१. देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ प.पू, भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या नावाचे फलक दिसणे आणि तेथे त्यांचे अस्तित्व जाणवून आनंद होणे
‘मी डिसेंबर २०१६ देवद आश्रमात रहायला आले. एके दिवशी मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ नामजपाला बसले होते. तेव्हा मला त्या गाडीच्या डाव्या बाजूस ‘प.पू. भक्तराज महाराज’ आणि ‘प.पू. रामानंद महाराज’ असे लिहिलेले फलक दिसले. याविषयी मी माझा मुलगा सद्गुरु राजनदादा यांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) सांगितले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तेथे तसे फलक नाहीत.’’ तरीही मला ते फलक तेथे दिसले. त्या वेळी मला तेथे प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचे अस्तित्व जाणवून फार आनंद होत होता.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसले असतांना स्वतःच्या मुखातून बाळकृष्ण बाहेर येत असल्याचे अनुभवणे
७ – ८ मासांपूर्वी दुपारी १२ वाजता मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ बसले होते. तेथे सद्गुरु अनुताईही (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) आल्या होत्या. अकस्मात् मला माझ्या अंगात काहीतरी संचारल्यासारखे वाटले. त्या वेळी ‘आपण पूजेत ठेवतो, तसा बाळकृष्ण माझ्या मुखातून बाहेर येत आहे’, असे मला वाटले. मी ‘आ’ वासून माझे तोंड उघडले आणि माझे दोन्ही हात माझ्या तोंडापुढे धरले; मात्र बाळकृष्ण गुप्त झाला. त्या वेळी ‘माझ्या घशातून बाळकृष्ण कसा काय बाहेर येत होता ?’, याचे मला आश्चर्य वाटले आणि मला फार आनंद झाला.
३. गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राची पूजा करतांना आलेली अनुभूती
देवद आश्रमात मी रहात असलेल्या खोलीत माझ्या उशाजवळील पटलावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक लहान (अडीच इंचाचे) छायाचित्र आहे. मी प्रतिदिन एक फूल वाहून त्याची पूजा करते.
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना त्यांच्या गळ्यात चमकणारे मणी असलेला तेजस्वी हार दिसणे :
१६.७.२०१९ या दिवशी देवद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त भावसोहळा होता. त्या दिवशी सकाळी मी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या छायाचित्राची पूजा केल्यावर त्यांच्या छायाचित्राला वाकून नमस्कार करत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या गळ्यात मला वरीच्या दाण्याच्या आकाराचे चमकणारे मणी असलेला हार दिसला. त्यांच्या मानेपर्यंत दिसणारा तो चमकणारा हार मी आश्चर्याने पहातच राहिले. प्रथम मला ‘असा चमकणारा तेजस्वी हार दिसणे, हा एक भास असेल’, असे वाटले. त्यानंतर मी पुन्हा दुसर्यांदा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या छायाचित्राला वाकून नमस्कार करून छायाचित्राकडे पाहिल्यावर मला पुन्हा तोच तेजस्वी हार परात्पर गुरु डॉक्टरांच्या गळ्यात दिसला आणि मला आनंद झाला.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला पुन्हा नमस्कार करतांना डोळ्यांसमोर दोन तेजस्वी ज्योती दिसणे :
त्यानंतर मी पुन्हा तिसर्यांदा परात्पर गुरु डॉक्टर यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा मला माझ्या दोन्ही डोळ्यांसमोर २ तेजस्वी ज्योती दिसल्या. ‘मला भास होत असेल’, असे वाटून मी पुन्हा नमस्कार केला. तरीही पुन्हा मला तशाच २ ज्योती दिसल्या. ‘डोळ्यांजवळ ज्योती आहेत, तर माझ्या डोळ्यांना चटका का बसत नाही (भाजत का नाही) ?’, या विचाराने मी डोळ्यांना हात लावून पाहिले. तेव्हा मला माझे डोळे नेहमीसारखे थंड लागले. नंतर मी मनातून परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘तुमची ही लीला तुम्हालाच ठाऊक आहे.’ गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता परात्पर गुरुदेवांनी मला ही अनुभूती दिल्यामुळे मला फार आनंद झाला. त्यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
४. मनातील विचार उणावले असून श्रीकृष्णाचा नामजप अखंड चालू असल्याचे जाणवून आनंद मिळणे
सध्या माझ्या मनातील इतर विचार उणावले आहेत. मी सकाळी ९ ते १२ या वेळेत २ घंटे नामजप आणि एक घंटा मंत्रजप करते. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत समष्टीसाठी नामजप करते. इतर वेळी ‘माझा आतून श्रीकृष्णाचा नामजप सतत चालू आहे’, असे मला वाटते आणि मला आनंद मिळतो. त्यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती प्रभावती गजानन शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०१९)
|