किल्ले दुरवस्थेत !

राज्यात दिनांकानुसार ‘शिवराज्याभिषेकदिन’ उत्साहाने साजरा होत असतांनाच वेल्हे तालुक्यातील (जिल्हा पुणे) ऐतिहासिक किल्ला तोरणागडावरील बुधलामाचीकडे जाणार्‍या कोकण बुरुजाची दगडे पाडून समाजकंटकांनी नासधूस केली. अशा घटना अधूनमधून होत असतात; कारण अशा चुकीच्या कृती करणार्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कठोर शिक्षा होत नाहीत. ही घटना शिवराज्याभिषेकादिनाच्या वेळीच महाराष्ट्रात घडणे अत्यंत दुर्दैवी !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

छत्रपती शिवाजी महाराजांनी याच तोरणागडावर हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण बांधून त्याची मुहूर्तमेढ रोवली. हेच गडकोट किल्ले महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे आणि शौर्यशाली परंपरेचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले यांचे एक अतूट नाते आहे. अनेक किल्ल्यांना महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला आहे. ज्या महाराष्ट्राच्या घोड्यांच्या टापांनी सीमारेषा आखल्या, त्याच महाराष्ट्रात किल्ल्यांवरील अनेक बुरुज, इमारती, मंदिरे, तलाव आजही विदीर्ण अवस्थेत अखेरच्या घटका मोजत आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. गडावर जाण्यासाठी योग्य वाट नसणे, काही गडांवर मदरसा निर्माण होणे, तर पन्हाळागडाने आपले अस्तित्व हरवून बसणे, अशा अनेक घटना मन सुन्न करणार्‍या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराष्ट्रात ४०० किल्ले होते. आता त्यातील ४६ किल्ले राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारित, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ३६, तर साधारणपणे ५२ किल्ल्यांचे संवर्धन हे शिवप्रेमी आणि किल्लाप्रेमी संस्थांच्या वतीने केले जाते. उर्वरित किल्ल्यांचे काय ? हा गंभीर प्रश्न इतिहासप्रेमींच्या मनात आहे. महाराष्ट्रातील एकही किल्ला जागतिक वारसा सूचीत नाही, हे त्यातून गंभीर आणि चिंताजनक आहे. शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आपापल्या परीने किल्ल्यांचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु ऐतिहासिक वारसांचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग काय करत आहे ? ऐतिहासिक वारसा पूर्ण संपुष्टात येण्यापूर्वी सरकारने समाजामध्ये राष्ट्र-धर्म प्रेम निर्माण करणे आणि किल्ल्यांचे पावित्र्य जपणे यांसाठी प्रयत्न केल्यास किल्ल्यांची दुरवस्था होणार नाही.

– श्री. अमोल चोथे, पुणे