तेर्सेबांबर्डे येथे कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम करणारी रेल्वेची बोगी जळून खाक

कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत

कुडाळ – कोकण रेल्वेमार्गावरील कुडाळ ते झाराप स्थानकांच्या दरम्यान तेर्सेबांबर्डे गेटजवळ रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम करणार्‍या विशेष रेल्वेगाडीच्या  बोगीला ९ जूनला सकाळी ९.३० वाजता आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एम्.आय.डी.सी., सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या अग्नीशमनदलांना पाचारण करण्यात आले; मात्र या आगीत बोगी आणि दुरुस्तीचे  साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली, याविषयी मात्र अधिकार्‍यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या घटनेमुळे कोकण रेल्वेमार्गावरील  राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या गाड्यांचा खोळंबा झाला. कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.