उत्तरप्रदेशातील ‘कोरोनामाता मंदिर’ अज्ञातांनी पाडले !

५ दिवसांपूर्वी बांधले होते मंदिर !

  • हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा किती अभाव आहे, हेच अशा प्रकारचे मंदिर बांधण्याच्या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होते !
  • अशा प्रकारचे मंदिर बांधले जात असतांना हिंदूंचे संत, महंत, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटना, नेते यास वैध मार्गाने विरोध करत नाहीत किंवा हिंदूंचे प्रबोधनही करत नाहीत, हे अपेक्षित नाही !

प्रतापगड (उत्तरप्रदेश) – येथील शुक्लपूर गावात ५ दिवसांपूर्वी बांधण्यात आलेले ‘कोरोनामाता मंदिर’ अज्ञातांकडून पाडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, हे मंदिर वादग्रस्त भूमीवर असल्यामुळे ज्यांच्यामध्ये वाद आहे, त्यांच्यापैकीच कुणीतरी पाडले आहे.

१. ही भूमी नोएडामध्ये रहाणारे लोकेश, नागेश कुमार श्रीवास्तव आणि जयप्रकाश श्रीवास्तव यांच्या मालकीची आहे. नागेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे मंदिर केवळ भूमी लाटण्यासाठी बांधण्यात आले आहेे.

२. गावकर्‍यांनी सांगितले की, हे मंदिर लोकवर्गणीतून लोकेश कुमार श्रीवास्तव यांनी ५ दिवसांपूर्वीच बांधले होते, तसेच या मंदिरात ‘कोरोनामाते’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पूजेसाठी गावातील राधेश्याम वर्मा यांची पुजारी म्हणून नेमणूकही करण्यात आली होती. या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर ‘मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सामाजिक अंतराचे पालन करा’, असे लिहिण्यात आले होते. ‘कोरोनामाते’ला केवळ पिवळी फुले, पिवळी फळे, पिवळ्या रंगाचा गोड नैवेद्य किंवा इतर कोणत्याही गोष्टी पिवळ्या रंगाच्याच चालत असल्याचे सांगण्यात आले.

३. गेल्या मासातच तमिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये ‘कोरोनादेवी’चे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात ‘कोरोनादेवी’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.