‘सौ. सुप्रिया माथूर यांनी एक स्वभावदोष निर्मूलन विषयी सत्संग पुष्कळच चांगला घेतला. त्यामध्ये त्यांनी प्रक्रियेविषयीचे ३ टप्पे सांगितले.
१. पहिला टप्पा
१ अ. मनाचा आढावा घेऊन सर्व विचार लिहून काढल्यावर ‘साधनेसाठी योग्य-अयोग्य काय आहे ?’, हे कळू लागणे : प्रक्रिया चालू केल्यावर पहिला आठवडा केवळ आकलन होण्यासाठीच जातो. यामध्ये ‘स्वतःच्या मनात येणारे विचार योग्य कोणते ? आणि अयोग्य कोणते ?’, हे ओळखता येण्यासाठी हा कालावधी द्यावा लागतो.
पहिल्या दिवशी आढाव्यात बसल्यावर काहीच समजत नाही. मनात काही जात नाही.
नंतर प्रत्येक अर्ध्या घंट्याने मनाचा आढावा घेऊन सर्व विचार लिहून काढल्यावर ‘साधनेसाठी योग्य-अयोग्य काय आहे ?’, हे कळू लागते. बर्याच वेळा आपण पहिल्याच टप्प्यात असतो; कारण आपल्याला व्यष्टी साधनेची आवड नसते.
१ आ. व्यष्टी साधनेविषयी उदासीनता असण्यामागील कारणे
१. ‘स्वतःला अधिक कळते’, हा अहं असतो.
२. शिकण्यापेक्षा शिकवण्याची वृत्ती अधिक असते.
३. मनात विकल्प असतात.
१ इ. ‘व्यष्टी साधना ही आपली मूलभूत गरज आहे’, असे वाटायला हवे : अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, तसे ‘व्यष्टी साधना ही आपली मूलभूत गरज आहे’, असे वाटत नाही, उदा. एखाद्या ठिकाणी जातांना मार्ग चुकला, तर विचारतो; पण चाललोच नाही, तर पोचणार कसे ? प्रयत्नच केले नाही, तर स्वतःचा उद्धार आपोआप होत नसतो. त्याच्यासाठी साधनाच करावी लागते.
१ ई. अंतर्मनापासून खंत वाटली असेल, तरच आढावासेवकांनी जे प्रयत्न सांगितले आहेत, तसे प्रयत्न करायला आरंभ होऊ शकणे : आपले प्रयत्न झाले नाहीत, असे आढावासेवक कठोर शब्दांत जेव्हा सांगतात, तेव्हा आपल्याला वाईट वाटते. ‘माझे प्रयत्न होत नाहीत, माझे कौतुक होत नाही; म्हणून मला वाईट वाटत असेल, तर ते वाईट वाटणे’, हे बाह्यमनाचे असते. मला अंतर्मनापासून खंत वाटली असेल, तर आढावासेवकांनी जे प्रयत्न सांगितले आहेत, तसे प्रयत्न करायला आरंभ होतो.
१ उ. प्रयत्न होत नसल्यास स्वयंसूचना सत्रे करणे आणि शिक्षा पद्धतीचा अवलंब करणे : माझ्याकडून प्रयत्नच होत नसल्यास स्वयंसूचना सत्रे करायला हवीत आणि शिक्षा पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे.
सूचना : ‘जेव्हा आढाव्यात माझे प्रयत्न होत नाहीत; म्हणून मला वाईट वाटत असेल, तेव्हा ‘ही बहिर्मुखता आहे’, याची मला जाणीव होऊन मला जे प्रयत्न करायला सांगितले आहेत, ते प्रयत्न मी करीन’, असे वाटले पाहिजे.
२. दुसरा टप्पा
२ अ. प्रक्रियेतील दुसरा आठवडा – मनात आलेल्या अयोग्य विचारांचे खंडण करणे : यामध्ये आपण आपल्या मनात येणारे अयोग्य विचार आढावासेवकांना सांगून ‘योग्य विचार काय करायला पाहिजेत ?’, ते विचारून घेतो. नंतर सारणी लिखाण करतांना योग्य विचार, दृष्टीकोन लक्षात येऊन ते सारणीत लिहून काढतो.
२ आ. योग्य दृष्टीकोन देता आल्याच्या ज्ञानाचा आणि गुणांचा अहं झाल्यास प्रक्रियेच्या तिसर्या टप्प्यात जाता न येणे : आपल्याला योग्य दृष्टीकोन देता आल्याचा, म्हणजेच या ज्ञानाचा आणि गुणांचा आपल्याला अहं झाला असेल, तर आपल्याला पुढच्या म्हणजे तिसर्या टप्प्यात जाता येत नाही. आपल्याला आपल्यातील ज्ञान आणि गुण यांचा अहं असेल, तर ते अशुद्ध ज्ञान होऊन अज्ञान होते.
२ इ. क्षमता असतांना प्रयत्न न करणार्यांनी आढावासेवकांना विचारल्यावर त्यांच्यात विचारांचा अडथळा असल्याचे त्यांच्या लक्षात येऊन, त्यांचे प्रयत्न चालू होणे : काही साधकांच्या संदर्भात मात्र ‘क्षमता आहे; पण प्रयत्न होत नाहीत’, असे असते; कारण आत्मविश्वास न्यून असतो. त्या साधकांना ‘प्रयत्न काय करायचे ?’, ते लक्षात येते; पण विचारांचा अडथळा असल्याने स्वतःच ठरवण्याचा कल होतो आणि प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे प्रयत्न करणे थांबवले जाते; कारण विचारांवर योग्य दृष्टीकोन द्यायला ते न्यून पडतात. येथे आढावासेवकांना विचारल्यावर ‘स्वतःच्या विचारांचा अडथळा आहे’, हे लक्षात येऊन त्यांचे प्रयत्न चालू होतात.
३. तिसरा टप्पा
३ अ. एक मासानंतर मनात आलेल्या अयोग्य विचारांवर योग्य कृती करता येणे
३ आ. एक मास (महिना) सातत्याने चिंतन सारणीनुसार प्रयत्न झाले असतील, तर अयोग्य विचार आल्यावर आपल्याकडून योग्य कृती केली जाते.
३ इ. काही प्रसंगातच योग्य कृती केली जाणे : तिसर्या टप्प्याची पहिली पायरी, म्हणजे ४५ प्रसंगांतून केवळ ६ ते ७ प्रसंगावरच योग्य कृती केली जाते. त्यामुळे गती अल्प असते; म्हणून या टप्प्यात सातत्य ठेवून गती वाढवणे अपेक्षित आहे. या टप्प्यात जर सातत्य राहिले नाही, तर अहं वाढून घसरण चालू होते.
३ ई. तिसर्या टप्प्याची शेवटची पायरी, म्हणजे मनात येणार्या प्रत्येक विचारावर योग्य कृती करणे
या ठिकाणी ‘आपण स्वतः कोणत्या टप्प्याला आहोत ? आणि पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी नेमका अडथळा कुठे आहे ?’, ते शोधून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. ‘प्रयत्न करणे’, हे स्वतःच्या ध्येयावर आणि चिकाटीवर अवलंबून असते. येथे स्वतःच कठोरपणे प्रयत्न करणे आवश्यक असते.
४. स्वतःला पालटण्यासाठी ३ स्तरांवर प्रयत्न करणे अपेक्षित असणे
४ अ. मानसिक स्तरावर : मनाची तळमळ हवी.
४ आ. आध्यात्मिक स्तरावर : गुरूंवर श्रद्धा हवी.
४ इ. कृतीच्या स्तरावर : चिकाटी हवी.
५. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मोक्ष प्राप्तीपर्यंत सातत्याने करायची क्रिया आहे.’
– सौ. समिधा संजय पालशेतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.२.२०२०)