मुंडन उत्पन्नाचा संपूर्ण अधिकार देवालयाकडे, तर मुंडनाचे कार्य नयनज क्षत्रिय संघाकडे सुपुर्द !

  • कर्नाटकमधील नंजनगुडू श्रीकंठेश्‍वर देवालयातील नवस क्षौरकर्म (मुंडन) वादाचे प्रकरण

  • श्रीकंठेश्‍वर देवालयाच्या बाजूने दिवाणी न्यायालयाचा २५ वर्षांनी निकाल !

२५ वर्षांनी निकाल लागणे, हे भारतीय न्यायपालिकेला भूषणावह नाही, असेच जनतेला वाटेल !

बेंगळुरू (कर्नाटक) – गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या नवस मुंडन प्रकरणाच्या वादावर शेवटी पडदा पडला आहे. मुंडन उत्पन्नाचा संपूर्ण अधिकार देवालयाला देण्यात आला आहे, तर केवळ मुंडनाचे कार्य नयनज क्षत्रिय संघाला दिलेे आहे. येथील दिवाणी न्यायालयाने हा  निकाल दिला आहे.

श्रीकंठेश्‍वर स्वामींच्या क्षौरकर्म कट्ट्यावर मुंडन करण्याचे कार्य करणार्‍या नयनज क्षत्रिय संघाच्या सदस्यांनी ‘आम्ही वंशपरंपरेने नवसाच्या मुंडन कार्यात जोडलेलो असून क्षौरकर्म कट्ट्यावर संघाचा अधिकार आहे’, असे सांगत क्षौरकर्म कट्ट्यावरील सर्व उत्पन्न संघाने स्वतःकडे घेतले. त्यामुळे देवालय हुंडीची लाखो रुपयांची हानी होऊ लागली. देवालय व्यवस्थापन समितीने मुंडन सेवा देवालयाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी लढा देत होती. या संदर्भात २५ वर्षांपूर्वी संघाने नरसिंहपूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय दिला.