‘महाशून्य’ या निर्गुण तत्त्वाची सगुणातील देवता कोणती ?’, असा प्रश्न मनात येताच आज्ञाचक्रावर वलयाकार स्पंदने जाणवणे आणि त्यांत सूक्ष्मातून चतुर्भुजधारी महाविष्णूचे दर्शन होऊन भाव जागृत होणे
साधकांना अनुभूतींतून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७९ व्या जन्मसोहळ्यानिमित्त त्यांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनाची एक ध्वनी-चित्रचकती ऑनलाईन दाखवण्यात आली. त्याच्या दुसर्या दिवशी मी नामजपाला बसलो असतांना आलेली अनुभूती पुढे देत आहे.
मी सकाळी ६.३० नंतर नामजपाला बसलो होतो. सध्या मला त्रासानुसार संतांनी ‘महाशून्य’ हा नामजप करण्यास सांगितला आहे. कालचा परात्पर गुरु डॉक्टरांविषयीचा कार्यक्रम पाहिल्यावर चित्तवृत्ती उल्हसित होऊन नामजप करण्याची आंतरिक ऊर्मी माझ्या मनात निर्माण झाली. नामजपाला बसल्यानंतर सुमारे अर्धा घंटा मोठमोठ्याने ढेकरा येऊन शरिरातील त्रासदायक शक्ती मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे मला जाणवले. त्यानंतर मी मन पुन्हा एकाग्र करून गीतेत सांगितल्याप्रमाणे योग्यासारखे डोळे मिटले आणि मन आज्ञाचक्रावर एकाग्र करून दृष्टी नासिकाग्रावर एकाग्र केली. त्या वेळी ‘महाशून्य’ हा निर्गुण तत्त्वाचा जप केवळ आज्ञापालन म्हणून मी करत होतो. देवतेचा जप करतांना आपल्यासमोर तात्काळ त्या त्या देवतेचे सगुण रूप डोळ्यांसमोर येते. तेव्हा ‘महाशून्य’ या निर्गुण तत्त्वाची सगुणातील देवता कोणती असावी ?’, याविषयी माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. यानंतर मला आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवून भ्रमणभाष ‘रिफ्रेश’ करतांना जसे एक वर्तुळ चक्राकार भ्रमण करते, त्यानुसार मला आज्ञाचक्रावर जाणवू लागले. काही क्षणांत त्या वर्तुळात साक्षात् चतुर्भुजधारी महाविष्णूच्या शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या रूपाचे दर्शन होऊन माझा गुरूंप्रती कृतज्ञताभाव जागृत होऊन डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. या अवस्थेमध्ये कधी ‘महाविष्णु’, तर कधी ‘महाशून्य’, हा जप होत होता. ही स्थिती जवळपास अर्धा घंटा टिकून होती. ‘जपातून उठूच नये’, असे मला वाटत होते.
गुरुदेवांनी मला ही अलौकिक अनुभूती दिल्याविषयी मी परात्पर गुरुदेव डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (मे २०२१)
|