१. सौ. मनीषा पाठक, पुणे
अ. ‘पाळंदेकाकू या उत्साही, आनंदी आणि हसतमुख होत्या. त्यांच्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया किंवा नकारात्मकता नसायची.
आ. पूर्वी त्या पुणे शहर येथील गणेशोत्सव, नवरात्र आणि महाशिवरात्र या निमित्ताने लावण्यात येणार्या मोठ्या सात्त्विक वस्तूंच्या प्रदर्शन कक्षावर सेवेला येत असत. प्रदर्शन कक्ष कितीही दूर अंतरावर असला, तरी त्या येत आणि ‘तरुणांना लाजवेल’, अशी तळमळीने सेवा करत असत.
इ. त्यांच्या निधनाची वार्ता कळली, तेव्हा मला पांढरा प्रकाश दिसला आणि ‘त्यांचा मृत्यूनंतरचा प्रवास चांगला चालू आहे’, असे जाणवले.’
२. सौ. नीता पाटील आणि श्री. विलास पाटील
२ अ. ‘वर्ष २००१ ते २००८ या कालावधीमध्ये पाळंदेकाकूंनी ‘घरोघरी जाऊन साधना कशी सांगायची ?’, हे शिकवले.
२ आ. वेळेचे महत्त्व : काकू सकाळी ११ वाजता नियोजित ठिकाणी यायच्या. त्यांना येण्यास कधी विलंब होत नसे. तसेच त्या ठरलेल्या वेळेतच घरी परत यायच्या. काकूंमुळेच आम्हाला वेळेचे महत्त्व समजले.
२ इ. प्रेमभाव
१. सेवेला येतांना काकूंच्या पिशवीत आयुर्वेदिक औषधे असायची. प्रसारात कधी एखाद्या साधकाला सर्दी, खोकल्याचा त्रास झाला, तर त्या लगेच औषधे द्यायच्या. त्या आम्हाला आयुर्वेदाचे महत्त्व पटवून सांगायच्या.
२. त्यांना सर्व साधकांविषयी प्रेम वाटायचे. त्यांच्या घरी सत्संग असेल, तेव्हा त्या सर्व साधकांची मनापासून विचारपूस करत आणि त्यांना ‘हवे-नको’ हे पहात असत. त्या उन्हाळ्यामध्ये साधकांना आवळा सरबत करून देत.
२ ई. सेवेची तळमळ
२ ई १. सत्संगाची पूर्वसिद्धता करणे आणि नंतर सर्व वस्तू जागच्या जागी ठेवणे : वर्ष २००१ – २००२ मध्ये त्यांच्या शेजारी रहाणार्या सौ. वाटवे (पाळंदेकाकूंची बहीण) यांच्याकडे सत्संग असायचा. त्या वेळी काकू सत्संगाला येत असत. त्या सत्संगाआधी येऊन सत्संगाची पूर्वसिद्धता करत आणि सत्संग झाल्यावर घरातील घेतलेल्या वस्तू जागेवर ठेवत अन् खोली स्वच्छ करीत असत.
२ ई २. सासूबाईंची सेवा मनापासून आणि हसतमुखाने करणे : वर्ष २००३ मध्ये काकूंच्या सासूबाई रुग्णाईत होत्या. त्यांनी सासूबाईंची सेवा करतांना कधीही तक्रार न करता मनापासून आणि हसतमुखाने केली. त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्यांना त्रास होऊ नये; म्हणून त्या सासूबाईंचे अंग कापसाने पुसून काढायच्या.
२ ई ३. पुढाकार घेऊन सेवा करणे : काकू वर्ष २००५ ते २०१२ या कालावधीत मंदिरांमध्ये ग्रंथप्रदर्शन लावायची सेवा पुढाकार घेऊन करायच्या. सेवेला लागणारे पटल, ‘बेडशीट’ आणि अन्य सर्व साहित्य त्या घरून रिक्शाने आणत असत.
२ ई ४. वयोमानामुळे बाहेर पडता येत नसल्याने घरी राहून तळमळीने सेवा करणे : वयोमानामुळे काकूंना प्रसारसेवेला बाहेर पडणे जमत नव्हते. तेव्हा त्या प्रसारात नाव, पत्ता आणि इतर माहिती लिहिण्यासाठी कागदाचे लहान चौकोनी आकाराच्या कागदाचे संच करून ठेवत. तेव्हा त्यांचा ‘मला बाहेर पडता येत नाही, तर घरातून सेवा करू शकते’, असा विचार असायचा.
२ उ. उत्साही आणि आनंदी : वर्ष २००६ – २००७ मध्ये त्या बालसंस्कारवर्ग घ्यायला एस्.टी. कॉलनीत यायच्या. तेव्हा त्या नेहमी उत्साही आणि आनंदी असायच्या. त्यांच्याशी बोलतांना नेहमी आनंद वाटायचा.
२ ऊ. सुनेविषयी कृतज्ञता वाटणे : काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी ‘मला पोटदुखीचा त्रास होतो; मात्र सून (सौ. मनाली पाळंदे) माझे सर्वकाही करते. ती माझी काळजी घेते. ती माझ्यासाठी विदेशातून इकडे परत आली’, असे त्यांनी कृतज्ञताभावाने सांगितले.’
३. श्रीमती लीला घोले
अ. काकू ग्रंथप्रदर्शनावर येणार्या जिज्ञासूंना तळमळीने कुलदेवीचा आणि दत्तगुरूंचा नामजप करण्यास सांगत असत.
आ. त्यांची परात्पर गुरुदेवांवर दृढ श्रद्धा होती. त्या कोणत्याही प्रसंगात स्थिर राहून प्रसंगाला सामोरे जायच्या.
इ. एकदा मी त्यांना ‘सध्या मला घरातील कामे करायला जमत नाहीत’, असे सांगितल्यावर त्यांनी माझ्या मुलाला (श्री. विजय घोले) बोलावून घेतले आणि मला जेवणाचा डबा पाठवला.’
४. सौ. अलका वाघचौडे
४ अ. ‘पाळंदेकाकू माझ्या अध्यात्मातील आई होत्या. त्यांच्यामुळेच मी साधनेत टिकून राहिले आहे. त्या फारच सोज्वळ आणि सात्त्विक होत्या.’
५. सौ. जयश्री वेदपाठक
५ अ. साधनेचे योग्य दृष्टीकोन देणे : ‘पाळंदेकाकू माझ्या आध्यात्मिक आई होत्या. ‘मी साधनेत टिकून रहावे, माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी’, याची तळमळ माझ्यापेक्षा त्यांना अधिक होती. त्या मला वेळोवेळी साधनेचे योग्य दृष्टीकोन देत असत. ‘प्रत्येक गोष्ट आपल्या प्रारब्धानुसार घडत असते, ते स्वीकारले पाहिजे’, असे त्या सतत म्हणायच्या.
५ आ. परिस्थिती स्वीकारणे : त्यांच्या कॉलनीत रहाणार्या एका वाचकांना मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक द्यायला जायचे. तेव्हा त्या वाचक म्हणायच्या, ‘‘सौ. पाळंदेकाकू सतत हसतमुख आणि प्रसन्न असतात. ‘त्या लक्ष्मीदेवीच आहेत’, असे वाटते.’’ त्या सतत हसतमुख, आनंदी, नम्र, वर्तमानकाळात रहाणार्या आणि परिस्थिती कशीही असो ती स्वीकारत असत.
६. डॉ. (सौ.) अश्विनी देशपांडे
अ. काकू घरी आलेल्या प्रत्येकाला प्रेमाने खाऊ देत असत.
आ. अर्पण देतांना, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा स्मरणिका यांच्यासाठी विज्ञापने देतांना ‘देवानेच मला इतके दिले आहे. ते देवालाच अर्पण करते’, असा काकूंचा भाव असायचा.’
७. सौ. संगीता घोळे
७ अ. अहं अल्प : काकू समाजात जाऊन किंवा भ्रमणभाषवरून विज्ञापने घेण्याची सेवा करत असत. त्यांना सेवेची तळमळ होती आणि हे सर्व करतांना त्यात अहं नसायचा. काकूंमध्ये मनमोकळेपणा, परिस्थितीचा स्वीकार करणे, काटकसरीपणा, नीटनेटकेपणा आणि इतरांना साहाय्य करणे, हे गुण होते.
७ आ. हसतमुख : ‘सौ. पाळंदेकाकू गुरुचरणी विलीन झाल्या’, हे वाचल्यावर त्यांचा हसतमुख तोंडवळाच समोर आला.’