भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/484426.html

१०.  विविध आकाराच्या वनस्पतींची लागवड कशी करावी ?

१० अ. जागेचे नियोजन करणे : रोपवाटिकेत बनवलेल्या औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी कोणत्या वनस्पती कुठे (जागा) लावायच्या आहेत, हे ठरवावे.

१० आ. दोन वनस्पतींमधील अंतर ठरवणे : २ – ३ फुटांपर्यंत उंच वाढणार्‍या वनस्पतींची लागवड करतांना त्या दोन वनस्पतींमध्ये १ ते १.५ फूट अंतर ठेवावे. १० फुटांपर्यंत उंच वाढणार्‍या दोन वनस्पतींमध्ये १२ ते १५ फूट, तर त्याहून उंच वाढणार्‍या दोन वनस्पतींमध्ये २० ते २५ फूट अंतर ठेवावे.

१० इ. खड्डे खोदणे : वनस्पतीचा प्रकार आणि वाढ यांनुसार खड्ड्यांचे सर्वसामान्य आकार कसे असावेत, हे पुढील सारणीत दिले आहे. आपण लावणार असलेली वनस्पती किती उंच वाढणार आहे, यानुसार खड्डे खोदावेत.

१० ई. प्रत्यक्ष लागवड

१० ई १. लहान वनस्पती

१० ई १ अ. भूमी सिद्ध करणे

१. पावसाच्या पाण्यावर वाढून पाऊस संपल्यावर काढणीयोग्य होणार्‍या वनस्पतींची लागवड वाफे किंवा सरी-वरंबे करून करावी.

२. पावसाळ्यापूर्वी भूमी खणून-नांगरून भुसभुशीत करून घ्यावी आणि तिच्या सुपीकतेनुसार शेणखताचे प्रमाण ठरवून ते भूमीत मिसळून घ्यावे.

३. आपल्या प्रदेशातील पावसाच्या मानानुसार वाफे बनवावेत. जास्त पाऊस पडणार्‍या प्रदेशांत भूमीपासून उंच असे, म्हणजे गादीवाफे करावेत. मध्यम पाऊस पडणार्‍या जागी भूमीलगत, तर अल्प पाऊस पडणार्‍या ठिकाणी खोल वाफे बनवावेत.

१० ई १ आ. बी पेरणी

१. कालमेघासारख्या ज्या वनस्पतींचे बी आकाराने लहान असते, ते बी पेरतांना त्यात वाळू किंवा माती मिसळावी आणि हे मिश्रण लागवडी योग्य भूमीत मोहरी किंवा बाजरी यांसारखे पेरावे.

२. अन्य बी नुसतेच पेरावे. काही ठिकाणी बी पेरण्यापूर्वी ते देशी गायीच्या गोमूत्रात भिजवून पेरण्याची पद्धत आहे.

३. बियाणे खोल पुरू नये. तसे केल्यास रुजवा अल्प मिळतो.

४. सर्वसाधारणपणे पावसाच्या आरंभी बी पेरणी करावी.

५. पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षभरात केव्हाही पेरणी करता येते.

१० ई १ इ. छाटांद्वारे लागवड

१. शेतामध्ये योग्य व्यवस्थापन असल्यास थेट शेतातच छाटांची (खोडाच्या तुकड्यांची) लागवड करता येते.

२. छाटांपासून लागवड करायची झाल्यास जून झालेल्या खोडांचे छाट घ्यावेत. छाट कापतांना ते पेराच्या किंचित खाली तिरके कापावेत.

३. छाट लावण्यापूर्वी ते ‘आय्.ए.ए.’ किंवा ‘आय्.बी.ए.’ (२० पीपीएम्) या संप्रेरकामध्ये बुडवून लावल्यास छाटांचे फुटण्याचे आणि मुळे येण्याचे प्रमाण वाढते.

४. भूमीत छाट लावल्यावर त्याच्या भोवतालची माती दाबून घ्यावी.

१० ई २. वेली : वेलींची लागवड करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार भूमीची सिद्धता करावी. वेलींना आधार लागत असल्याने त्या कोणत्याही मोठ्या झाडाच्या शेजारी किंवा कुंपणाशेजारी लावाव्यात. काही वेळा मांडव बनवून त्यावर वेली सोडल्या जातात.

१० ई ३. झुडुपे : आवश्यकतेनुसार चर किंवा खड्डा खोदून लागवड करावी. अडूळसा, निर्गुर्ंडी, मेंदी, शिकेकाई, सागरगोटा (गजगा) यांसारख्या वनस्पती कुंपणाला लावल्या जातात.

१० ई ४. वृक्ष : या वनस्पतींची लागवड करण्यासाठी झाडाच्या होणार्‍या वाढीनुसार १ ते २ मीटर लांबी, रुंदी आणि खोली असलेला खड्डा खणावा. खड्डा खणतांना आरंभी निघणार्‍या मातीमध्ये शेणखत मिसळून त्यातील थोडी माती खड्ड्यामध्ये पसरावी. लावडीसाठी वनस्पतीचे पिशवीत वाढवलेले १ ते २ वर्षांचे चांगले रोप घ्यावे. त्याची पिशवी झाडाच्या मुळांना धक्का लागणार नाही अशा प्रकारे चाकूने किंवा धारदार ब्लेडने बाजूला करावी. रोप मातीच्या गड्ड्यासह खड्ड्यात मधोमध काळजीपूर्वक लावून खड्डा मातीने पूर्ण भरून घ्यावा. रोप ठेवून खड्डा नीट भरून घ्यावा. रोपाच्या सभोवतालची माती रोपाला हानी न पोचवता पायाने व्यवस्थित दाबून घ्यावी. रोपाच्या भोवती पाण्यासाठी आळे करावे. त्याच्या बुंध्याशी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. दोन वृक्षवर्गीय झाडांमध्ये त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांच्या फांद्या एकमेकांना लागणार नाहीत, एवढे अंतर असावे.

१० उ. लागवडीचे व्यवस्थापन : आवश्यकतेनुसार खत आणि पाणी यांचे नियोजन करावे, तसेच नियमितपणे तण काढावे.                              (क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)