांना विचारायचे, ‘‘वस्तू या पिशवीत टाकू का ?’’ तेव्हा त्या मला समजावून सांगायच्या, ‘‘ठेवू का ?’ असे म्हण. ‘टाकू का’, असे म्हणायचे नाही.’’

ई. सेवा करतांना ‘गुरूंचे आहे’, हा भाव ठेवून सेवा करणे

‘ग्रंथ हा गुरूंचा अनमोल ठेवा आहे’, असा काकूंचा भाव असल्याने त्या ग्रंथ व्यवस्थित ठेवत असत. प्रदर्शनकक्ष आवरतांना प्रत्येक ग्रंथ कापडाने पुसूनच पिशवीत ठेवत असत.’

३. श्री. गजानन साठे

३ अ. गुरुसेवेची तळमळ

वर्ष २००१ मध्ये मी सेवानिवृत्त झालो. तेव्हा प्रथमच सहकारनगर येथील ‘श्री अरण्येश्वर’ मंदिरात प्रत्येक सोमवारी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनावर सेवेसाठी जायला लागलो. तेव्हा पाळंदेकाकू प्रदर्शनाचे सर्व साहित्य, ग्रंथस्टँड आणि ग्रंथ वेळेत आणायच्या. त्यांच्यामुळे मला समष्टी सेवेची प्रेरणा मिळाली. नंतर मी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वितरण, अर्पण घेणे इत्यादी सेवा करू लागलो. त्यांनी ग्रंथप्रदर्शनाची सेवा तळमळीने आणि परिपूर्णतेने केली. पूर्वी त्या सहकारनगर भागातील ५ – ६ ठिकाणच्या देवालयांमध्ये नियमितपणे ग्रंथप्रदर्शन लावायच्या. त्यांना गुरुसेवेची पुष्कळ तळमळ होती.

४. सौ. मंगला साठे

४ अ. सेवेची तळमळ

त्यांच्या सूनबाईंनी ‘स्कूल बस’चा (‘व्हॅन’चा) नवीन व्यवसाय आरंभ केला. ‘त्या ‘स्कूल बस’वर प्रशिक्षित वाहक असावा’, असे असल्याने पाळंदेकाकू वयाच्या ५५ व्या वर्षी गाडी चालवायला शिकल्या आणि त्या सकाळी ६ वाजता ‘स्कूल बस’वर जात असत. तेव्हा त्या मुलांना साधना सांगत. तिथेही ‘सेवा कशी होईल ?’, हा त्यांचा ध्यास असायचा.

४ आ. परिपूर्ण सेवा करणे

काकू ग्रंथ प्रदर्शनसेवेची सर्व सिद्धता परिपूर्ण करायच्या. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी मुंग्या असल्यास त्यांचा त्रास होऊ नये; म्हणून त्या ग्रंथप्रदर्शनाला येतांना मुंग्यांची पावडरही आठवणीने समवेत आणत असत.

४ इ. इतरांचा विचार करणे

भाववृद्धी सत्संग ऐकण्यासाठी त्यांच्या घरी साधक जायचे. थंडीचे दिवस असतांना साधकांच्या पायांना गारवा लागू नये; म्हणून त्या ‘प्रत्येक साधकाच्या पायाखाली पायपोस येईल’, अशा पद्धतीने आसद्यांची रचना करत असत.

५. सौ. अनुराधा तागडे

५ अ. सेवेची तळमळ

काकू मनापासून आणि तळमळीने सेवा करायच्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ग्रंथ आणि नामपट्ट्या यांचा साठा असायचा. त्या साधकांच्या मागणीनुसार तत्परतेने साहित्य पोचवण्याचे नियोजन करत.

५ आ. संस्थेची उत्पादने घरोघरी पोचवण्याची तळमळ

त्यांना सनातन-निर्मित उत्पादने, ग्रंथ, नामजप समाजात पोचवण्याची तळमळ होती. त्यांच्या घरात कोणताही कार्यक्रम असला, तरी त्या येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ग्रंथ, उत्पादने यांचा संच बनवून भेट द्यायच्या. ‘घराघरांत सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ पोचावेत’, असा त्यांचा त्यामागचा उद्देश असायचा.

५ इ. प्रेमभाव

काकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव होता. त्यांच्याकडे आंब्याची झाडे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत त्या साधकांसाठी कैरीचे पन्हे करून आणायच्या.

५ ई. सतत उत्साही आणि आनंदी व्यक्तीमत्त्व

काकूंना कधीही भ्रमणभाष केला, तरी त्या सतत उत्साही आणि आनंदी असायच्या. त्यांना निराशा आलेली मी कधीच पाहिली नाही. त्यांचे वयोमान आणि आजारपण यांमुळे त्यांना बाहेर सेवेला जायला जमत नसे; पण त्यांनी कधी त्याविषयी तक्रार केली नाही. त्यांनी प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारली.

६. सौ. राजश्री खोल्लम, पुणे

६ अ. आसक्ती नसणे

‘सौ. पाळंदेकाकू उच्चभ्रू कुटुंबातील होत्या, तरीही त्यांचे रहाणीमान अतिशय साधे होते आणि गुरुकृपेने असलेल्या आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीविषयी त्यांना आसक्ती नव्हती.’

६ आ. गुरुदेवांप्रती श्रद्धा

‘काहीही झाले, तरी मी गुरुदेवांचे चरण सोडणार नाही’, असे त्या श्रद्धेने सांगत असत.

७. श्री. विजय बोरामणीकर

अ. ‘सौ. पाळंदेकाकूंकडून बरेच शिकण्यासारखे होते. मी नेहमी काकूंकडे दैनिक द्यायला जात असे. त्या वेळी काकू नेहमी दैनिकाची वाट पहात असायच्या. त्या बाहेर बागेला पाणी घालत असतील, तर सांगायच्या की, काका दैनिक इकडे देऊ शकता.

८. सौ. नीता बोरामणीकर

अ. पाळंदेकाकूंना कधीच कुणाविषयी अपेक्षा किंवा प्रतिक्रिया नसायच्या.

९. लेखाचे टंकलेखन आणि संकलन करतांना साधिकांना आलेल्या अनुभूती

अ. ‘पू. (सौ.) पाळंदेकाकूंविषयीच्या लेखाचे टंकलेखन करतांना माझ्या मनाला शांतता जाणवत होती. टंकलेखन करतांना माझ्या बोटांमध्ये हलकेपणा येऊन कळफलकावर बोटांची हालचाल शांतपणे होत होती. सेवा करतांना माझा भाव जागृत होऊन गुरुदेवांविषयी कृतज्ञता व्यक्त झाली.’ – सौ. नेहा मेहता

आ. ‘धारिका संकलन करतांना मला आनंद आणि स्थिरता जाणवली. ‘पाळंदेकाकू आता आपल्यात नाहीत’, असे जाणवले नाही. ‘काकू लवकरच संतपदाला गाठतील’, असे वाटले.’ – सौ. राजश्री खोल्लम

१०. कृतज्ञता

गुरुदेवांच्या कृपेने अशा अनेक गुणांची खाण असलेल्या सौ. पाळंदेकाकूंचा सहवास आम्हाला मिळाला. त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः व्यक्त करतो. – सर्व साधक (८.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक