शालीन स्वभाव असलेल्या आणि तळमळीने सेवा करून ‘सनातनचे १०८ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणार्‍या पुणे येथील पू. सौ. सरिता पाळंदे (वय ७६ वर्षे) !

आज ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया (१२.६.२०२१) या दिवशी पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे…

देवावर दृढ श्रद्धा असलेल्या आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारून भावपूर्ण साधना करणार्‍या पू. (सौ.) सरिता पाळंदे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

पुण्यातील सौ. सरिता अरुण पाळंदे मागील २४ वर्षांपासून साधना करत होत्या. साधनेतील प्रत्येक शिकवण त्यांनी आत्मसात केल्याने ‘त्या अध्यात्म जगत होत्या’, असे म्हणावे लागेल. त्यांनी स्वत:च्या पूर्ण कुटुंबावर देवा-धर्माचे संस्कार केले.

‘मनुष्यजन्म सार्थकी लागावा’, यासाठी त्यांनी स्वतः सर्व प्रयत्न केले आणि संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवरही त्याचे महत्त्व बिंबवले. त्यांची शिकण्याची स्थिती असल्याने वयाच्या ५५ व्या वर्षी पाळंदेकाकू यांनी ‘व्हॅन’सारखे चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्या चारचाकी गाडी चालवू लागल्या. हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

त्यांच्यामध्ये सेवेची तळमळ असल्याने त्या मनापासून आणि आनंदाने सेवा करायच्या. प्रेमभाव, इतरांचा विचार करणे आणि इतरांना साहाय्य करणे या गुणांमुळे त्या साधकांच्या ‘आध्यात्मिक आई’ बनल्या.

‘प्रत्येक गोष्ट आपल्या प्रारब्धानुसार घडत असल्यामुळे ती स्वीकारली पाहिजे’, हे तत्त्व त्यांनी स्वतः स्वीकारले आणि इतरांनाही सांगितले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. ‘आजारपण म्हणजे प्रारब्ध संपवण्याचा एक भाग’, या श्रद्धेने त्यांनी या आजारपणाकडे पाहिले. यातून त्यांची देवावरील निष्ठा दिसून येते. पोटाचे शस्त्रकर्म झाल्यानंतरही त्या आनंदावस्थेत असायच्या. आनंदावस्थेमुळे त्यांची देहबुद्धी अल्प झाली होती. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा’ ही प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणली होती.

आज्ञापालन करणे, शिकण्याची स्थिती आणि परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती यांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत होती. वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. कर्करोगासारखे दुर्धर आजारपण भोगतांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे ३१.५.२०२१ या दिवशी निधन झाले. सतत देवाच्या अनुसंधानात असल्याने आणि कृतज्ञताभावात राहिल्यामुळे आजारपणातही त्यांची आध्यात्मिक उन्नती होत राहिली. आता त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या सनातनच्या १०८ व्या समष्टी संतपदावर विराजमान झाल्या आहेत.

‘पू. (सौ.) सरिता पाळंदे यांची पुढील आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल’, याची मला निश्चिती आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘पुणे येथील सातारा रस्ता केंद्रातील साधिका सौ. सरिता अरुण पाळंदे यांचे ३१.५.२०२१ या दिवशी कर्करोगाने आणि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १२.६.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या संतत्वाविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना मिळालेली पूर्वसूचना पुढे दिली आहे.

पू. (सौ.) सरिता पाळंदे

१. श्री. राजेश अरुण पाळंदे (कै. (सौ.) सरिता पाळंदे यांचा मुलगा)

१ अ. दुर्मिळ अशा मनुष्यजन्मात देवाची अधिकाधिक भक्ती करून पुण्यसंचय केल्याने मोक्ष मिळण्यास साहाय्य होणार असल्याचे आईने सांगणे : ‘आमच्या घरात जी काही सात्त्विकता आणि देवाचे करण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, ते माझ्या आईमुळेच ! आमच्या कुटुंबात फार कुणी आस्तिक नाही; पण आई इतकी आस्तिक आहे की, तिने शिकवण घालून दिली आहे की, आपल्याला हा मनुष्यजन्म मिळाला आहे, तर देवाची अधिकाधिक भक्ती करून पुण्यसंचय करूया. त्यामुळे आपल्याला पुढे मोक्ष मिळायला साहाय्य होते. मनुष्यजन्मात जेवढी देवाची भक्ती करणे शक्य आहे, ती इतर प्राणीमात्रांना करणे शक्य नाही; म्हणून देवाने हा मनुष्यजन्म दिला आहे, तर ‘या जन्मात देवाची सेवा करून देवाचे ऋण फेडावे.’ आईची ही शिकवण मी कधीही विसरणार नाही. तिने ही शिकवण मला दिल्यामुळे माझ्या मुलांनाही मी ती शिकवण देऊ शकलो.

१ आ. घरातील खंडित झालेले कुलाचार आईने पुन्हा चालू करणे आणि आयुष्यभराचे कल्याण होणारे संस्कार आईकडून मिळणे : घरात आधी नियमित होणारे कुलाचार काही कारणाने खंडित झाले होते. ते कुलाचार आईने पुन्हा चालू केले आणि पुढच्या पिढीला, म्हणजे माझ्या पत्नीलाही (सौ. मनालीला) कुलाचार करायला शिकवले. आता माझी पत्नी घरात गणपति उत्सव, नवरात्रीचे कुलाचार आणि नवरात्रीचे उपवास करते. आयुष्यभराचे कल्याण होणारे संस्कार आईकडून आम्हाला मिळाले.

२. सौ. मनाली राजेश पाळंदे (कै. (सौ.) सरिता पाळंदे यांची सून)

२ अ. मला जन्म जरी दिला नसला, तरी जन्मदात्या आईनंतर मला सांभाळून घेणार्‍या सासूबाईच होत्या. सासू-सून या व्यावहारिक नात्याच्या पलीकडे विचार करून सासूबाईंनी आम्हा दोघींमधील अंतर न्यून होण्यास साहाय्य केले.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला ।
रुसले कधी, तर जवळ घेतले मला ।
रडवले कधी, तर कधी हसवले मला ।

२ आ. ७६ व्या वर्षीसुद्धा उत्साहाने आणि आवडीने सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणार्‍या अन् तरुणांना लाजवतील, अशा सासूबाई ! : सोज्वळ, शालीन स्वभाव, सतत साहाय्याचा हात पुढे, देवधर्म, संस्कार आणि कुलाचार आवडीने मनोभावे जोपासणार्‍या, नातवंडांच्या समवेत, म्हणजेच नवीन पिढीमधे स्वतःला सामावून घेणार्‍या, वयाच्या ७६ व्या वर्षीसुद्धा तितक्याच उत्साहाने आणि आवडीने सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणार्‍या अन् तरुणांना लाजवेल, अशा आमच्या सासूबाई होत्या.

२ इ. मनुष्यजन्म हा दुर्मिळ असून मिळालेले हे जीवन अधिकाधिक सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न करणे आणि ‘आपली वाणी अन् वर्तन यांवर सदैव नियंत्रण ठेवणे’, अशी त्यांची शिकवण असणे : मनुष्यजन्म हा दुर्मिळ असतो. मिळालेले हे जीवन अधिकाधिक सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न झाला पाहिजे. ‘त्यासाठी सर्वांनी सर्व नातेसंबंधांना जपले पाहिजे. कुणाचाही अपमान करू नये. कुणालाही क्षुल्लक किंवा क्षुद्र लेखू नये. जगात सर्वगुणसंपन्न किंवा परिपूर्ण असा कुणीही नाही. ‘आपल्या आचरणाने कुणी दुखावेल किंवा दुरावेल’, असे शब्द कधीही उच्चारू नयेत. आपली वाणी आणि वर्तन यांवर सदैव नियंत्रण ठेवावे’, अशी त्यांची शिकवण होती.

३. श्री. प्रथमेश राजेश पाळंदे (धाकटा नातू)

३ अ. आजीने सर्व कर्तव्ये पूर्ण करून मुलांवर चांगले संस्कार करणे आणि कौटुंबिक दायित्वही पुढच्या पिढीला सहजपणे हस्तांतरित करणे अन् जीवनभर साधनेचे प्रयत्न पुष्कळ तळमळीने करणे : कै. सरिता पाळंदे माझी आजी (कै. (सौ.) सरिता पाळंदे) पुष्कळ समाधानी जीवन जगली. आजीने सरकारी नोकरी केली. घरातील कामे केली; पण त्याविषयी तिने कधीच तक्रार केली नाही. ती नि:स्वार्थीपणाचे प्रतीक होती. तिने तिची सर्व कर्तव्ये पूर्ण केली. मुलांवर चांगले संस्कार केले. तिने कौटुंबिक दायित्व पुढच्या पिढीला सहजपणे हस्तांतरित केले. आजीने जीवनभर नामजप, प्रार्थना आणि सेवा असे साधनेचे प्रयत्न पुष्कळ तळमळीने केले. त्यामुळे तिची आध्यात्मिक पातळी पुष्कळ चांगली होती.

३ आ. मी लहान असतांना वायूप्रदूषणामुळे बर्‍याच वेळा आजारी पडायचो. त्या वेळी आजीने मला पुष्कळ सांभाळले. तेव्हापासूनच माझ्यात आणि आजीमध्ये प्रेमाचे नाते निर्माण झाले.

३ इ. देहत्याग करतांना आजीला अधिक वेदना झाल्या नाहीत, ही केवळ देवाची कृपा आहे. ‘आजीने आयुष्यभर केलेले चांगले कर्म, साधना, प्रार्थना आणि नि:स्वार्थीपणाचे हे फळ आहे’, असे मला वाटते.

मी देवाला प्रार्थना करतो, ‘आजीच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि तिच्या साधनेला गती मिळू दे.’(८.६.२०२१)

कै. (सौ.) पाळंदे यांचे छायाचित्र पाहून ‘त्या संत झाल्या आहेत’, असे वाटून भाव जागृत होणे

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कै. (सौ.) सरिता पाळंदे यांचे लिखाण मला वाचण्यासाठी पाठवले होते. तेव्हा लिखाणाच्या समवेत त्यांचे छायाचित्रही होते. मी लिखाण वाचण्याआधी त्यांचे छायाचित्र पाहिले. ते पहाताक्षणीच ‘त्या संत झाल्या आहेत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.

– (सद्गुरु) कु. स्वाती खाडये (९.६.२०२१)

कै. (सौ.) सरिता पाळंदे यांचे छायाचित्र पाहून पुष्कळ भाव जागृत होऊन आनंद जाणवणे आणि ‘त्या संतच आहे’, असे वाटणे

कै. (सौ.) सरिता पाळंदे यांचे लिखाण संकलनासाठी आले होते. त्यांचे लिखाण पहाण्याआधी मी त्यांचे छायाचित्र पाहिले. ते पाहून माझा पुष्कळ भाव जागृत होत होता आणि मला आनंदही जाणवत होता. ही स्थिती सलग ५ मिनिटे टिकून होती. यावरून ‘त्या संतच आहेत’, असे वाटत होते. कै. (सौ.) सरिता पाळंदे यांच्या लिखाणाविषयी मी सद्गुरु स्वातीताईंशी बोलत असतांना मी त्यांना माझी वरील अनुभूती सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मलाही अशीच अनुभूती आली.’’

– श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

(‘पुणे येथील काही साधकांनाही त्या संत झाल्याचे लक्षात आले.’ – संकलक)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक