शिवपुरी (तालुका अक्कलकोट) येथे अग्निहोत्र भस्मापासून सिद्ध करण्यात आले ‘सॅनिटायझर’ !

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – शिवपुरी येथील विश्‍व फाउंडेशनच्या वतीने अग्निहोत्र भस्मापासून शरीराला हानीकारक नसलेले ‘सॅनिटायझर’ आणि ‘सरफेस क्लीनर’ बनवण्यात आले आहे. यापासून फळे आणि भाजीपाला स्वच्छ करता येणार असून तीन दर्जेदार उत्पादनांच्या निर्मितीला यश आले आहे. जळगाव येथील डॉ. नीलेश तेली यांनी हे संशोधन केले आहे. या उत्पादनात तांब्याचे पात्र, गायीचे शेण, गायीचे तूप, अखंड तांदूळ या साहित्याचा उपयोग करण्यात आला आहे. सूर्योदय ते सूर्यास्त यांची नेमकी वेळ साधून अग्निहोत्र भस्म मिसळून त्यावर प्रक्रिया आणि संशोधन करण्यात आले आहे.


अग्निहोत्राचा लाभ घेऊन नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत ! – डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, अध्यक्ष, विश्‍व फाउंडेशन

अग्निहोत्राचे पुष्कळ लाभ आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात अग्निहोत्राचा लाभ घेऊन नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या उत्पादनांमुळे कोरोना संसर्गापासून रक्षण होणार आहे, असे विश्‍व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी म्हटले आहे.


हे उत्पादन ११ विषाणूंचा चांगल्याप्रकारे प्रतिकार करू शकते ! – डॉ. नीलेश तेली, संशोधक, जळगाव

अग्निहोत्र भस्मापासून ‘सॅनिटाझर’ बनवण्याच्या संशोधनाला ६ मासांचा कालावधी लागला. त्यातून वेगवेगळे निष्कर्ष लावण्यात आले आहेत. हे उत्पादन ११ विषाणूंचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकते आणि त्याची टक्केवारीही ९९.९९ इतकी आहे. या उत्पादनातून नैसर्गिक शुद्धतेचा अनुभव घेऊन हानी पोचवणार्‍या घटकांना दूर ठेवता येणार आहे. १५ दिवसांत १ सहस्र १०० जणांनी हे उत्पादन वापरून खात्री केली आहे. हे उत्पादन पूर्णपणे अल्कोहोलमुक्त आहे.