प्राधिकरणाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून विलीनीकरण झाल्याचा भाजपचा आरोप !
पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पी.एम्.आर्.डी.ए.मध्ये विलीनीकरण करण्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केल्यावर भाजपने प्राधिकरण बरखास्त करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. प्राधिकरणाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून विलीनीकरणाचा निर्णय झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे अन् आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. प्राधिकरण क्षेत्रातील विकासकामांसाठी पालिका मोठ्या प्रमाणात व्यय करते त्यामुळे विलीनीकरण महापालिकेत करणे सयुक्तिक ठरले असते. कोणालाही विश्वासात न घेता परस्पर झालेल्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार जगताप आणि लांडगे यांनी स्पष्ट केले. तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी विलीनीकरणाचे समर्थन केले. प्राधिकरणाचे विकसित क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरित केल्याने शहरवासीयांना लाभ होणार असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे बारणे यांनी सांगितले.